कौन सी बात कहां कैसी कही जाती है
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ये तरीका हो तो हर बात सुनी जाती है।
उर्दू शायर वसीम बरेलवी यांच्या या दोन ओळींच्या शायरीतून संवाद कौशल्याचे महत्त्व पुरते स्पष्ट होते. स्पर्धा परीक्षांच्या मुलाखतीत विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना तुमचे विचार आणि दृष्टीकोन यांसोबत तुम्ही किती प्रभावीपणे तुमचे म्हणणे मांडता यावर मुलाखतीतील यश अवलंबून असते.
उमेदवारांचा अभ्यास, व्यासंग, संपादन केलेले ज्ञान आणि माहिती कितीही चांगली असली तरी ती माहिती, ज्ञान मुलाखत मंडळासमोर मांडण्याची शैली प्रभावी नसेल तर अपेक्षित परिणाम साधता येत नाही. प्रभावी अभिव्यक्तीद्वारे अपेक्षित परिणाम साधला जातो. पण अभ्यास तोकडा असेल तर नुसत्या प्रभावी शैलीद्वारे काहीही साध्य होणार नाही हेही तितकेच खरे. मुलाखत ही तुमच्या व्यक्तिमत्वाची चाचणी आहे. याद्वारे तुमचा अभ्यास आणि ज्ञानसंपन्नता तपासली जाणार आहे. पण प्रभावीपणे संवाद साधण्याच्या कौशल्याशिवाय व्यक्तिमत्वाची ओळख पूर्ण होत नाही. मुलाखतीदरम्यान उमेदवार उत्तर काय देतो याला जितके महत्त्व आहे तितकेच ते तो कसे मांडतो यालाही आहे. तुमचे शब्द हे तुमच्या विचारांचा आरसा असतात. उत्तम अभ्यासाला प्रभावी संवादकौशल्याची जोड असेल तर यश नक्की मिळते.
प्रश्नाचे उत्तर देताना उमेदवाराचे वाक्चातुर्य, मानसिक सतर्कता या गुणांची पारख उमेदवाराच्या उत्तरांतून मुलाखत मंडळाचे सदस्य करत असतात. प्रभावी संवादकौशल्यात वाककौशल्य आणि श्रवणकौशल्य या दोन्ही बाबींचा समावेश होतो. आपले उत्तर देण्यापूर्वी अथवा मत व्यक्त करण्यापूर्वी मुलाखत मंडळाचा प्रश्न नीट ऐकून घेणे, समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. शांतपणे प्रश्न ऐकून घ्यावा. व्यवस्थित समजून घ्यावा आणि मगच उत्तर द्यायला सुरुवात करावी. प्रश्न विचारला जात असताना मध्येच बोलू नये. मुलाखत मंडळातील सदस्य बोलत असतील तेंव्हा त्यामध्ये व्यत्यय येईल अशा प्रकारे बोलू वा हातवारे करु नयेत. प्रश्न अर्धवट ऐकून, समजून न घेता थेट उत्तर द्यायची किंवा मत मांडायची घाई अजिबात करु नये. प्रश्न विचारणाऱ्या सदस्याकडे पाहत प्रश्न ऐकावा. यातून तुमचे गांभीर्य तर कळतेच शिवाय तुम्हाला प्रश्न समजून घ्यायचा आहे, हेही मुलाखत मंडळाच्या लक्षात येते. प्रश्न व्यवस्थित ऐकल्यानंतर मुलाखत मंडळाला कोणते उत्तर अपेक्षित आहे याचा विचार करावा. योग्य शब्दाचा वापर करुन प्रश्नाला अनुरूप असे थोडक्यात उत्तर द्यावे.
काही वेळा उमेदवाराला विचारलेल्या प्रश्नाचा रोख कळत नाही. त्यामुळे उत्तर देणे कठीण होते. अशा वेळेस आपल्याला प्रश्नाचा नेमका रोख कळाला नसल्याचे मान्य करुन प्रश्न विचारणाऱ्या मुलाखत मंडळ सदस्याकडून त्याबाबत पुन्हा तपशील विचारावा. प्रश्न नेमकेपणाने कळल्यावर मगच उत्तर द्यावे. प्रश्नाच्या अनुषंगाने महत्त्वाचा भाग सुरुवातीला मांडून शक्य तेवढे परिपूर्ण उत्तर द्यावे. उत्तरातील माहिती अपूर्ण असू शकते आणि मुलाखत मंडळ सदस्यांच्या ते गृहीतातही असते. पण तुमची माहिती अपूर्ण असली तरी उत्तर पूर्ण असायला हवे. यासाठी तुमच्या उत्तराची सुरुवात व समारोप व्यवस्थितपणे व्हायला हवेत. मात्र या सर्व बाबींमध्ये अनावश्यक वेळ खर्च होणार नाही याची काळजी घ्या. ज्या बाबत आपल्याकडे माहिती नाही त्याबाबत विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा नम्रपणे तसे कबूल करावे. यातून उमेदवाराबद्दल नकारात्मक मत बनवून घेतले जात नाही.
एका मुलाखतीमध्ये उमेदवाराला व्हिटॅमिन ‘बी’ चे स्त्रोत आणि त्याच्या अभावाने होणारे रोग यांची माहिती विचारली गेली. उमेदवाराने ‘बी’ ऐवजी ‘डी’ ऐकून सूर्यप्रकाश, मुडदूस वगरे माहिती
एकदम आत्मविश्वासाने दिली. त्यावर प्रश्नकर्त्यां सदस्याने तुमची याबाबत खात्री आहे का? असे विचारल्यावर काहितरी गोंधळ झाल्याचे उमेदवाराच्या लक्षात आले आणि त्याने नम्रपणे पुन्हा विचारण्याची विनंती केली. ‘बी’ व ‘डी’ च्या उच्चारातील साम्यामुळे गोंधळ झाल्याचे लक्षात आल्यावर सदस्याच्या चेहऱ्यावरही स्मित उमटले आणि मुलाखत सुरळीतपणे पार पडली.
प्रश्न ‘ऐकणे’ यामध्ये तो व्यवस्थित समजून घेणेही समाविष्ट आहे. हे उमेदवारानी लक्षात घ्यायला हवे. ‘गांधीजी नसते तर भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये कोणता फरक पडला असता?’ या प्रश्नाचे उत्तर देताना ‘गांधीजींचे योगदान’ सांगणे अपेक्षित नाही तर त्यांच्या योगदानाचे भारतीय स्वातंत्र्य चळवळींतील विचारप्रवाहांपेक्षा वेगळेपण कोणते हे मांडणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रश्न ‘नीट ऐकणे, समजून घेणे’ व मगच उत्तर देणे प्रभावी मुलाखतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.