मी बारावीमध्ये शिकत आहे. मला संगणक आणि माहिती तंत्रज्ञान या विषयांची अतिशय आवड आहे. मी विविध संगणकीय भाषासुद्धा शिकलो आहे. या क्षेत्रामध्ये बारावीनंतर मला कोणत्या संधी आहेत – प्रतीक कारभाळ
प्रतीक, तुला बारावीच्या टप्प्यावरच तुझी विषयाबाबतची आवड पक्की समजली, याबद्दल तुझे विशेष अभिनंदन. कारण आपल्याला कशात गती आहे हे एकदा कळलं की मग कोणताही गोंधळ राहत नाही आणि प्रगतीच्या वाटा सुलभतेने मिळत जातात. संगणकशास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात करिअरच्या संधी वेगवेगळे छोटे अभ्यासक्रम करूनही मिळत असल्या तरी तू माझ्या मते १२ वीनंतर पदवी अभ्यासक्रम करायला हवा. हा अभ्यासक्रम केल्यावर तुला या क्षेत्रात पुण्याच्या माहिती तंत्रज्ञान विश्वात नोकरी मिळू शकते वा भारतात किंवा परदेशात पदव्युत्तर पदवी करण्याचा मार्ग उपलब्ध होतो. पुण्यामध्ये चांगली अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. कॉमन अॅडमिशन प्रोसेसमधून तुला या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळू शकतो. राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांची फी शासनामार्फत भरली जाते. शासनाने निर्धारित केलेले वार्षिक उत्पन्न असल्यास खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना फी सवलत दिली जाते.
बारावीनंतर माझ्याकडे करिअरचे कोणते पर्याय असू शकतात? – स्वाती पांडे
स्वाती, आपल्याला नेमके काय करायचे आहे, हे आधी कळले पाहिजे. तसे असल्यास कोणत्याही क्षेत्रात उत्तम करिअर करण्याची संधी आजच्या काळात प्रत्येकास उपलब्ध आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना स्वत:ची बुद्धिमत्ता, आवड, कल आणि गती याविषयी आकलन व्हायला हवे. तुझ्याबाबतीत तसे झाले असेल तर उत्तमच. कोणत्याही विषयात पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना संशोधन, स्पर्धा परीक्षा, व्यवस्थापन अशा क्षेत्रात करिअर घडवता येते. मात्र त्यासाठी विषयाच्या सर्व संकल्पना स्फटिकासारख्या स्वच्छ समजणे गरजेचे आहे. चौफेर व्यक्तिमत्त्व विकास करायला हवा. इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषा उत्तमरीतीने लिहिता आणि बोलता यायला हव्यात.