कालानुरूप प्रसारमाध्यमांत उदयाला आलेल्या कार्यक्षेत्रांतील विविध संधींचा मागोवा
अलीकडे भारतीय प्रसारमाध्यमे वेगाने प्रगती करत असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही स्वत:चे स्थान निर्माण करू पाहात आहेत. प्रसारमाध्यमांचे विविध घटक उदा. चित्रपट, जाहिरात क्षेत्र, संगीत आणि नभोवाणी माध्यम यांनी क्रमाक्रमाने सुधारणा करून गेल्या काही वर्षांत लक्षणीय उन्नती केली आहे. कृष्णधवल चित्रपटाचा काळ केव्हाच मागे टाकून आता आपण हाय डेफिनेशन चित्रपट प्रक्षेपणापर्यंत मजल मारली आहे. सध्या या क्षेत्रात बेरोजगारांसाठी कामाच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. मनाला भुरळ पाडणाऱ्या आणि आíथकदृष्टय़ा फायदेशीर अशा या कार्यक्षेत्रात ज्यांना चाकोरी सोडून काम करण्याची आवड आहे अशांसाठी अनेक आव्हानात्मक संधी उपलब्ध आहेत.  
वृत्तनिवेदक- वृत्तनिवेदकाचे काम खरोखरच कोणालाही आवडण्यासारखे, कारण दूरदर्शनवरील वाहिन्यांवरून बातम्या देण्याच्या या कामाभोवती प्रसिद्धीचे वलय आहे. देशातील, जगभरातील बातम्या आणि घटनांची अद्ययावत माहिती दर्शकांना पुरवणे, हे यांचे काम. वेगवेगळ्या बातम्यांचे संकलन करून, सोप्या, अर्थवाही भाषेत श्रोत्यांसमोर सादर करणे हा यांच्या कामाचा प्रमुख भाग असतो. बातम्यांचे सादरीकरण करताना छायाचित्रकारासमोर न गोंधळता प्रेक्षकांसमोर स्वत:ला सुयोग्यरित्या सादर करणे ही यांच्या कामाची अनिवार्य व प्राथमिक गरज असते. तारतम्य बाळगून ऐनवेळी हाती असलेल्या वृत्तांमध्ये फेरफार, सुधार करण्याची समयसूचकता अंगी असणे हेही तितकेच महत्त्वाचे.  
रेडिओ जॉकी- या पेशाअंतर्गत रेडिओ जॉकी वेगवेगळ्या वयोगटांतील श्रोत्यांशी तऱ्हेतऱ्हेची गाणी ऐकवून आणि त्या आनुषंगिक गप्पाद्वारे संवाद साधण्याचे काम करतात. भोवताली घडणाऱ्या दैनंदिन घटना, त्यावर समाजाच्या विविध स्तरांमध्ये उमटणारे पडसाद अजमावण्यासाठी तसेच मनोरंजनातून समाजप्रबोधन घडवण्यासाठी  निरनिराळ्या विषयांवर ‘फोन इन’ कार्यक्रम याच ‘जॉकी’द्वारा सादर केले जातात. ऐकणाऱ्या व्यक्तींचा एक विशिष्ट वयोगट नजरेसमोर ठेवून गाणी आणि गप्पांचा कार्यक्रम आखला जातो. गाण्यांची निवड ही त्यावरच अवलंबून असते. वरवर पाहता हे क्षेत्र हलकेफुलके वाटले तरी यात जम बसविण्यासाठी इच्छुक रेडिओ जॉकी मनाने हौशी, परिवर्तनशील, सर्जनशील, हजरजवाबी व बहुश्रूत, आत्मविश्वासू असणे आवश्यक आहे. कार्यक्रमाच्या मूळ संकल्पनेचे आकलन होणे, प्रभावी संवाद व सादरीकरण कौशल्य, मनाला साद घालणारा आवाज, स्पष्ट वाणी या सर्व गोष्टी कार्यक्रमाला योग्य दिशा आणि लोकप्रियता मिळवून देतात.
स्क्रिप्ट रायटर (संहिता/ पटकथा लेखक)-  दूरदर्शनवरील कोणताच कार्यक्रम, चित्रपट किंवा मालिकेचा भाग उत्तम संहिता किंवा पटकथा असल्याशिवाय प्रेक्षणीय होत नाही. कथाबीजाचे अर्थपूर्ण विस्तारीकरण, कथेच्या गरजेनुसार पात्रनिर्मिती आणि त्यांच्या तोंडी चपखल बसणारे श्रवणीय संवाद लेखन या सर्व गोष्टींची एकत्रित जबाबदारी पटकथा लेखकावर असते. आजूबाजूला घडणाऱ्या दैनंदिन घटनांचा, कल्पनांचा आधार घेऊन कथा अधिकाधिक वास्तवदर्शी घडवणे गरजेचे असते. कोणत्याही दूरदर्शन कार्यक्रमाची किंवा चित्रपटाची यशस्विता त्याच्या पटकथा लेखनावर अवलंबून असते. खरं तर कथेच्या सादरीकरणासाठी योग्य पात्ररचना करणारा आणि प्रभावी संवादांतून त्यांना बोलते करणारा स्क्रिप्ट रायटर किंवा पटकथा लेखकच यशाचा खरा धनी असतो.
छायाचित्र पत्रकारिता (फोटो जर्नालिझम)- सध्याच्या काळात हे क्षेत्र चांगलेच वाढीस लागले आहे. मूळ पत्रकारिता व्यवसायाचा भाग बनत आहे. यांचे काम पत्रकारासारखेच, पण घडलेल्या प्रसंगाला प्रत्यक्ष छायाचित्राची  जोड मिळाल्यामुळे अधिक पारदर्शक आणि प्रभावी होते. या पेशात यशस्वी होण्यासाठी काही तांत्रिक बाबी, अत्याधुनिक यंत्रसामग्री व तत्संबंधी संगणकाचे पुरेसे ज्ञान असणे गरजेचे असते.
जनसंपर्क अधिकारी (पब्लिक रिलेशन)- प्रसारमाध्यमांच्या सरकारी, खासगी कार्यालयांतून या पेशातील व्यक्तींना खूप मागणी असते. माहितीच्या परिणामकारक आदानप्रदानासाठी, कार्यालयीन व ग्राहकांबरोबरच्या सुसंवादासाठी आणि कंपनीबद्दल समाजमनात सुनिश्चित प्रतिमा निर्माण करण्यासाठी यांची गरज भासते. अनेक मोठमोठी हॉटेल्स, टूर आणि ट्रॅव्हल एजन्सी, खासगी सल्लागार कंपन्या जनसंपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करून ग्राहकांशी जोडल्या जातात. परिणामी, ग्राहक संख्या आणि उद्योग वाढवतात.
प्रसारमाध्यमातील नियोजन (मीडिया मॅनेजमेंट)- प्रसारमाध्यमे या एका शब्दात वृत्तपत्रे, मासिक, दूरदर्शन, आकाशवाणी आणि सध्याचे इंटरनेट, उपग्रह वाहिन्या, डिजिटल चॅनल्स या सर्व गोष्टी अंतर्भूत होतात. हे करिअर क्षेत्र थोडे संदिग्ध पण आव्हानात्मक आहे. यात प्रवेश करताना जाहिरात किंवा विपणन (मार्केटिंग) विषयांतील पदवी तसेच प्रसारमाध्यमांतून काम करण्याचा थोडाफार अनुभव आवश्यक आहे.
मीडिया प्लानर – एखाद्या वस्तूच्या, संस्थेच्या किंवा संकल्पनेच्या जाहिरातींसाठी योग्य जागा, योग्य वेळ आणि कालावधी ठरवतात. मोठय़ा खासगी कंपन्यांतून किंवा जाहिरात एजन्सीतून या व्यक्ती काम करतात.
मीडिया स्ट्रॅटेजिस्ट – हे उच्चपदस्थ अधिकारी प्रसारणाच्या कार्यक्रमाचे नियोजन करतात. संस्थेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कार्यप्रणाली आखणे, प्रसारण मोहिमेचे ध्येय निश्चित करणे व ते परिपूर्ण पद्धतीने साध्य करण्यासाठी उपलब्ध शक्यतांचा जास्तीत जास्त वापर करणे हे या व्यक्तींसमोरील प्रमुख लक्ष्य असते.
मीडिया मॅनेजर – या हुद्दय़ावरील व्यक्तींना अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. प्रत्यक्ष प्रसारमाध्यमांत काम करावे लागत असल्याने तेथे निर्माण होणाऱ्या दैनंदिन अडचणी सोडवणे हे प्रमुख काम असते. प्रसारमाध्यमांशी निगडित अशा मोठय़ा कंपन्यांतूनही यांना काम करण्याची संधी मिळते.  
प्रसारमाध्यमातून मनोरंजन – सध्या हा उद्योग जगभर भलताच भरभराटीला आलेला दिसतो. देशाच्या आíथक उन्नतीतूनच या उद्योगाची वाढ शक्य आहे. या उद्योगाला पूरक असे तंत्रज्ञान अधिकाधिक स्वस्त आणि दर्जेदार असणे गरजेचे आहे. स्पेशल इफेक्ट्स, अ‍ॅनिमेशन्स, कॉम्प्युटर मॉडेिलग, इलेक्ट्रॉनिक सिनेमाटोग्राफी, मल्टिप्लेक्स, मल्टिमीडिया टेक्नॉलोजी, डिजिटल तंत्रज्ञान या गोष्टींनी या दृक्श्राव्य माध्यमाचा कायमस्वरूपी कायापालट घडवून आणला आहे.
या तांत्रिक बाबींच्या साहाय्याने परिणाम अधिक कार्यक्षम आणि वाजवी खर्चात मिळतात. उदा. झपाटय़ाने मोठय़ा प्रमाणावर ज्या तंत्राचा वापर सुरू  झाला असे अ‍ॅनिमेशन तंत्र. ऑनलाइन एंटरटेन्मेंट हा नवीन प्रकार मनोरंजन उद्योगाची बाजारपेठ काबीज करत आहे.  
सर्वसाधारणपणे मनोरंजन उद्योग म्हणजे चित्रपट, दूरदर्शन, संगीत आणि पत्रकारिता. या उद्योगाने मजल मारत जागतिक बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणावर शिरकाव केला आहे.
चित्रपटांचे मनोरंजन क्षेत्र – या उद्योग क्षेत्रात कोटय़वधी रुपयांची उलाढाल रोजच्या रोज होत असते. सध्या चित्रपट उद्योगाने स्क्रीन सिनेमांकडून मल्टिप्लेक्स आणि डिजिटल सिनेमा अशी कात टाकली आहे. साहजिकच यासाठी लागणारे नवीनतम ऑडिओ, अ‍ॅनिमेशन तंत्र आणि हे अवगत असणाऱ्या तंत्रज्ञांना चांगलीच मागणी निर्माण झाली आहे.
दूरचित्रवाणी (बातम्या आणि मनोरंजन)- दूरचित्रवाणीवर दरवर्षी अनेक नवीन वाहिन्या दाखल होत असतात. यामागचा खरा उद्देश जाहिरात प्रसारणातून, तसेच दर्शक वर्गणीतून उत्पन्न मिळवणे हा असतो.
रेडिओ –  हे मनोरंजनाचे माध्यम सर्वात जुने, स्वस्त आणि सहज उपलब्ध होण्यासारखे आहे. अर्थातच आजही खेडय़ापाडय़ांतून तसेच शहरांतही याची लोकप्रियता टिकून आहे. पूर्वीच्या आकाशवाणी कार्यक्रमांमध्ये अनेक बदल झाले आहेत, केवळ मनोरंजन एवढाच हेतू न ठेवता, जाहिरातींच्या प्रसारणातून अर्थप्राप्तीही होत आहे.
संगीत – भारतीय मनोरंजन उद्योग संगीताशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. चित्रपट, दूरदर्शन, रेडिओ ही सर्व दृक्श्राव्य माध्यमे संगीताच्या विविध प्रकारांवर अवलंबून आहेत. उदा. शास्त्रीय, वेस्टर्न, जाझ, पॉप, रॉक, िहदुस्तानी वगरे.
वृत्तपत्रे व मासिके – ही पूर्वापार चालत आलेली प्रसारमाध्यमे आजही स्वत:ची अनिवार्यता टिकवून आहेत. या उद्योगाला जाहिराती छपाईतून तसेच वाचक वर्गणीतून उत्पन्न मिळत असते.
तंत्रज्ञानाने मनोरंजन उद्योगात भरपूर बदल घडवले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंटरनेट. यातून या उद्योगाला एक नवी दिशा मिळाली आहे. समाजाच्या विविध थरांपर्यंत पोहोचून टीव्ही आणि रेडिओ यांनी दर्शकांना, श्रोत्यांना आकर्षति केले आहे. अनेक मोठय़ा गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी उद्युक्त केले आहे.
आजकाल या उद्योगात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मात्र, यासाठी तुमची सर्जनशीलता, कामाचे निवडलेले क्षेत्र, या सर्व गोष्टी आवश्यक आहेत. बऱ्याचदा या प्रकारच्या नोकऱ्यांतून आपला छंद, करिअर म्हणून जोपासता येतो.
कामाच्या संधी
कल्पनारम्यतेला भरपूर वाव असणाऱ्या खूप नोकऱ्या या क्षेत्रात उपलब्ध आहेत. लेखक, राजकीय लेखक, पर्यावरणविषयक लेखक, आíथक, ऐतिहासिक लेखक, पत्रकारितेतील संधी, प्रकाशन संस्था, वितरण संस्था, दूरदर्शनवरील बातम्यांच्या वाहिन्या, वृत्तपत्रे, इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या, जाहिरात कंपन्या वगरे.  
मनोरंजन आणि प्रसारमाध्यमे या कार्यक्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सर्जनशीलता, स्वभावातील लवचिकता, संयम, आत्मविश्वास, आकर्षक व्यक्तिमत्त्व, उत्तम शारीरिक क्षमता, भाषेवर प्रभुत्व या सर्व गोष्टी अत्यावश्यक असतात.
ठळक कार्यपदे
निवेदक/ सूत्रधार, अ‍ॅनिमेटर, ऑडिओ इंजिनीअर, कॅमेरामन, क्रिएटिव्ह डायरेक्टर, डान्सर्स, डायरेक्टर्स, एडिटर्स, इव्हेंट मॅनेजर, इलेक्ट्रिशिअन, जर्नालिस्ट, लाइटमेन, मार्केटिंग पीपल, म्युझिशिअन, न्यूजकास्टर्स, ऑनलाइन एडिटर, ऑनएअर प्रमोटर, प्रोडय़ुसर प्रोग्राम डेव्हलपर, क्रिएटर, पब्लिक रिलेशन ऑफिसर, रेडिओ जॉकीज, स्क्रिप्ट रायटर, साऊंड मेन, स्पेशल इफेक्ट एडिटर, टी.व्ही. न्यूज रिपोर्टर, टेक्निकल वर्कर, व्हिडीओ जॉकीज वगरे.
मोठय़ा समूहापर्यंत एखादा अर्थपूर्ण संदेश पोहोचवणे म्हणजेच जाहिरात तंत्र. सामाजिक संदेश, एखादी वस्तू किंवा सेवा, संस्था यांच्यापर्यंत जनमानसाचे लक्ष वेधायचे असेल तर हे तंत्र प्रभावी ठरते. हे उद्योग क्षेत्र बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी तर उत्पन्न करतेच, पण उत्तम अर्थप्राप्तीही करून देते. स्वत:ची सर्जनशील बुद्धी, कार्यक्षमता आणि सांघिक काम असे वापरणाऱ्या युवावर्गाची या क्षेत्रात गरज असते. कामाच्या डेडलाइन पाळण्याच्या प्रचंड दडपणाखाली त्यांना काम करावे लागते. जास्तीत जास्त क्षमतेचा वापर करणे आणि सतत महत्त्वाकांक्षी असणे तुम्हाला यात यश मिळवून देते.
वेगवेगळ्या स्तराचे शिक्षण घेतलेल्या व्यक्ती या क्षेत्रात नियुक्त केल्या जातात. व्यावसायिक पदवी किंवा पदविका शिक्षणाने या नोकऱ्यांतील प्रवेश सोपा होतो. उत्तम संवादकौशल्य असेल तर फारच उत्तम.
जाहिरात क्षेत्रातील एजन्सीजमधून विशिष्ट विभागात काम करण्यासाठी लागणाऱ्या शैक्षणिक क्षमता
* क्लायंट सíव्हसिंग- पदव्युत्तर पदविका किंवा एम.बी.ए. मार्केटिंग
* स्टुडिओ- बी.एफ.ए. किंवा एम.एफ.ए.
* मीडिया- जर्नालिझम, मास कम्युनिकेशन किंवा एम.बी.ए.
* फायनान्स- सी.ए.,आय.सी.डब्ल्यू.ए.,एम.बी.ए. (फायनान्स)
* चित्रपट- स्पेशलायझेशन इन ऑडिओ व्हिजुअल्स
*  प्रॉडक्शन- अ कोर्स इन िपट्रिंग आणि प्री-प्रेस प्रोसेसेस
यातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इंटर्नशिप करणे गरजेचे असते.
सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जाहिरात क्षेत्रात पाय रोवण्यासाठी तुमच्यात क्रियाशीलता असणे फार महत्त्वाचे, मग ती कोणत्याही स्वरूपाची असू शकते. उदा. भाषा, संवादकौशल्य, चित्रकारिता, नावीन्यपूर्ण संकल्पना वगरे. यातील पदव्युत्तर शिक्षणासाठी कोणत्याही शाखेतून कमीत कमी ५०% गुणांनी पदवी प्राप्त असणे गरजेचे आहे. यातील अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा तसेच मौखिक चाचणी आवश्यक असते. काही शिक्षण संस्था या विषयातील पदवी अभ्यासक्रमही राबवितात.
उत्साही, सकारात्मक विचारांच्या, कल्पक, हौशी त्याचबरोबर एकाच वेळी अनेक कामे हाताळण्याचे कसब अंगी बाळगणाऱ्या व्यक्तींसाठी जाहिरात क्षेत्र प्रगतीसाठी योग्य ठरू शकते. ग्राहकांच्या मागण्या किंवा गरजा लक्षात घेऊन, निर्णय घेणे हे यांच्या कामात फार महत्त्वाचे, या विषयांतील शिक्षण देणाऱ्या संस्था खालील प्रकारच्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या स्वभावात बाणवण्याचा प्रयत्न करतात.
प्रभावी संवाद कौशल्य, सादरीकरण, नियोजन, सांघिकता, नेतृत्व गुण, आत्मविश्वास, स्पर्धात्मक वृत्ती, चिकाटी वगरे.
भारतातील बहुतेक देशी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना उच्चशिक्षित आणि अनुभवी मनुष्यबळाची त्यांच्या जाहिरात विभागासाठी गरज असते, अर्थात कल्पकता आणि अंगभूत क्षमतांना शिक्षणाच्या मर्यादा नसतात, हेही तितकेच खरे.
मुद्रा इन्स्टिटय़ूट, अहमदाबादसारख्या संस्थेतून शिकण्यासाठी एक लाखापर्यंत खर्च येऊ शकतो. मात्र इतर सरकारी शिक्षण संस्थांतून हाच खर्च मामुली असतो.
या क्षेत्रात शिष्यवृत्तीवर शिक्षण पूर्ण करण्यासाठी उत्तम शैक्षणिक प्रगती आवश्यक असते.
प्रत्येक जाहिरात कंपनीच्या आकारमानाप्रमाणे तेथे दिल्या जाणाऱ्या पगाराचा आकडा बदलत जातो. उमेदवाराची कल्पनाशक्ती, मेहनत करण्याची तयारी, शिक्षण, अनुभव या सर्व गोष्टींवर त्याचे वेतन अवलंबून असते. या क्षेत्रात अंगच्या गुणांच्या जोरावर तुम्ही सहज वरच्या पदांवर बढती मिळवून चांगली अर्थप्राप्ती करू शकता.
मागणी आणि पुरवठा- सक्षम आणि कुशल उमेदवारांना या क्षेत्रात नेहमीच खूप वाव असतो. ग्राहक सेवा पुरविण्याच्या कामात एम.बी.ए. शिक्षित व्यक्ती महत्त्वाची भूमिका बजावतात. सर्जनशीलता, कल्पनाशक्ती या कौशल्यांना येथे कायम मागणी असते.
अर्थव्यवस्थेतील सहभाग
विपणन क्षेत्रातील स्थान- जगभर आíथक मंदीचे सावट असले तरी भारतीय अर्थव्यवस्था आणि त्यातही जाहिरात क्षेत्र प्रगतिपथावर आहे. व्यापार उदिमातील भरभराटच या क्षेत्राला बरकत आणू शकते. भारतीय तरुणांकडे असलेली वैशिष्टय़पूर्ण कल्पकता, क्रियाशीलता यांमुळे देशात आणि विदेशात नोकरीसाठी मुबलक संधी शक्य असतात.
जागतिक बाजारपेठेतील स्थान
भारतीय जाहिरात उद्योगाच्या ध्येय आणि धोरणांची आणि दृष्टिकोनाची जगभर दखल घेतली जात आहे. आज भारतीय जाहिरात कंपन्यांनी देशी तसेच विदेशी ग्राहकांची कामेही मिळवली आहेत. क्लायंट मीडिया प्लािनग, सíव्हसिंग, मीडिया बाियग, प्री पोस्ट कॅम्पेन अ‍ॅनालिसिस, क्रिएटिव्ह कन्सेप्ट, मार्केट रिसर्च, ब्रांडिग या अशा सेवा ग्राहकांना पुरवल्या जात असल्याने, जागतिक बाजारपेठेत भारतीय जाहिरात उद्योगाला नक्कीच मागणी असेल.
आता आपण या कार्यक्षेत्रातील नोकऱ्यांचे फायदे आणि तोटे पाहूया. लाभ म्हणजे आव्हानात्मक स्वरूपामुळे कामाचे समाधान, सर्वागीण प्रगतीसाठी योग्य क्षेत्र, उत्तम मासिक प्राप्ती व शिवाय इन्सेन्टिव्ह, जाहिरात क्षेत्रातील प्रतिष्ठित, लोकप्रिय व्यक्तींना भेटण्याची संधी, तर तोटे म्हणजे कामाचे प्रदीर्घ तास व वेळेत काम पूर्ण करण्याचे दडपण,
जाहिरात क्षेत्रात दोन महत्त्वाचे स्तर म्हणजे एक्झिक्युटिव्ह व क्रिएटिव्ह.
एक्झिक्युटिव्ह, क्लायंट सíव्हसिंग, मार्केट रिसर्च आणि मीडिया रिसर्च या गोष्टी अपेक्षित असतात. ग्राहकांच्या गरजा ओळखून त्याप्रमाणे कामे करवून घेणे त्याचप्रमाणे नवनवीन ग्राहक हेरत राहणे, योग्य गोष्टीसाठी योग्य प्रसारमाध्यमाची निवड करणे. याबरोबरच या गोष्टींशी निगडित आíथक बाबीही सांभाळणे व काम करत असलेल्या कंपनीचा फायदा करून देणे.
क्रिएटिव्ह टीम- या समुहात कॉपीरायटर, स्क्रिप्टरायटर, व्हिजुअलायझर्स, क्रिएटिव्ह डायरेक्टर्स, फोटोग्राफर, टायपोग्राफर, अ‍ॅनिमेटर वगरे. प्रत्यक्ष जाहिरात बनवण्याचे काम या लोकांकडून केले जाते. जाहिरातीला आवाज देण्याचे व प्रदर्शनयोग्य करण्याचे कामही याच टीमकडून होते.
वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या जाहिरातींचे तंत्र वेगवेगळे असते. आपल्या क्षमतेप्रमाणे आपण ते निवडू शकतो. प्रसारमाध्यमे, जाहिरात, जनसंपर्क या क्षेत्रांत येण्यासाठी इंटर्नशिप आवश्यक असते. येथे कल्पनाशक्ती व नवनवीन संकल्पनांना खूप मागणी आहे. उत्तम संवादकौशल्य, तुमच्या अभ्यास विषयातील नामांकित शिक्षण संस्थेतून घेतलेले शिक्षण या गोष्टींना या क्षेत्रात नोकरी मिळविताना खूपच महत्त्व आहे.              
अनुवाद – गीता सोनी
geetacastelino@yahoo.co.in

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा