मी आता १२ वी कला शाखेची परीक्षा दिली आहे. मला पोलीस उपनिरीक्षक किंवा आयएएसची परीक्षा द्यायची आहे. मी पुढे कशा प्रकारे अभ्यास आणि तयारी करू?
–ऋतुराज गांवकर
ऋतुराज, पोलीस उपनिरीक्षक पदासाठी किमान अर्हता ही पदवी आहे. त्यामुळे तू सध्या १२वीच्या अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करून पुढे चांगल्या गुणांनी पदवी परीक्षा उत्तीर्ण हो. दरम्यानच्या काळात सामान्य अध्ययन, चालू घडोमोडी यांचा अभ्यास सुरू कर. हळूहळू १२वी पर्यंतची शिक्षण बोर्डाची पुस्तके अभ्यासायला लाग. शिवाय पोलीस उपनिरीक्षकपदासाठी शारीरिक चाचणीही घेतली जाते. त्यामुळे तुला तुझी तब्येतही उत्तम राखावी लागेल. आयएएस पदासाठी स्वतंत्र परीक्षा घेतली जात नाही. संघ लोकसेवा आयोगामार्फत नागरी सेवा परीक्षा घेतली जाते. त्यापरीक्षेद्वारे आयएएएस पदासाठी निवडले जाते. या परीक्षेसाठी सुद्धा किमान शैक्षणिक अर्हता पदवी आहे.
मी नुकतीच १२वीची परीक्षा दिली आहे. मला यूपीएससीची परीक्षा द्यायची आहे. पदवी अभ्यासक्रमासाठी मी कोणता विषय घेऊ ? आर्किऑलॉजी विषयातील बी.एस्सी किंवा बी.ए केल्यास हा पर्याय उत्तम ठरू शकेल काय?
– समता शरद कुकडे
यूपीएससीच्या परीक्षेत अमुकच एका विषयात चांगले गुण मिळू शकतात असे कुणीही ठामपणे सांगू शकत नाही. दरवर्षी वेगवेगळ्या विषयांमध्ये उमेदवारांना चांगले गुण मिळतात. पुढच्या वर्षी तसेच घडेल, अशी घडण्याची फार अल्प शक्यता असते. ही परीक्षा उमेदवारांच्या सखोल ज्ञानाची, आकलनाची आहे. उमेदवाराच्या विचारक्षमतेला चालना देणारी आहे. त्यामुळे उमेदवार जो कोणता विषय घेईल त्याचा त्याने परिपूर्ण अभ्यास करणे यूपीएससीला अपेक्षित असते. त्या विषयाच्या अनुषंगाने जागतिक व देशाच्या पातळीवर नव्याने काही संशोधन झाले असेल, नव्या बाबी उघडकीस आल्या असतील, तर त्यांचा अभ्यास करणेही अपेक्षित असते. विषयांच्या अभ्यासाच्या अनुषंगाने उमेदवार समकालीन जागतिक व राष्ट्रीय समस्यांकडे कसा बघतो, हेसुद्धा प्रश्नांच्या उत्तरातून बघितले जाते. ही परीक्षा पाठांतराची वा विद्यापीठीय परीक्षेसारखी नाही ही बाब लक्षात ठेवावी. तुला आर्किऑलॉजी या विषयात रस आणि गती असेल तर हा विषय घ्यायला काहीच हरकत नाही. गेल्या काही वर्षांत आर्किऑलॉजीच्या ज्ञानात सतत भर पडत आहे. नवे उत्खनन, नवे शोध लागत आहेत. त्यामुळे काही ऐतिहासिक बाबींना नवे परिमाण लाभत आहेत, या सर्वाचा अभ्यास करणे आवश्यक राहील.
करिअरसंबंधीचे प्रश्न पाठवा career.vruttant@expressindia.com