केंद्रीय विद्युत रसायन संस्था, कराईकुडी

तामिळनाडू राज्यातील कराईकुडी येथे सेंट्रल इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट (सीईसीआरआय) म्हणजेच केंद्रीय विद्युतरसायन संशोधन संस्था आहे. ही संस्था विद्युतरसायनशास्त्र या विषयामध्ये मूलभूत आणि उपयोजित संशोधन करते. सीईसीआरआय ही सीएसआयआरशी (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) संलग्न संशोधन संस्था आहे. तिचे मुख्यालय कराईकुडी येथे आहे तर चेन्नई, कोचीन, मंडपम आणि तुतीकोरिन या ठिकाणी संस्थेची चार विस्तार केंद्रे आहेत. सीईसीआरआयने भारतीय इलेक्ट्रोकेमिकल उद्योगासाठी आवश्यक तंत्रज्ञानाच्या अनेक तंत्रांसाठी एक प्रमुख व्यासपीठ (लाँचिंग पॅड) म्हणून काम केलेले आहे.

संस्थेविषयी

सेन्ट्रल इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट ही विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर)च्या राष्ट्रीय प्रयोगशाळांच्या श्रृंखलेतील एक महत्त्वाची प्रयोगशाळा व संशोधन संस्था आहे. सेन्ट्रल इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट (सीईसीआरआय) या संशोधन संस्थेची पायाभरणी दि. २५ जुलै १९४८ रोजी तामिळनाडूतील कराईकुडी येथे झाली तर जानेवारी १९५३ मध्ये ही संस्था अस्तित्वात आली. फक्त विद्यापीठ स्तरावर स्वतंत्रपणे इलेक्ट्रोकेमिस्ट्री विषयातील संशोधन न होता ते एखाद्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून एकत्रितपणे व्हावे व त्याचा लाभ विद्यापीठ व तत्सम शैक्षणिक व संशोधन संस्थांनाही व्हावा, हा यामागचा प्रमुख हेतू होता. शिवाय त्यावेळी नुकतेच स्वातंत्र्य मिळालेल्या भारताच्या उभारणीमध्येही या संशोधन संस्थेच्या माध्यमातून हातभार लागावा, या हेतूने अलगप्पा चेट्टियार यांनी संस्थेच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला. १९४८ साली ३०० एकर जमीन आणि पंधरा लाख रोख रक्कम त्यांनी देऊ केली.

गेल्या पन्नास वर्षांपासून सीईसीआरआय केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण दक्षिण-पूर्व आशियामधील इलेक्ट्रो केमिकल सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीमधील सर्वात मोठी आणि प्रमुख संशोधन, विकास संस्था म्हणून ओळखली जाते. कराईकुडीमध्ये संस्थेचा विस्तीर्ण परिसर जवळपास ३०० एकरापेक्षाही अधिक क्षेत्रफळावर पसरलेला आहे. याशिवाय, चेन्नई, कोचीन, मंडपम आणि तुतीकोरिन या इतर चार ठिकाणी संस्थेने आपल्या चार विस्तार केंद्रांची स्थापना केलेली आहे. आजपर्यंत संस्थेच्या नावावर ७५० पेटंट्स, २५० प्रक्रिया, ६०० प्रायोजित आणि अनुदान-अंतर्गत प्रकल्प आणि ४५० परवानाधारक आणि  ५५०० संशोधन आणि पुनरावलोकन निबंध (research and review papers) जमा आहेत. एकूणच सीईसीआरआयच्या कार्याचा आढावा घेतल्यावर लक्षात येते की, या संस्थेने खरोखरच भारतीय विद्युतरासायनिक उद्योगासाठी प्रमुख व्यासपीठ  (लाँचिंग पॅड) म्हणून काम केलेले आहे.

संशोधनातील योगदान

विद्युतरसायनशास्त्राबरोबरच इथे विज्ञान व अभियांत्रिकीच्या इतर शाखांमधील आंतरविद्याशाखीय संशोधनसुद्धा (Interdisciplinary research) केले जाते. या सर्व शाखांमधील संशोधन समन्वयाने चालावे यासाठी संस्थेने संशोधनाच्या सोयीने विविध विभागांची रचना केलेली आहे. या विभागांच्या साहाय्याने संस्थेने देश-विदेशातील अनेक बाह्य़ प्रकल्प हाती घेऊन ते यशस्वीपणे पूर्ण केलेले आहेत. सीईसीआरआय गेली अनेक वर्षे फ्युएल सेल्स, मरीन करोजन अ‍ॅण्ड ऑफशोअर करोजन टेस्टिंग, करोजन सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग, इलेक्ट्रोकेमिकल मटेरियल सायन्स, फंडामेंटल इलेक्ट्रोकेमिस्ट्री, इलेक्ट्रोमेटलर्जी, इंडस्ट्रियल मेटल फिनिशिंग, नॅनोस्केल इलेक्ट्रोकेमेस्ट्री, क्लोर अल्कली, करोजन अ‍ॅण्ड मटेरियल प्रोटेक्शन, इलेक्ट्रो प्लेटिंग अ‍ॅण्ड मेटल फिनिशिंग टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रो पायरो मेटलर्जी, इलेक्ट्रो केमिकल पॉवर सोर्सेस, इलेक्ट्रो ऑरगॅनिक इलेक्ट्रोडिक्स अ‍ॅण्ड इलेक्ट्रोकॅटॅलिसिस, इलेक्ट्रोहायड्रो मेटलर्जी, इलेक्ट्रोकेमिकल पोल्युशन कंट्रोल या विषयांवर संशोधन करत आहे. या संस्थेचे  संशोधन हे विद्युतशास्त्रीय तंत्रज्ञानातील नावीन्यपूर्ण कल्पनांच्या विकासाचा ध्यास आणि नवीन व सुधारित उत्पादन,  प्रक्रिया यांसाठी जगभर गौरवले गेलेले आहे. संस्थेचे संशोधन फक्त भारतापुरतेच मर्यादित न राहता, बरेचसे प्रकल्प परदेशातील नामांकित प्रयोगशाळांच्या सहकार्याने चालवले जातात. याशिवाय अणुऊर्जा, संरक्षण, पर्यावरण, अवकाश संशोधन, वाहतूक आणि महासागरांच्या विकासासारख्या सरकारी संशोधन-विकास कार्याकरिता महत्त्वाची विविध शासकीय आस्थापने सीसीआरआयच्या संशोधनाची मदत घेतात.

मूलभूत आणि उपयोजित संशोधनाव्यतिरिक्त, सीईसीआरआर विद्युतशास्त्रीय तंत्रज्ञानावर आधारित बाबींचे सर्वेक्षण करून आणि सल्लागार प्रकल्प उपक्रम राबवून विविध उद्योगांना मदत करते. तसेच, संस्थेच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्र व शैक्षणिक संस्था यांच्या फायद्यासाठी शॉर्ट-टर्म रीफ्रेशर कोर्सेसदेखील चालवते.

विद्यार्थ्यांसाठी संधी

सीईसीआरआयमध्ये चाललेल्या इतक्या उत्कृष्ट संशोधनाचा फायदा शैक्षणिक क्षेत्रालाही व्हावा म्हणून सीईसीआरआयने देशातील विविध विद्यापीठांबरोबर संलग्न होत अनेक शैक्षणिक व संशोधन कार्यक्रम सुरू केले आहेत. भारतातील इतर संशोधन संस्थांसारखे या संस्थेमध्येही Academy of Scientific & Innovative Research (AcSIR) च्या अंतर्गत पदव्युत्तर, पीएच.डी. व पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्ण करता येतात. सीईसीआरआय भारतीय व परदेशी विद्यापीठांशीही पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी संलग्न आहे. तसेच दरवर्षी सीएसआयआरच्या ‘नेट’सारख्या परीक्षांमधून गुणवत्ताप्राप्त अनेक जेआरएफ व एसआरएफ विद्यार्थी या संस्थेमध्ये पीएच.डी.चे संशोधन करण्यासाठी प्रवेश घेतात.

संपर्क –

  • सेन्ट्रल इलेक्ट्रो केमिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट, कराईकुडी, तामिळनाडू – ६३०००३.
  • दूरध्वनी +९१-०४५६५ -२४१५०६
  • ई-मेल director@cecri.res.in
  • संकेतस्थळ – http://www.cecri.res.in/

itsprathamesh@gmail.com

Story img Loader