* मी सध्या एम.ए.च्या पहिल्या वर्षांला आहे. मला राज्य लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पद मिळवायचे आहे. यासाठी कोणत्या पद्धतीने तयारी करावी लागेल?
– बाळू व्ही. बागूल
बाळू, तू सर्वप्रथम राज्य लोकसेवा आयोगाच्या प्राथमिक आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम विस्तृतरीत्या समजून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे तुला अभ्यासाची दिशा निश्चित करणे सुलभ होईल. उमेदवारांच्या मूलभूत ज्ञानाची परीक्षा घेण्याकडे सध्याचा आयोगाचा कल आहे. त्यामुळे हा अभ्यासक्रम सखोल व दर्जेदार पुस्तकांमधून करायला हवा. या परीक्षेला बसणाऱ्या बहुतेक सर्व उमेदवारांची पहिली पसंती उपजिल्हाधिकारी पद हे असते. मात्र या जागा अल्प असतात. शिवाय त्यात राखीव जागासुद्धा असतात. त्यामुळे मुख्य परीक्षा आणि मुलाखतीमध्ये अतिशय उत्तम गुण मिळाल्यासच या पदासाठी नियुक्ती मिळण्याची अधिक संधी असते. उपजिल्हाधिकारी होण्याचा दुसरा मार्ग म्हणजे थेट तहसीलदार पदाच्या निवडीसाठी प्रयत्न करणे. विशिष्ट कालावधीनंतर तहसीलदारांना या पदावर पदोन्नती दिली जाते.
* मी आता बी.ए.च्या पहिल्या वर्षांला आहे. मी आतापासून एमपीएससीची तयारी करणार आहे. तर मी नेमके काय करू?
– भाऊ कारतसकर
भाऊ , तू आतापासूनच एमपीएससीची तयारी करणार असल्याचा निर्धार केला आहे, हे खरोखरच अभिनंदनीय आहे. हा निर्धार असाच कायम ठेव. कारण ही परीक्षा अतिशय कठीण तर आहेच, पण त्यात प्रचंड स्पर्धा आहे. त्यामुळे तुला परिश्रमसुद्धा भरपूर करावे लागतील. ऊर्जा व उत्साह सतत टिकवून ठेवावा लागेल. ही परीक्षा पाठांतराची क्षमता घेणारी नाही. त्यामुळे प्राथमिक आणि मुख्य परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम काळजीपूर्वक अभ्यासावा. विषयानुसार दर्जेदार पुस्तकांची निवड करावी. त्यासाठी आपल्या अध्यापकांची मदत घ्यावी. तुमच्या महाविद्यलयाच्या ग्रंथालयात ही पुस्तके, सदंर्भग्रंथ निश्चितपणे उपलब्ध असतील. त्याचा उपयोग करावा. स्वत:च्या नोट्स काढाव्यात. चालू घडामोडीचे ज्ञान सतत उन्नत करण्यासाठी दर्जेदार नियतकालिके, दैनिके यांचे नियमित वाचन, आकाशवाणी/दूरदर्शनवरील चर्चात्मक कार्यक्रम बघण्याची सवय लावावी. कोणतेही गाइड वा कोचिंग क्लासेसच्या नोट्स या कधीच या परीक्षेतील यशासाठी खात्रीचा मार्ग ठरू शकत नाही,ही बाब लक्षात ठेवावी.