मी सध्या एमएच्या पहिल्या वर्षांला आहे. मला राज्यसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी हे पद मिळवायचे आहे. तर मला कोणत्या पद्धतीने तयारी करावी लागेल?

बाळू व्ही. बागूल

उपजिल्हाधिकारी पदाच्या नियुक्तीसाठी राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या प्रक्रियेत पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीन टप्पे असतात. मुख्य परीक्षेसाठी पूर्व परीक्षेतून विशिष्ट संख्येच्या प्रमाणात उमेदवार निवडले जातात. मुलाखतीसाठी निवडताना एकूण पदे लक्षात घेऊन त्याच्या दहा ते वीसपट विद्यार्थी निवडले जातात. मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या गुणांवर आधारित अंतिम निवड केली जाते. उपलब्ध जागा, गुणवत्ता क्रमांक आणि पदांचा पसंतीक्रम यावर अंतिम निवड यादी तयार केली जाते. बहुतेक सर्वच उमेदवारांचा पहिला पसंतीक्रम हा उपजिल्हाधिकारी संवर्ग असतो. त्यामुळे सर्वोच्च गुण मिळालेल्या उमेदवारांनाच उपजिल्हाधिकारी पद मिळत असते. पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम हा पदवीस्तरीय असतो. त्यामुळे पदवी स्तरापर्यंतच्या सर्व विषयांचा अभ्यास सखोलपण करणे आवश्यक आहे. आयोगाने दोन्ही परीक्षेचा अभ्यासक्रम विस्तृतपणे संकेतस्थळावर ठेवला आहे. त्यावरुन अभ्यासाची दिशा निश्चित करता येते. उमदेवारांचे सर्वागीण व्यक्तिमत्त्व जोखणे व प्रशासनासाठी उमेदवार लायक आहे की नाही या बाबी तपासण्यासाठी या अभ्यासक्रमाची रचना केल्याचे दिसून येते. त्यामुळे जे विषय पदवीपर्यंत अभ्यासले नाहीत त्यांचाही अभ्यास करणे आवश्यक आहे. विज्ञान शाखेच्या उमेदवारांना अर्थशास्त्र / इतिहासाचा तर अर्थशास्त्राच्या उमेदवाराला विज्ञान /तंत्रज्ञान शाखेचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे विविध शाखांमधील उमेदवारांनी एकत्र येऊन अभ्यास करणे उपयुक्त ठरू शकते. अभ्यासक्रमांमधील विषयनिहाय अशी अधिकृत पुस्तके उपलब्ध नाहीत. काही खासगी कोचिंग संस्थांनी अशी पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांचासुद्धा वापर करता येईल. मात्र अशा पुस्तकांना मर्यादा असतात. त्यामुळे मूळ पुस्तके म्हणजेच पदवीपर्यंतची विद्यापीठाने वा शिक्षण मंडळाने सुचवलेली पुस्तके / ग्रंथ / संदर्भ ग्रंथ अभ्यासणे आवश्यक आहे. विषयनिहाय स्वत:च्या नोट्स तयार करणे अतिशय उपयुक्त ठरते, असा यशस्वी उमेदवारांचा अनुभव आहे. प्रश्नपत्रिकांचा भरपूर सरावसुद्धा आवश्यक आहे. मुख्य परीक्षेसाठी अर्थशास्त्र आणि नियोजन ,विकासाचे अर्थशास्त्र आाणि कृषी विकास, विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास, मनुष्यबळ विकास आणि मानवी हक्क, भारतीय घटना आणि महाराष्ट्राच्या विषेश संदर्भासह, भारतीय राजकारण आणि कायदा, इतिहास आणि भूगोल, मराठी व इंग्रजी (पारंपरिक/वर्णनात्मक आणि वस्तुनिष्ठ ) या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. विषयांच्या या नावांवरूनसुद्धा पदवीपर्यंतच्या सर्व विषयांची तयारी करावी लागते ही बाब स्पष्ट व्हावी. मुख्य परीक्षा नजरेसमोर ठेऊनच पूर्व परीक्षेचा अभ्यास करावा. या परीक्षांमध्ये अधिकाधिक गुण मिळाल्यास मुलाखतीचा तणाव कमी होऊ  शकतो. एकूण गुणांच्या साडेबारा टक्के गुणच मुलाखतीसाठी ठेवण्यात आले असतात. त्यामुळे मुख्य परीक्षेत उत्तम गुण मिळाले तर मुलाखतीत थोडे इकडे तिकडे झाले तरी चांगले पद मिळू शकते. एखाद्या कोचिंग क्लासेसमध्ये सराव मुलाखतीसाठी नाव नोंदवल्यासही फायदा होऊ शकेल.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)

Story img Loader