आजच्या लेखात यूपीएससी पूर्वपरीक्षेकरिता पर्यावरण परिस्थितिकी, जैवविविधता या घटकांच्या तयारीविषयी चर्चा करणार आहोत. २०११ मध्ये हा घटक अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केल्यानंतर सद्य:स्थितीमध्ये एक महत्त्वाचा विषय गणला जातो. या घटकाला पूर्वपरीक्षेमध्ये असणारे वेटेज याचे महत्त्व अधोरेखित करते. या अभ्यासघटकामध्ये अधिकाधिक गुण प्राप्त केल्यास पूर्वपरीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याची संधी मिळू शकते. या घटकावर २०११ ते २०१७ पर्यंत सुमारे २०% पेक्षा जास्त प्रश्न विचारले गेले आहेत.
पर्यावरण परिस्थितिकी हा आंतरशाखीय विषय आहे. ज्यामध्ये जीवशास्त्र, परिस्थितिकी, भूगोल या विषयांचा समावेश होतो. या घटकावर विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण केल्यास या विषयांची परस्परव्याप्ती असल्याचे दिसून येते. या अभ्यासघटकातील काही भाग पारंपरिक व स्थिर (static) स्वरूपाचा आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने पर्यावरण व परिस्थितिकीशी संबंधित मूलभूत संकल्पनांचा समावेश होतो. बहुतांश वेळा या पारंपरिक घटकांवरही प्रश्न विचारण्यात आले आहेत. उदा. २०१५ मध्ये परिसंस्था (ecosystem) काय आहे? २०१३ मधील अन्नसाखळीवर तसेची ecological niche या संकल्पनेवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांवरून पारंपरिक तथा स्थिर (static) घटकांचे महत्त्व अधोरेखित होते.
त्याचप्रमाणे काही भाग चालू घडामोडींवर आधारित आहे. ढोबळमानाने या अभ्यासघटकामध्ये पर्यावरण, परिस्थितिकी, जैवविविधता, वातावरण बदल, इ.शी संबंधित सर्वसाधारण मुद्दय़ांचा समावेश असल्याने यूपीएससीने या घटकाच्या तयारीकरिता कोणत्याही प्रकारच्या विशेष ज्ञानाची आवश्यकता नसल्याचे अभ्यासक्रमामध्ये नमूद केले आहे. या अभ्यासघटकावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमधून पर्यावरण परिस्थितिकीचे मूलभूत आकलन तपासले जाते.
या अभ्यासघटकामध्ये पारंपरिक भाग मर्यादित असला तरी समकालीन स्वरूपामुळे हा अधिक व्यापक बनला आहे. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सर्व घटक महत्त्वाचे असले तरी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण घटकांना ओळखून त्याची प्राधान्यक्रमाने तयारी केल्यास अभ्यासघटकावर पकड मिळविता येते. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे टॉपिक्स पुढीलप्रमाणे सांगता येतील.
परिसंस्था, अन्नसाखळी, ecological niche, किस्टोन, स्पेसीज, यूट्रॉफिकेशन (Eutrophication) ecotone, ecological succession या परिस्थितिकीशी संबंधित महत्त्वाच्या संकल्पनांचे सखोल वाचन करावे. याबरोबरच पर्यावरणीय प्रदूषणामध्ये हवा, जल, वायू, प्रदूषण, ई-वेस्ट, फ्लाय अॅश, Bio remediation, COD, BOD , इ. संकल्पनांची माहिती घ्यावी. २०१७ च्या पूर्वपरीक्षेमध्ये Biological Oxygen Demand (BOD) प्रश्न विचारला गेला.
या अभ्यासघटकांतर्गत जैवविविधता हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. यामध्ये जैवविविधतेचे प्रकार, इको-सेन्सिटिव्ह झोन, वन्यजीव अभयारण्ये, नॅशनल पार्क, देवराई, जीवावरण, राखीव क्षेत्रे, जैवविविधता हॉटस्पॉट, in-situ व Ex-situसंवर्धन, व्याघ्र प्रकल्प, हत्ती प्रकल्प, इ. वन्यजीवांच्या संवर्धनाशी संबंधित प्रकल्प, इ. घटक महत्त्वपूर्ण आहेत. २०११मध्ये जैवविविधतेचे महत्त्व, पश्चिम घाट, श्रीलंका व इंडो-बर्मा प्रदेशांना ‘जैवविविधता हॉटस्पॉट’ म्हणून मान्यता मिळविण्याकरिता कोणते निकष साहाय्यभूत ठरतात? असे जैवविविधतेशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले होते.
जैवविविधतेबरोबरच परीक्षेमध्ये हवामान बदल ह्या घटकावरील प्रश्नांचे प्राबल्यही दिसून येते. यामध्ये हवामान बदल, जागतिक तापमान वाढ आदी घटनांबरोबरच हवामान बदलांशी संबंधित संस्था जसे UNFCC , क्योटो प्रोटोकॉल, REDD/REDD+, IPCC आदी इनिशिएटिव्ह, ओझोन क्षय, Carbon Sequestration, कार्बन सिंक, कार्बन क्रेडिट, महासागरांचे आम्लीकरण, माँट्रियल प्रोटोकॉल, हवामान बदलाविषयी दरवर्षी होणाऱ्या परिषदांची माहिती करून घ्यावी.
आंतरराष्ट्रीय पर्यावरणविषयक परिषदा उदा. रिओ समीट, रामसर कन्व्हेन्शन, CITES, IUCN स्टॉकहोम, रॉटरडॅम व बेसल कन्व्हेन्शन विषयी माहिती घेणे आवश्यक आहे. याबरोबरच भारतात कार्यरत असणाऱ्या पर्यावरणविषयक संघटनांविषयीची माहिती असणेही आवश्यक आहे. भारतातील पर्यावरणविषयक संघटनांमध्ये नॅशनल बायोडायव्हर्सटिी अॅथॉरिटी, Wildlife Crime control, NGT Bureau, अॅनिमल वेलफेअर बोर्ड, सेंट्रल झू अॅथॉरिटी यांचा समावेश होतो. तसेच CAMPA, Clean energy fund, वन्यजीव कृती आराखडा, मॅनग्रूव्ह फॉर फ्यूचर आदी संस्थांच्या कार्याविषयीचीही माहिती घ्यावी.
पर्यावरणविषयक घटकांच्या तयारीकरिता ‘पर्यावरण परिस्थितिकी’ – तुषार घोरपडे, Ecology and Environment- P. D. Sharma हे संदर्भग्रंथ उपयुक्त आहेत. याबरोबरच पर्यावरण क्षेत्रातील घडामोडींकरिता ‘द िहदू, ‘बुलेटीन’, ‘डाऊन टू अर्थ’ आदींचे नियमितपणे वाचन करून नोट्स तयार करणे श्रेयस्कर ठरेल. पर्यावरणाशी संबंधित सरकारची धोरणे, कार्यक्रम, कायदे, इ.सोबत पर्यावरण, वन्यजीव, वने यासंबंधीची अगदी अलीकडची आकडेवारी, अहवाल पाहावेत. केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालय तसेच पर्यावरण क्षेत्रात कार्यरत आंतरराष्ट्रीय संस्थांच्या संकेतस्थळांना नियमित भेट द्यावी.