स्पर्धा परीक्षांच्या मुलाखतीत विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना तुमचे विचार आणि दृष्टिकोन यांसोबत तुम्ही किती प्रभावीपणे तुमचे म्हणणे मांडता यांवर मुलाखतीतील यश अवलंबून असते.
कौन सी बात कहाँ कैसी कही जाती है
ये तरीका हो तो हर बात सुनी जाती है
उर्दू शायर वसीम बरेलवी यांच्या या दोन ओळींच्या शायरीतून संवादकौशल्याचे महत्त्व पुरते स्पष्ट होते. उमेदवाराचा अभ्यास, व्यासंग, संपादन केलेले ज्ञान, माहिती कितीही चांगली असली तरी ती माहिती, ज्ञान मुलाखत मंडळासमोर मांडण्याची शैली प्रभावी नसेल तर अपेक्षित परिणाम साधता येत नाही. प्रभावी अभिव्यक्तीद्वारे अपेक्षित परिणाम साधला जातो. अर्थात अभ्यास तोकडा असेल तर नुसत्या प्रभावी शैलीद्वारे काहीही साध्य होणार नाही, हेही तितकेच खरे, कारण मुलाखत ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाची चाचणी आहे. याद्वारे तुमचा अभ्यास आणि ज्ञानसंपन्नता तपासली जाणार आहे, पण प्रभावी संवादकौशल्याशिवाय ‘प्रभावी व्यक्तिमत्त्वाची’ ओळख पूर्ण होत नाही. मुलाखतीदरम्यान उमेदवार उत्तर ‘काय’ देतो याला जितके महत्त्व आहे, तितकेच ते तो ‘कसे’ मांडतो यालाही आहे. तुमचे शब्द हे तुमच्या विचारांचा आरसा असतात. उत्तम अभ्यासाला, प्रभावी संवादकौशल्याची जोड असेल तर यश नक्की मिळते.
प्रश्नाचे उत्तर देताना..
मुलाखतीद्वारे उमेदवाराचे वाक्चातुर्य (Speech Manerism) मानसिक सतर्कता (Mental firmness) या गुणांची पारख उमेदवाराच्या उत्तरांतून मुलाखत मंडळाचे सदस्य करत असतात. प्रभावी संवादकौशल्यात वाक्कौशल्य आणि श्रवणकौशल्य या दोन्ही बाबींचा समावेश होतो. आपले उत्तर देण्यापूर्वी अथवा मत व्यक्त करण्यापूर्वी मुलाखत मंडळाचा प्रश्न नीट ऐकून घेणे, समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. शांतपणे प्रश्न ऐकून घेत उत्तर द्यायला सुरुवात करावी. प्रश्न विचारला जात असताना मध्येच बोलणे, मुलाखत मंडळ सदस्यांचे बोलणे थांबवणे, प्रश्न अर्धवट ऐकून उत्तर द्यायला सुरुवात करणे हे सर्व टाळावे. प्रश्न ऐकल्यानंतर, मुलाखत मंडळाला कोणते उत्तर अपेक्षित आहे, याचा विचार करून प्रश्नाला अनुरूप असे संक्षिप्त उत्तर द्यावे. बोलताना लय बिघडू देऊ नका, खूप विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. काही वेळा उमेदवाराला विचारलेल्या प्रश्नाचा रोख कळत नाही, त्यामुळे उत्तर देणे कठीण होते. अशा वेळेस नम्रतेने पुन्हा प्रश्न जाणून घ्यावा. उत्तरातील महत्त्वाचा भाग, प्रश्नानुरूप सुरुवातीला मांडावा. उत्तर पूर्ण करतानाही योग्य पद्धत अनुसरावी. उत्तर संपल्याचे व्यवस्थित निदर्शनास आणून द्यावे. माहिती अपूर्ण असू शकते, पण उत्तर पूर्ण असायला हवे.
मानसिक दृढतेचे मूल्यांकन
उमेदवाराची विचारांची बठक किती पक्की आहे, तो आपल्या विचारांप्रति किती प्रामाणिक आणि ठाम राहतो, याची चाचपणी मुलाखतीद्वारे केली जाते. मुलाखत मंडळाचा सदस्य एखाद्या विषयावर आपले मत व्यक्त करून, याविषयी तुम्हाला काय वाटते, तुमचे मत काय, असे उमेदवाराला विचारतात. अशा वेळी उमेदवाराने डोळे झाकून त्यांच्या मताशी सहमती दर्शवणे बंधनकारक नसते किंवा मुलाखत मंडळाच्या मताशी विरोधी मत मांडूनच आपली छाप पाडता येते, असेही नाही. मुलाखत मंडळाच्या मतावर उमेदवाराने आपले सुसंगत, संतुलित आणि प्रभावी मत व्यक्त करायला हवे. उदाहरणार्थ- दयामरण, समलंगिकता, लिव्ह इन रिलेशनशिप यांसारख्या संवेदनशील मुद्दय़ांवर उमेदवारांना त्यांचे मत विचारले जाऊ शकते किंवा सर्वोच्च न्यायालयाने, अथवा उच्च न्यायालयाने एखाद्या सामाजिक विषयावर दिलेल्या निर्णयाबाबत तुमचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. अशा वेळी तुमचा दृष्टिकोन आणि विचार स्पष्ट असायला हवेत.
गतवर्षी राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखतीत एका उमेदवाराला प्रश्न विचारला गेला होता- शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयी एका लोकप्रिय दैनिकात अग्रलेख प्रसिद्ध झाला होता, त्याविषयी तुम्हाला कल्पना आहे का? उमेदवाराने ‘हो सर!’ म्हणून लगेचच त्या अग्रलेखाचे शीर्षकही सांगितले. उमेदवाराची सतर्कता आणि चालू घडामोडींविषयीची जाण पाहता नंतरची दहा मिनिटांची मुलाखत त्या एकाच विषयावर रंगली.
मुलाखत मंडळाचे सदस्य तुमच्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन अंगीकारत असतील अथवा असहमती दर्शवत असतील तर लगेचच तुमचे मत बदलू नका. नम्रपणे तुमचे मत मांडण्याचा प्रयत्न करा. नम्र असावे, पण शरणागत वृत्ती नसावी. ‘तुमचे बरोबर आहे, पण याही दृष्टीने विचार करता येईल’ अशी वाक्यरचना करून मुद्दा वेगळ्या शब्दांत मांडता येईल. पण कोणत्याही परिस्थितीत अडेलपणा करू नका. वाद घालू नका.
व्यक्तित्वमूलक चाचणीच्या माध्यमातून उमेदवाराचा हजरजबाबीपणा तपासला जातो. काही हलकेफुलके उमेदवाराच्या कल्पकतेला वाव देणारे, साधे प्रश्नही विचारले जातात. पण अशा प्रश्नांना सामोरे जाताना सावधानता बाळगली पाहिजे. सतर्क राहून उत्तरे दिली पाहिजेत. ‘जर तुम्हाला एका दिवसासाठी मुख्यमंत्रीपद मिळाले तर..?’ ‘एक दिवसासाठी तुम्हाला जिल्हाधिकारी पद मिळाले तर..?’ ‘कुशल प्रशासक कसा असावा?’, ‘परमेश्वराने तुम्हाला वरदान मागायला सांगितले तर तुम्ही काय मागाल?’ अशा प्रकारचे प्रश्न विचारून मुलाखत मंडळाचे सदस्य तुम्हाला कल्पनाविश्वात भराऱ्या मारण्यासाठी अवकाश उपलब्ध करून देतात. पण उमेदवारांनी या प्रश्नांची वस्तुनिष्ठ उत्तरे द्यायला हवी.
मुलाखत म्हणजे ‘ग्रििलग सेशन’ नव्हे किंवा वाद-विवादाचे, खंडनाचे व्यासपीठ नव्हे. प्रभावी संवादाद्वारे स्वत:ची मते, विचार स्पष्टपणे मांडून प्रशासकीय सेवांच्या दालनात प्रवेश करण्याची एक संधी आहे.
(पूर्वार्ध)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा