मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी सिनेमॅटोग्राफरम्हणून आपला स्वतंत्र ठसा उमटविणारे एक मराठी नाव म्हणजे, महेश लिमये. नटरंग’, ‘बालक-पालकअशा चित्रपटांसोबतच बहुचर्चित पद्मावतमधील साहसदृश्यांची सिनेमॅटोग्राफीही त्यांनी  केली आहे. त्यांच्या करिअरची ही कथा..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेल्या महेश लिमयेचे शिक्षण डोंबिवलीच्या फणसे बाल मंदिर आणि स. वा. जोशी विद्यालयात झाले. त्यांचे आजोबा (आईचे वडील) बॉम्बे फिल्म लॅबमध्ये ‘रसायन तंत्रज्ञ’ म्हणून काम करत होते. त्यांच्या नावाचा दबदबा इतका होता की निवृत्तीनंतरही अनेक ‘सिनेमॅटोग्राफर’ आमचा चित्रपट तुम्हीच करा म्हणून त्यांना सांगायचे. आजोबांचा वारसा महेश यांना मिळाला. महेशने दहावीनंतर जे. जे. कला महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि तेथून  ‘बॅचलर इन फाइन आर्ट’ ही पदवी मिळविली. शेवटच्या वर्षी विशेष अभ्यासाचा विषय म्हणून त्यांनी ‘फोटोग्राफी’ची निवड केली आणि‘पेप्सी कॅन’ हा विषय प्रकल्पासाठी निवडला. विषयाच्या अनुषंगाने स्वत:कडील सर्जनशीलतेचा वापर करून काही वेगळी छायाचित्रे काढली. त्यासाठी पुरस्कारही मिळाला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर छायाचित्रकार म्हणून काम करण्यापेक्षा वेगळे काहीतरी करावे, असे त्यांच्या डोक्यात होते. ‘सिनेमॅटोग्राफर’ म्हणून करिअर करता येईल का, असा विचारही डोक्यात घोळत होता. पण पूर्वानुभव  आणि यशाची खात्री दोन्ही  गोष्टी नव्हत्या. पण आई-वडिलांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यांचे वडील म्हणाले, तू कोणतेही क्षेत्र निवड. हरकत नाही. मात्र जे करशील ते निष्ठेने आणि प्रामाणिकपणे कर.

सुरुवातीच्या काळात महेशने  कलाशिक्षणाचा उपयोग करून चित्र काढणे, भेटकार्ड तयार करून विकणे अशी कामे केली. पुढे निर्माता-दिग्दर्शक शाम रमण्णा यांच्या कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून काम सुरू केले. छोटय़ा-मोठय़ा जाहिरातींसाठी सर्व प्रकारचे काम केले.  अनिल मेहता, विनोद प्रधान, राजा सय्यद, गोपाल शहा अशा नामवंत कॅमेरामन मंडळींचे काम पाहिले. पण तरीही महेशला काही वेगळे करायचे होते. राजा सय्यद यांनी महेशला एखाद्या सिनेमॅटोग्राफरकडे काम करण्याचा सल्ला दिला. तेव्हा महेश म्हणाले, ‘या क्षेत्रातील कोणाशीच माझी ओळख नाही. मग तुमच्याकडेच काम करू का?’ पण सय्यद यांच्याकडे आधीच दोन साहाय्यक म्हणून काम करत होते. मला तिसऱ्या माणसाचा पगार परवडणार नाही, असे सय्यद यांनी सांगितले.  मग पैसे नसतील तरी चालेल,पण अनुभव आणि संधी मिळायला हवी, या उद्देशाने महेशनी काम सुरू केले. कॅमेरामनचे काम, तांत्रिक बाजू आदींची माहिती आत्मसात केली. ‘सिनेमॅटोग्राफर’ म्हणून आज माझे जे काही स्थान  आहे, त्याचे सर्व श्रेय राजा सय्यद यांना असल्याचे महेश मोठय़ा नम्रतेने सांगतात.

या अनुभवाआधारे महेशनी पुढे लहान-मोठय़ा जाहिरातींसाठी ‘सिनेमॅटोग्राफर’ म्हणून काम सुरू केले. याच दरम्यान (२०००) लग्न झाले. पत्नी क्षमा या उच्चविद्याविभूषित. त्या नोकरी करत होत्या. घर, संसार, नोकरी अशा सर्व आघाडय़ा सांभाळण्यापेक्षा एक काहीतरी करायचे असे ठरवून क्षमा यांनी नोकरी सोडली. जेव्हा आपण कोणीही नसतो आणि एखाद्या विशिष्ट क्षेत्रात आपल्याला काहीतरी करून दाखवायचे असते तेव्हा कुटुंबाचा पाठिंबा सगळ्यात महत्त्वाचा असतो, तो पत्नी, आई-वडील आणि घरच्यांकडून महेश यांना नेहमीच मिळाला. ‘सहारा’, ‘स्कोडा’, ‘कोलगेट’ अशा मोठय़ा कंपन्यांच्या जाहिरातींसाठी महेश यांनी ‘सिनेमॅटोग्राफर’ म्हणून काम केले.

त्यांचे जे.जे.कॉलेजमधील मित्र मालन यांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली होती. एका सायकोथ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन ते करणार होते. त्या चित्रपटासाठी महेश यांनी पहिल्यांदा स्वतंत्रपणे ‘सिनेमॅटोग्राफर’ म्हणून काम केले. दरम्यानच्या काळात निर्माते-दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी ‘कॉर्पोरेट’ चित्रपटाची तयारी सुरू केली होती. नवीन ‘सिनेमॅटोग्राफर’ हवा होता.  मधुर भांडारकरना महेशचे काम आश्वासक वाटले आाणि महेशना ‘कॉर्पोरेट’ मिळाला. १९९४ ते २००३ अशी नऊ  वर्षे साहाय्यक म्हणून काम केल्यानंतर त्यांनी पुढे स्वतंत्रपणे कामाला सुरुवात केली. पुढे मराठीत ‘उत्तरायण’, ‘एवढंसं आभाळ’, ‘नटरंग’, ‘बालक पालक’, ‘बाल गंधर्व’ आदी चित्रपट महेशनी केले. सलमान खानच्या ‘दबंग’साठी ‘सिनेमॅटोग्राफर’ म्हणून त्यांना खास बोलावून घेण्यात आले. हिंदीतील ‘बिग बजेट’ आणि ‘१५० कोटी’ क्लबमध्ये गेलेला एक मोठा चित्रपट त्यांच्या नावावर  जमा झाला. विशेष मुलांवर आधारित ‘यलो’ या मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शक म्हणून काम करत हे वेगळे आणि नवे आव्हानही त्यांनी स्वीकारले.  या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ या मोठय़ा चित्रपटांतील साहसदृश्ये महेश यांनी चित्रित केली आणि त्यांच्या नावाचा दबदबा आणखी वाढला. या क्षेत्रातील नवोदितांना ते सांगतात, विचारपूर्वक आपल्या करिअरची वाट निश्चित करा. त्यात झोकून देऊन काम करा. कामात अधिकाधिक अचूकता आणण्याचा प्रयत्न करा. संयम, सतत शिकण्याची आणि निरीक्षण करण्याची वृत्ती अंगी बाणवा. अनुभव सगळ्यात महत्त्वाचा. तो घ्या. थोडय़ाशा यशाने हुरळून जाऊ नका आणि अपयशाने खचूनही जाऊ नका. जी मिळेल ती संधी घ्या. त्याचे चीज करा.

shekhar.joshi@expressindia.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cinematographer mahesh limaye