मला मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा करायचा आहे. मात्र मला दहावीत ४६ टक्के आणि बारावीमध्ये (वाणिज्य शाखा) ५६ टक्के मिळाले आहेत. मला आता कोणत्या संस्थेत, महाविद्यालयात, विद्यापीठात प्रवेश मिळेल? मला दूरस्थ शिक्षणाद्वारे असा अभ्यासक्रम करता येईल का? माझ्याकडे अभियांत्रिकी पदवी  किंवा पदविका नसल्याने एका चांगल्या कंपनीमधील संधी मी नुकतीच गमावली आहे. मी काय करावे?

विवेक घाडी

आपल्याला उत्तम संधी मिळावी असे प्रत्येकालाच वाटते. ते स्वाभाविकच आहे; परंतु तुला दहावी आणि बारावीत मिळालेले गुण लक्षात घेता अभियांत्रिकी अभ्यासक्रम करणे उचित ठरणार नाही, असे वाटते. गणिताचा पाया कच्चा असेल तर अभियांत्रिकी शिक्षण सोपे जात नाही. त्यामुळे तू वाणिज्य शाखेतच करिअर करावेस. पदवीनंतर पदव्युत्तर पदवी किंवा एमबीए करता येईल. या शैक्षणिक अर्हतेवर तुला चांगली संधी मिळू शकेल.

माझा मुलगा नववीत आहे. वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर त्याला भूदल  किंवा नौदलात जायचे आहे. त्याला हे शक्य आहे का?

रोहित नेवरेकर

तुमचा मुलगा वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर भूदल व वायुदलात जाऊ  शकतो. त्यासाठी त्याला संघ लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी कम्बाइन्ड डिफेन्स सव्‍‌र्हिस ही परीक्षा द्यावी लागेल. इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमीसाठी कोणत्याही विषयातील पदवीधराची निवड केली जाते. एअर फोर्स अ‍ॅकॅडमीसाठी कोणत्याही पदवीधराची निवड केली जात असली तरी संबंधित उमेदवाराने बारावीमध्ये गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांचा अभ्यास करणे गरजेचे असते. तुमच्या मुलाला वायुदलात जायचे असल्यास त्याने बारावीपर्यंत या विषयांचा अभ्यास करणे उपयुक्त ठरेल. इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमीसाठी फक्त अभियंत्यांचीच निवड केली जाते. लेखी परीक्षा हा निवडीचा एक भाग झाला. शारीरिक चाळणी आणि वैद्यकीय तपासणी हा दुसरा व अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेले अनेक उमेदवार शारीरिकदृष्टय़ा सक्षम व सुदृढ आढळून न आल्यास ते अंतिम निवडीसाठी अपात्र ठरतात. शारीरिक क्षमतेचे काही निकष ठरवण्यात आले आहेत. ते प्राप्त करणे आवश्यक आहे.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.

Story img Loader