मी एम.कॉम.च्या दुसऱ्या वर्षांला आहे. मी अमरावती जिल्ह्य़ात शिकत असून माझे इंग्रजी माध्यम आहे. यापुढे मला करिअरच्या कोणत्या संधी आहेत?

पवन भोसे

पवन, तू जरी अमरावती जिल्ह्य़ात शिकत असलास तरी काही वाटून घ्यायचे कारण नाही. मुंबई किंवा दुसऱ्या कुठल्याही जिल्ह्य़ात एम.कॉम. करणाऱ्या विद्यार्थ्यांला जेवढय़ा संधी असतील तेवढय़ाच तुलाही आहेत. मात्र तू समजूनउमजून अभ्यासक्रम पूर्ण करणे, आवश्यक आहे. फक्त परीक्षार्थी होऊ नकोस. संकल्पना समजून घे. त्यांचा व्यावहारिक वापर समजून घे. या विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवीधरास व्यापार, व्यवसाय आस्थापनांमध्ये चांगली संधी मिळू शकते. त्यासाठी संबंधित उमेदवाराने तसे कौशल्य प्राप्त केलेले असावे. सध्या केवळ विद्यापीठीय परीक्षा उत्तीर्ण होण्यापुरताच अभ्यास केला जात असल्याने एम.कॉम.सारखा व्यावसायिक अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे काय असा प्रश्न पडतो. तुझे तसे नसेल, अशी आशा आहे. व्यावसायिक अकाउंटंट, विमा, बँकिंग, म्युच्युअल फंड सेवा सल्लागार, बॅलन्सशीट तयार करणे अशा संधी उपलब्ध होऊ  शकतात.

 

मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग केले आहे. मला स्पेस सायन्स आणि कॉस्मॉलाजीमध्ये रस आहे. मी पुढे काय करू?

महेश अडसुरे

महेश, तुझ्या आवडीच्या विषयात म्हणेज स्पेस सायन्समध्ये पुढील शिक्षण घेण्यासाठी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न कर. या संस्थेत एम.टेक. आणि पीएच.डी. अभ्सासक्रम चालवले जातात. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तुला ग्रॅज्युएट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट फॉर इंजिनीअर्स -गेट, ही परीक्षा उत्तम गुणाने उत्तीर्ण व्हावी लागेल. या संस्थेतील प्रवेश तुझी स्वप्नपूर्ती करेल आणि चांगले करिअरही घडेल.

संपर्क- संकेतस्थळ  www.iist.ac.in

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)

Story img Loader