मनुष्यबळ विकासामधील महत्त्वाच्या संकल्पना समजून घेणे व त्यातील महत्त्वाचे मुद्दे आणि मनुष्यबळ विकासासाठी आवश्यक आरोग्य या मुद्दय़ाच्या तयारीबाबत मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली. आरोग्य हा मनुष्यबळ विकासाठीचा जैविक आयाम आहे तर शिक्षण हा मूल्यात्मक आयाम आहे. ग्रामीण विकास हा यातील भौतिक पलू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिक्षण 

सामाजिक बदलाचे साधन म्हणून शिक्षणाचा विचार करताना मूल्ये व नीतीतत्वे जोपासण्यामध्ये शिक्षणाची महत्त्वाची भूमिका असते हे लक्षात घेणे आवश्यक आहे. केवळ मनुष्यबळ विकासच नव्हे तर मानवी हक्कांची अंमलबजावणीही शिक्षणाच्या माध्यमातून होते. या बाबत चिंतन व विश्लेषणात्मक अभ्यास आवश्यक आहे. भारतातील शिक्षणप्रणालीचा अभ्यास करताना याबाबत विविध आयोगांच्या शिफारसी व त्याप्रमाणे शिक्षण प्रणालीमध्ये करण्यात आलेले बदल यांची व्यवस्थित नोंद घ्यायला हवी.

शासनाच्या आजवरच्या सर्व शैक्षणिक धोरणांचा आढावा घेणे आवश्यक आहे. पूर्वप्राथमिक ते उच्च शिक्षण स्तरापर्यंतच्या प्रवेश, प्रवेश परीक्षा, कालावधी, परीक्षा पद्धती याबाबत मागील दोन वर्षांमध्ये घेण्यात आलेले शासकीय निर्णय माहीत असायला हवेत.

शिक्षण पद्धती किंवा प्रकार –

औपचारिक, अनौपचारिक व प्रौढ शिक्षण या संकल्पना व्यवस्थित समजून घ्यायला हव्यात. अनौपचारिक व प्रौढ शिक्षणाची गरज, स्वरूप, परिणाम, समस्या व उपाय इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत. याबाबतच्या विविध योजना व संस्थांचा आढावा घ्यायला हवा.

प्रत्यक्ष शिक्षण पद्धतीमधील समस्या – गळती, दर्जा, शिक्षकांचे प्रशिक्षण इत्यादींचे स्वरूप, कारणे, परिणाम व उपायांचा अभ्यास गरजेचा आहे. विशेषत: जागतिकीकरण व खासगीकरणाचे शिक्षण पद्धतीवरील सकारात्मक व नकारात्मक परिणाम समजून घ्यायला हवेत. यासाठी वृत्तपत्रे टीव्ही, इंटरनेट इत्यादींमधील चर्चा उपयोगी ठरतील. यामध्येच ई-अध्ययन ही संकल्पना समाविष्ट करावी. ई-अध्ययन उपलब्ध करून देणाऱ्या संस्था माहीत असाव्यात. तसेच या शिक्षणपद्धतीचे फायदे व तोटे समजून घ्यायला हवेत.

वेगवेगळ्या व्यक्तिगटांच्या शिक्षणविषयक समस्या ‘मानवी हक्क’ घटकाचा अभ्यास करताना लक्षात घ्यायला हव्यात. महिला, अपंग, सामाजिकदृष्टय़ा व आíथकदृष्टय़ा मागास प्रवर्ग, अल्पसंख्यांक व आदीम जमाती यांच्या शिक्षणामधील समस्या, त्यांची कारणे, त्यांच्याबाबत असल्यास घटनात्मक तरतुदी, आरक्षणे, शासकीय योजना व त्यांचे मूल्यमापन असा सर्व मुद्दय़ांच्या संकल्पना व तथ्यांच्या विश्लेषणातून अभ्यास आवश्यक आहे. शिक्षणापासून वंचित राहिल्यास या विशिष्ट वर्गावर होणारे परिणामसुद्धा पहाणे आवश्यक आहे.

पारंपरिक व पायाभूत शिक्षण हे मूल्य व नीतितत्त्वाची जोपासणी व मानवी हक्कांची अंमलबजावणी यासाठीचे महत्त्वाचे माध्यम आहे. या प्राथमिक व पायाभूत शिक्षणाची पुढची पायरी म्हणून पारंपरिक महाविद्यालयीन किंवा तांत्रिक / वैद्यकीय / व्यावयायिक शिक्षणाचा मार्ग खुला होतो. या बाबी लक्षात घेऊन व्यावसायिक शिक्षण या अभ्यासाचा घटक कशा प्रकारे करता येईल. तसेच ग्रामीण विकासाची मनुष्यबळ विकासातील भूमिका काय आहे याचा विचार करून अभ्यासाचे नियोजन कसे करावे याबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

भारताच्या Demographic Dividend  चा लाभ देशास व्हावा यासाठी या लोकसंख्येचे कुशल मनुष्य बळामध्ये रूपांतर होणे आवश्यक आहे. व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळाचा विकास प्रत्यक्षपणे व गतीने करता येतो या अनुषंगाने या घटकाचा विचार करणे आवश्यक आहे.

व्यावसायिक शिक्षण  – यामध्ये पारंपरिक व व्यावसायिक शिक्षणामधील फरक समजून घ्यायला हवा. व्यावसायिक शिक्षणाची सुरुवात कोणत्या शैक्षणिक टप्प्यापासून होते हे लक्षात घ्यायला हवे. यातील विविध प्रकारचे अभ्यासक्रम, प्रशिक्षण माहिती करून घ्यावेत. त्यांचे स्वरूप समजून घ्यायला हवेत. यामध्ये प्रवेशासाठीची पात्रता वयोमर्यादा शिक्षणाचा / प्रशिक्षणाचा कालावधी व रोजगाराची उपलब्धता व स्वरूप अशा मुद्यांचा विचार करायला हवा. या मुद्याच्या तयारीची उर्वरीत चर्चा पुढील लेखामध्ये करण्यात येईल.