हॉटेल मॅनेजमेंट अर्थात उपाहारगृह व्यवस्थापन या अभ्यासक्रमाला सध्या सुगीचे दिवस आलेले आहेत. कारण हॉटेलमध्ये जाणे, या प्रकारातला संकोच नाहीसा होऊन ते प्रतिष्ठेचे झाले आहे. म्हणूनच हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाबद्दल या आठवडय़ात जाणून घेऊ.

‘काय आचारी  व्हायचं आहे काय?’ या कुत्सित प्रश्नापासून ‘अरे वा! तुला शेफ व्हायचं आहे, तर?’ या कौतुकमिश्रित वाक्यापर्यंतचा हा प्रवास सोपा नाही. गेल्या अनेक वर्षांत लोकांच्या मानसिकतेत, विचारांत बदल घडल्यामुळे तो झाला आहे. साधारण  ७०-८० च्या दशकात संपूर्ण देशात अगदी मोजकीच केटरिंग कॉलेजेस होती. ज्यांचा पिढीजात हॉटेल व्यवसाय होता, अशा मुलांनीच तिथे प्रवेश घेणे योग्य मानले जात असे. तरीही बऱ्याचशा घरांतून या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याविषयी नापंसतीच असायची. पंचतारांकित हॉटेलांची दुनिया तर मध्यमवर्गीयांच्या कल्पनेतही नसल्याने या साऱ्यापासून दूरच राहणे बरे, असा सूर असायचा.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

विसाव्या शतकामध्ये जागतिकीकरणामुळे परदेशी ब्रँडची साखळी हॉटेल्स आली आणि अचानक हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाची मागणी वाढली. याच सुमारास केबल टीव्ही आल्याने अनेक परदेशी वाहिन्या घराघरांत दिसू लागल्या. त्यावरील खानपानाचे कार्यक्रमही लोकप्रिय होऊ लागले. आपल्याकडील एका हिंदी वाहिनीवरचा खवय्यांसाठी असलेला एक कार्यक्रम तर अतिशय लोकप्रिय झाला. महत्त्वाचे म्हणजे हा कार्यक्रम महिला नव्हे तर एक उत्कृष्ट पुरुष आचारी करत होता. तो खूप गाजला आणि लोकांच्या मानसिकतेत थोडा बदल व्हायला सुरुवात झाली. बघता बघता हॉटेल मॅनेजमेन्ट कॉलेजेसची संख्याही वाढली. आज, आपण पाहतो, सरकारी हॉटेल मॅनेजमेन्ट कॉलेजेस (IHM – Institute of Hotel Management) प्रत्येक राज्यात आहेतच, शिवाय खासगी कॉलेजांचीही कमी नाही. आयएचएममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी हजारो विद्यार्थी प्रवेश परीक्षा देत असतात. आता सरकारी कॉलेजांत प्रवेश न मिळाल्यास कोणत्या खासगी कॉलेजात प्रवेश घ्यावा, हा प्रश्न सर्वाना पडतो. अनेकदा शैक्षणिक कर्ज घेऊन अभ्यासक्रमावर खर्च केला जातो. मग अपेक्षित पगाराची नोकरी न मिळाल्याने मात्र अनेकांची निराशा होते. अशा वेळी प्रवेश करतानाच नीट चौकशी करा. शिक्षक कसे आहेत, या संस्थेतून कुठे नोकऱ्या दिल्या जातात, मुख्य म्हणजे कोणत्या हुद्दय़ावर जास्त विद्यार्थी नोकरीला लागतात, माजी विद्यार्थी काय म्हणतात, या प्रश्नांच्या उत्तरांवरून अंदाज बांधता येईल.

अर्थात काही विद्यार्थ्यांना वाटते की, हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे मजा. फार काही अभ्यास करावा लागत नाही. इथे काय खाण्या-पिण्याचेच पाहायचे आहे. पण या समजुतीने प्रवेश घेतलेल्यांना हा अभ्यासक्रम चांगलाच धक्का देतो. फूड प्रॉडक्शन, फूड अँड बेव्हरेज सव्‍‌र्हिस, अकोमोडेशन -फ्रंट ऑफिस अँड हाऊस कीपिंग हे मुख्य चार विषय असतात. त्याशिवाय इंग्लिश, हॉटेल अकाऊंटिंग, फायनान्शिअल मॅनेजमेंट, न्यूट्रीशन, हॉटेल इंजिनीअरिंग, कम्प्युटर्स, पर्यटन आदी विषयही या तीन वर्षांत शिकावे लागतात. सोबतच ६ महिने औद्योगिक प्रशिक्षण घ्यावे लागते. या करिअरभोवती जे चकचकाटाचे आभासी वलय असते, ते या प्रशिक्षण कालावधीत खाडकन नाहीसे होते. कारण कोणतीही सार्वजनिक, सणावाराची सुट्टी नाही. १२-१२ तास सतत उभं राहून काम करावे लागते. शारीरिक कष्टाची तयारी असलेल्यांना यातून बरेच काही शिकता येते. डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर आणि पायाला चाके लावून काम करणे, हे या व्यवसायाला अगदी फिट्ट बसते. हॉस्पिटॅलिटीमध्ये करिअर करायचे असेल तर एक प्रयोग करून पाहावा. दहावी,अकरावी आणि बारावीच्या सुट्टय़ांमध्ये कोणत्याही हॉटेलमध्ये(मोठय़ा हॉटेल्समध्ये वयाची अट असू शकते.) किंवा मोठय़ा कॅटररकडे ट्रेनी म्हणून काम करावे. यावेळी आर्थिक मोबदल्याची अपेक्षा ठेवू नका, पण जिथे काम करत आहात ती संस्था किंवा व्यक्ती विश्वासू आणि दर्जेदार असेल इतकेच पाहा. हा अनुभवच तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंटमधील करिअर तुमच्यासाठी योग्य की अयोग्य हे सांगेल.

आजघडीला हॉटेल मॅनेजमेंट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हॉस्पिटॅलिटीच्या पलीकडे या क्षेत्रात वाव आहे. पर्सनल प्रेझेन्टेशन, ग्रूमिंग, शिष्टाचार, ग्राहकांशी आदबीने कसं बोलावं, या सर्वाची तयारी अभ्यासक्रमाच्या तीन वर्षांत केली जाते. अंगावर पडेल ते काम करायची अनेकांना सवय होऊन जाते. अनेक कंपन्यांना कामासाठी तयार माणसे मिळतात.  हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमातील निरनिराळ्या क्षेत्रातील संधींबाबत पुढच्या लेखांतून माहिती घेऊ.

Story img Loader