माझी मुलगी पेट्रोकेमिकल्स पदविकेच्या द्वितीय वर्षांला आहे. पदविका पूर्ण केल्यानंतर तिला पुढे कुठे नोकरी मिळेल? तिने पदवी परीक्षा द्यायलाच हवी का?

राजेंद्र कोकाटे, पाचल राजापूर-रत्नागिरी

राजेंद्रजी, तुमच्या मुलीला पेट्रोकेमिकल्स क्षेत्रातील कंपन्या, नैसर्गिक वायू व तेल उत्खनन कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळू शकते. मात्र या विषयातील पदवी घेतल्यास उत्तम. कारण अशा संधी पदवीधारकांना अधिक मिळतात. आखाती देशातील तेल कंपन्यांमध्येही संधी मिळू शकते.

हे क्षेत्र स्पेशलाइज्ड असल्याने मोठय़ा संख्येने पदभरती केली जात नाही. त्यामुळे या पदाच्या जाहिरातींकडे सातत्याने लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

मी दहावीत शिकत आहे. मला इस्रोमध्ये अंतराळवीर म्हणून काम करायचे आहे. मला कोणत्या विद्यापीठातून शिक्षण घ्यावे लागेल?

संस्कार हजारी

संस्कार, तुझा विचार उत्तमच आहे. पण सध्या तरी इस्रोद्वारे अवकाशात अंतराळवीर पाठविले जात नाहीत. या संस्थेद्वारे उपग्रह आणि विविध प्रकारची क्षेपणास्त्रे अंतराळात सोडली जातात.

अंतराळवीर होण्यासाठी तू सध्या तुझा भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्राचा पाया पक्का कर. बारावीनंतर जेईई परीक्षेद्वारे चांगल्या व दर्जेदार अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून (उदा.-आयआयटी, एनआयटी, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, इंडियन इन्सिटटय़ूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी इत्यादी) मधून बी.टेक. अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न कर. तुला आपोआप मार्ग मिळत राहील.

बी.टेक. केल्यानंतर अमेरिकेतील काही संस्थांमध्ये स्पेस सायन्स आणि टेक्नॉलॉजी अशा विषयांमध्ये एम.एस करून तू नासा (नॅशनल एरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) सारख्या संस्थांमध्ये प्रवेश मिळवू शकतो. त्यातून तुझे अंतराळवीर होण्याचे स्वप्न साकार होऊ  शकेल.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न |career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.

Story img Loader