जीवन विमा, सर्वसाधारण विमा, आरोग्य विमा एकूणच विमा व्यवसायाचा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे अंडररायटिंग प्रॉफिट्स! अंडररायटर ही व्यक्ती जोखीम (risk) व्यवस्थापनाद्वारे विमित करण्यास पात्र (Insurable Risk) जोखीमीचे विश्लेषण (Risk Assessment) करून ग्राहकास तसेच कंपनीस योग्य प्रीमिअम दरात विमा पॉलिसी देणे व त्याद्वारे नफा मिळवून देणे हे जबाबदारीचे काम पार पाडत असते. विमा विनंती अर्जाची स्वीकृती ही कंपनीच्या अंडररायटिंग शाखेच्या संमतीने ठरते. सोप्या शब्दांत सांगायचे तर अंडररायटर हा विमा स्वीकारणारा जोखीम तंत्रज्ञ असून विमा कंपनीचा ‘आधारस्तंभ’ मानला जातो. त्यामुळे कुशल अंडररायटर्सची गरज सदैव विमा क्षेत्रात असते. शिक्षण, अनुभव आणि निर्णयक्षमता यांच्या आधारे दीर्घ मुदतीत यशस्वी करिअरची ‘सुवर्णसंधी’ अंडररायटर शाखेच्या उमेदवारांस उपलब्ध आहे. सांख्यिकी (Statistics) आणि गाणिती (Mathematics) विषयांतील प्रावीण्य तसेच संगणकशाखेतील ज्ञान यांची योग्य सांगड घालून पदवीधर उमेदवारास ‘अंडररायटर’ कार्यक्षेत्राची निवड करता येते.
आरोग्य विमा व जीवन विमा कंपन्यांत आरोग्यविषयक जोखमींची संभाव्यता विशेषज्ञाद्वारे अभ्यासली जाते त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनाही विमा अंडररायटिंग कार्यक्षेत्र निवडता येते. ज्या विद्यार्थ्यांना या क्षेत्राची निवड करायची आहे त्यांनी बारावीच्या परिक्षेनंतर Accounting & Finance विषय निवडून संगणकज्ञानाचा समांतर अभ्यास करावा. वरिष्ठ अंडररायटर्स जागांची नियुक्ती व्यवस्थापकीय अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांतून होते. त्यामुळे एमबीए करताना स्पेशलायझेशनचे विषय विमा व जोखीम व्यवस्थापन निवडणे गरजेचे आहे. बऱ्याच कंपन्या त्यांच्या संस्थात्मक गरजेनुसार प्रशिक्षण देतात, त्यामुळे योग्य कंपनीची निवड करून नोकरी करता करताही कौशल्यगुण विकसित करता येतात. पदवीधर झाल्यावर इन्शुरन्स इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियामधून लायसन्शिएट परीक्षा देऊन अंडररायटिंग पदांकरता अर्ज करता येतो. दीर्घ मुदतीत अनुभव आणि निगडित परीक्षा देत यशस्वी करिअर करता येते.
इन्शुरन्स अंडररायटिंग अभ्यासक्रम – इन्शुरन्स इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया
* डिप्लोमा इन लाइफ इन्शुरन्स अंडररायटिंग
* अॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन लाइफ इन्शुरन्स अंडररायटिंग
* असोसिएट / फेलो एक्झामिनेशन इन लाइफ इन्शुरन्स / जनरल इन्शुरन्स
* लायसेन्शिएट इन लाइफ / जनरल इन्शुरन्स
* ग्रॅज्युएशन विथ अकाउंटिंग अँड फायनान्स, बँकिंग अँड इन्शुरन्स
द अकॅडमी ऑफ लाइफ अंडररायटिंग फेलोशिप एक्झामिनेशन
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम)एमबीए
* रिस्क मॅनेजमेंट अँड इन्शुरन्स स्पेशलायझेशन
* डिप्लोमा इन रिस्क मॅनेजमेंट अँड इन्शुरन्स
लेखिका सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर आहेत.
भक्ती रसाळ fplanner2016@gmail.com