मी २०१६ मध्ये बीए केले आहे. माझे नातेवाईक, मित्र मला आता म्हणतात की बीए अभ्यासक्रम हा बीएस्सी किंवा बीकॉमपेक्षा निम्न दर्जाचा आहे. या टोमण्यांमुळे माझा आत्मविश्वास आता घटत चालला आहे. खरेतर मला स्पर्धा परीक्षांमध्ये रस आहे. मला विक्रीकर निरीक्षक किंवा पोलीस उपनिरीक्षक व्हायचे आहे. पण याचा अभ्यास कसा करायचा याची मला काहीच माहिती नाही. मी यापुढे काय करावे?

सुमित जाधव

एक महत्त्वाची गोष्ट तू डोक्यात पक्की करायला हवीस, ती म्हणजे कोणताही अभ्यासक्रम हा उच्च किंवा निम्न दर्जाचा नसतो. तुझे नातेवाईक वा मित्र असे टोमणे मारून तुझा आत्मविश्वास कमी करत आहेत याचा अर्थ ते तुझे खरे हितचिंतक नाहीत असाच होतो. शिवाय आता बीएची पदवी घेतल्यावर कोण काय म्हणतो याकडे लक्ष देण्यात काहीच हशील नाही. बीए केल्यावरही उत्तम करिअर घडू शकते. तुला स्पर्धा परीक्षेमध्ये रस असल्याचे नमूद केले आहेस. त्या अभ्यासामध्ये स्वतला झोकून दे. त्यासाठी आधी राज्य लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन विक्रीकर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा अभ्यासक्रम बघून घे. तो लक्षात घेऊन अभ्यासाची दिशा ठरवणे सोपे आहे. आपण पदवीपर्यंत जे विषय शिकतो ते आणि इंग्रजी, मराठी, दैनंदिन घडामोडी, महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थकारण, समाजशास्त्र अशा सगळ्याच विषयांचा समावेश या अभ्यासक्रमात होतो. या विषयाचे योग्य आकलन असलेल्यालाच सोडवता येतील, अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. प्रश्नपत्रिका या वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या असतात. सध्या अशा पेपरमध्ये एक बरोबर आणि तीन चूक अशा पद्धतीचे पर्याय दिले जात नाहीत. एकापेक्षा अधिक अचूक उत्तरांच्या पर्यायांतून अधिक अचूक असलेल्या एक वा दोन वा सर्वच उत्तरांचीही निवड करावी लागते. त्यामुळे या परीक्षांचा अभ्यासक्रम सोपा असला तरी अभ्यास मात्र सखोल करावा लागतो. त्यासाठी बारावी वा पदवीपर्यंतच्या विषयांचा सखोल व परिपूर्ण अभ्यास आवश्यक आहे. चांगले गुण मिळवायचे असतील तर इंग्रजी व मराठी भाषेवरचे प्रभुत्व उपयुक्त ठरते. या परीक्षेच्या तयारीसाठी काही संस्थाही शिकवणीवर्ग घेत असतात. तुला शक्य असेल तर त्यासाठी नाव नोंदवू शकतोस. त्यामुळे अभ्यासाला एक शिस्त येईल. अभ्यास करताना येणाऱ्या अडचणीचे कोणाकडून निराकरण करून घ्यावे, ही शंका राहणार नाही. तात्काळ त्या सोडविता येतील.

ही परीक्षा उत्तीर्ण होण्याचे ध्येय तू ठेवले आहेस त्यासाठी योग्य ते कष्ट केलेस तर ते पूर्ण होईलच. यापेक्षा उच्च श्रेणीच्या नोकरीचे ध्येय ठेवून तू त्या परीक्षा उत्तीर्ण झालास तर मग बीए होऊनही हे सगळे करणारा हिरोही तू होऊ शकतोस. तुला तुझ्या नातेवाईक आणि हितचिंतकांना हे सिद्धही करून दाखवता येईल.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)

Story img Loader