माझा मुलगा केंद्रीय विद्यालयात शिकतो आहे. यावर्षी त्याने दहावीची परीक्षा दिली आहे. १०वीपर्यंत तो सीबीएसई बोर्डात होता. त्याला आम्ही आता आयआयटी जेईईचा क्लास लावला आहे. पण त्याला १०वी, १२वीला एचएचसी बोर्डात प्रवेश घ्यायचा आहे. बोर्ड बदलल्याने नोकरीसाठी भविष्यात काही समस्या निर्माण होऊ शकतात का? नोकरीसाठी आपण कोणत्या बोर्डातून शिकलो, हे किती महत्त्वाचे आहे?
–शरयू अदूरकर
आपण आधी एक गोष्ट ध्यानात घ्यावी की, एचएससी बोर्ड हे अधिकृत बोर्ड आहे. त्यामुळे त्याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. तुमच्या मुलाला भविष्यात नोकरी मिळण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. नोकरीच्या वेळेस मुलाची शैक्षणिक गुणवत्ता, चाळणीपरीक्षेतील गुणक्रमांक अशा बाबी तपासल्या जातात. बोर्ड कोणते आहे, याचा विचार केला जात नाही. देशातील सर्व राज्यांचे शिक्षण मंडळ हे समान दर्जाचे आहेत. त्यामध्ये भेदभाव केला जात नाही.
मी वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे. मला एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियामध्ये काम करायचे आहे. मला करिअरची अशी संधी मिळू शकते का?
–अभिषेक भाळे
अभिषेक, एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियामध्ये केवळ वाणिज्य शाखेच्या पदवीधरांसाठी थेट नोकरीची संधी अभावानेच मिळू शकते. त्यासाठी तुला अतिशय सातत्याने या संस्थेच्या नोकरीविषयक जाहिरातींकडे लक्ष ठेवावे लागेल. संस्थेला वित्तीय व्यवस्थापक, मनुष्यबळ व्यवस्थापक, चार्टर्ड अकाउंटंट, सुरक्षा अधिकारी अशा वरिष्ठ श्रेणीच्या अधिकाऱ्यांची गरज भासते. मात्र त्यासाठी तुला चांगल्या संस्थेतून एमबीए, सीए हे अभ्यासक्रम करून ठेवणे गरजेचे आहे. नागरी सेवा परीक्षेद्वारे आयएसएस वा आयपीएस होणाऱ्या उमेदवारांना प्रतिनियुक्तीवर जाण्याची संधी मिळते. या प्राधिकरणाच्या प्रमुख प्रशासकीय पदांवर आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते.
तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.