’ मी २६ वर्षांची आहे. मला राज्य वा केंद्र शासन किंवा सार्वजनिक बँकांमध्ये कायमस्वरूपी नोकरी हवी आहे. आयबीपीएस, स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या परीक्षेत १०० टक्के यश मिळवण्यासाठी काय करावे लागेल? मी खूपदा प्रयत्न केले, पण यश आले नाही. मी शिकवणी लावू की वेगळी पुस्तके अभ्यासू? काय करावे कळत नाही. एमबीए एचआर किंवा एखादा नोकरी मिळवून देणारा अभ्यासक्रम करायचा आहे. ज्यामुळे मला मुंबईच्या आसपास नोकरी मिळू शकेल. मी काय करू?
-सोनाली लक्षराज
सोनाली, बँकाच्या परीक्षा या दिवसेंदिवस कठीण होत आहेत. त्याशिवाय त्यात स्पर्धाही वाढत आहे. उमेदवारांची संख्या वाढल्याने आता प्राथमिक आणि मुख्य अशा दोन स्तरावर परीक्षा घेतल्या जातात. तुम्ही म्हणालात की तुम्ही बऱ्याच परीक्षा दिलेल्या आहेत. मग कोणत्या घटकांत आपण कमी पडतो, याचे प्रामाणिक विश्लेषण कर. त्यानुसार त्या घटकावर विशेष लक्ष केंद्रित कर. या परीक्षांमध्ये कमी वेळात अधिकाधिक वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवणे आणि त्यात अधिकाधिक अचूकता आणणे गरजेचे आहे. तुझी गती आणि अचूकता वाढवण्यासाठी जास्तीतजास्त सराव कर. त्यासाठी अनेक शैक्षणिक संस्थांचे प्रश्नसंच ऑनलाइन उपलब्ध असतात.
तुला लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमार्फत शासकीय सेवेत प्रवेश करता येऊ शकतो. मात्र त्यासाठी सुद्धा झोकून देऊन अभ्यास करायला हवा. मुंबईमधील पहिल्या पाच ते सहा क्रमांकाच्या एमबीए संस्थांमधून हा अभ्यासक्रम केल्यास एमबीए-एच आर किंवा एमबीएच्या इतर शाखेत नोकरीची संधी सहज उपलब्ध होऊ शकते.
त्यासाठी तुला एमएच-सीईटी-एमबीए या परीक्षेत किमान ९८च्या आसपास पर्सेटाइल मिळवावे लागेल.
तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)