*   मी बीएससी केमिस्ट्रीच्या शेवटाला वर्षांला आहे. मी एम.एससी करावी का? यानंतर कोणत्या प्रकारच्या शासकीय किंवा इतर संधी प्राप्त होतात.

– गणेश नागरगोजे

तुम्ही एम.एस्सी करायला काहीच हरकत नाही. यामुळे तुमच्या करिअरच्या संधी अधिक व्यापक होतील. शासकीय कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तुम्हाला अध्यापनाची संधी मिळू शकते. संशोधनाच्या क्षेत्रात करिअर करता येणे शक्य आहे. पीएच.डी. करून भविष्यात वरिष्ठ महाविद्यालये किंवा विद्यापीठात अध्यापनाची संधी मिळू शकते.

*    मी सध्या एमबीए-मार्केटिंग या विषयाच्या दुसऱ्या वर्षांला आहे. मला लोकसेवेसाठी जिल्हाधिकारी हे पद मिळवायचे आहे. मी अजून एकदाही एमपीएससी परीक्षा दिलेली नाही. मी त्याची तयारी कशी करू?

– धम्मपाल थोरात

थेट जिल्हाधिकारी होण्यासाठी संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी नागरी सेवा परीक्षा द्यावी लागते. उपजिल्हाधिकारी हे पद राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरले जाते. या पदावर प्रथम नियुक्ती मिळालेले उमेदवार साधारणत: पंधरा वर्षांत भारतीय प्रशासनिक सेवेत पदोन्नत होतात. त्यानंतर त्यांना जिल्हाधिकारी हे पद मिळू शकते. सध्या तुम्ही एमबीए अभ्यासक्रम उत्तम रीतीने पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करावे. राज्यसेवा वा केंद्रीय नागरीसेवा परीक्षा अत्यंत स्पर्धात्मक अशा आहेत. त्यात लाखो उमेदवार बसतात. त्यातून बाराशेच्या आसपास उमेदवारांची निवड होते. त्यामुळे नैराश्य टाळण्यासाठी स्वत:कडे उत्तम असा एक दुसरा पर्याय तयार असणे सध्याच्या काळात गरजेचे आहे.

*    मी विद्युत अभियांत्रिकी शाखेमध्ये पदवी घेतली आहे. मला एमपीएससी देण्याची इच्छा आहे. पण मला विद्युत शाखेतूनच परीक्षा द्यायची आहे. तरी मला या परीक्षेचे स्वरूप सांगा. परीक्षेचे अर्ज कधी निघतात. ही परीक्षा कधी घेण्यात येते? नोकरीची संधी कुठे मिळेल?

– यशश्री महाले

तुम्ही राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी (विद्युत आाणि यांत्रिकी) सेवा ही परीक्षा देऊन महाराष्ट्र शासनाच्या सेवेत येऊ  शकता. ही परीक्षा साधारणत: मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर या केंद्रांवर घेण्यात येते. वयोमर्यादा किमान १९ वर्षे कमाल ३३ वर्षे. महाजेनको कंपनीमार्फत स्वंतत्ररीत्या विद्युत अभियंत्यांची पदे भरली जातात. त्यांची माहिती महाजेनकोच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रकाशित केली जाते.

*    मी ११वीपासून एमपीएससी/यूपीएससीची तयारी करत आहे. आता मी एसवाय बीकॉमला आहे. मला वेळेच्या व्यवस्थापनाविषयी माहिती द्याल का?

श्वेता नंदनवार

नक्कीच श्वेता. आपल्या प्रश्नावरून आपणास नेमके कशासाठी वेळेच्या व्यवस्थापनाची माहिती हवी आहे, ही बाब स्पष्ट होत नाही. तथापी बीकॉमचा अभ्यास आणि यूपीएससी/ एमपीएससीचा   अभ्यास करण्यासाठी वेळ कसा पुरवावा, हा प्रश्न पडला असावा. या दोन्ही अभ्यासाशिवाय आपणास आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाकडेही लक्ष द्यावे लागेल. यामध्ये व्यायाम, एखाद्या कलेची जोपासना, छंद, लेखन व वक्तृत्व कौशल्यात वृद्धी करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला सर्व बाबींकडे लक्ष द्यावे लागेल. यासाठी वेळापत्रक तयार करावे. प्रत्येक बाबींसाठी विशिष्ट वेळ राखून ठेवावा. या वेळापत्रकाचे पालन प्रामाणिपणे करण्याचा प्रयत्न  केल्यास असाध्य गोष्टीसुद्धा साध्य होऊ  शकतात.

Story img Loader