*  मी बीसीए केले आहे. मार्केटिंगमध्ये एमबीएसुद्धा केले आहे. आता मी एमपीएससीची परीक्षा देणे योग्य ठरेल काय? – विवेक चव्हाण

मार्केटिंगसारख्या विषयात एमबीए केल्यानंतर तुला नोकरी मिळाली नाही, की त्यात तुला रस नाही? असे असेल तर तू एमपीएससीची परीक्षा द्यायला हरकत नाही. तथापि एमपीएससी परीक्षेसाठी लाखाहून अधिक उमेदवार बसतात आणि त्यातून सव्वाशेच्या आसपास उमेदवारांची राज्यसेवेच्या विविध पदांसाठी निवड केली जाते. त्यासाठी प्राथमिक, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांचा सामना करावा लागतो. या सर्व बाबी तुला लक्षात घेऊनच या परीक्षेची तयारी करावी लागेल. मार्केटिंग एमबीए या शैक्षणिक अर्हतेवर चांगल्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या निम्नस्तरीय कंपनीमध्ये संधी मिळत असल्यास स्वीकारणे उचित ठरू शकते, कारण अनुभव मिळाल्यानंतर मार्केटिंग एमबीए केलेल्या उमेदवाराला अधिक चांगल्या संधी मिळू शकतात.

* मी आता बीकॉमच्या दुसऱ्या वर्षांला आहे. मला पुढे फायनान्समध्ये एमबीए करायचे आहे. ते केल्यानंतर मला परदेशात नोकरी मिळेल ? –  जयेश फराटे

फायनान्समध्ये एमबीए केल्यानंतर परदेशात नोकरी मिळू शकते. मात्र त्यासाठी तुम्हाला देशातील टॉप २५ एमबीए शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळवावा लागेल. या संस्थांमध्ये प्लेसमेंटसाठी काही परदेशी कंपन्या येतात. तथापि या कंपन्यांमध्ये निवड होण्यासाठी उत्तम संवाद कौशल्य, सादरीकरण कौशल्य, विषयाचे ज्ञान, चौफेर विकसित झालेले व्यक्तिमत्त्व हवे. यासाठी तुम्ही आतापासूनच प्रयत्न करायला सुरुवात करा.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com  या पत्त्यावर पाठवा.

Story img Loader