चांगल्या आवाजासाठी आज अनेक करिअरसंधी आहेत. व्हॉइसओव्हर आणि डबिंगचे क्षेत्र हे नक्कीच एक उत्तम क्षेत्र आहे. या दोन्ही प्रकारात व्यक्तींचा आवाजच त्यांच्यासाठी बोलतो. व्यक्ती कायम पडद्याआड असते पण त्यांचा आवाज हाच हिरो असतो.
अनेकदा कार्टून्स, जाहिराती, लघुपटांसाठी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट वा डबिंग आर्टिस्टची गरज भासते. पण या दोन्हीमध्ये एक लहानसा फरक आहे. डिबगमध्ये पडद्यावर दिसणाऱ्या सजीव, बोलक्या व्यक्तिरेखांना आवाज दिला जातो. तर व्हॉइस ओव्हरमध्ये माहितीपट, शैक्षणिक चित्रपट, वृत्तांत कथन यासाठी आवाज वापरला जातो.
बरेचदा ही दोन्ही कामे तुम्ही स्वतच्या वेळेनुसार आणि आवडीनुसार अर्थात फ्री लान्सर म्हणून करू शकता. लहान मुलांच्या कार्टून्स, अॅनिमेशनपट, कथा, कविता, वाचन यांचे ऑडिओ रेकॉर्डिग, ई-लर्निग क्षेत्रातील व्हिडीओज, ऑडीओज, दूरदर्शन वा आकाशवाणीवरील जाहिराती, प्रबोधनपर माहितीपट, देशी वाहिन्यांवरून प्रसारित होणारे परदेशी वाहिन्यांचे कार्यक्रम, भिन्न प्रांतीय चित्रपट प्रसारण अशा विविध क्षेत्रांतून डबिंग आर्टिस्ट किंवा व्हॉइस ओव्हर आर्टिस्टची गरज भासू शकते.
स्पष्ट उच्चार, मोकळा आवाज, त्यातील चढउतारांची जाण, आत्मविश्वास आणि आवाजावर प्रभुत्व, मेहनत करण्याची तयारी, निरनिराळ्या प्रकारचे आवाज ऐकून त्याची तंतोतंत नक्कल करण्याची अंगभूत आवड, निरीक्षण शक्ती ही स्वभाव वैशिष्टय़े असणारी कोणतीही व्यक्ती या क्षेत्रात स्वत:ला आजमावू शकते.
या क्षेत्रातील प्रशिक्षण देणाऱ्या काही संस्था
- मुंबई व्हॉइस ट्रेिनग सेंटर
http://www.indian-voice-overs.com/mumbai-voice-training.html
- मुंबई फिल्म अकॅडमी
http://www.mumbaifilmacademy.com/voicing-and-anchoring.html
यासोबतच इतर अनेक लहानमोठय़ा संस्था आवाजासंदर्भातील वेगवेगळे अभ्यासक्रम शिकवत असतात. तसेच या क्षेत्रात कार्यरत असणारे काही नामवंतही इच्छुकांना व्यक्तिगत प्रशिक्षण देत असतात.