मी आत्ताच १२वीची परीक्षा दिली आहे. मला पुढे अभियांत्रिकी शिक्षण घेऊन पुढे इंडियन इंजिनीअरिंग सव्र्हिसेस
ही परीक्षा द्यायची आहे. मला काय करावे लागेल ?
– यश राऊत
यश, इंडियन इंजिनीअरिंग एक्झामिनेशन ही परीक्षा संघ लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाते. या परीक्षेचे प्राथमिक आणि मुख्य असे दोन टप्पे आहेत. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स केवळ या शाखांमधीलच अभियांत्रिकी पदवीधर या परीक्षेला बसू शकतात. त्यामुळे तू आधी यापैकी कोणत्याही एका शाखेतील अभियांत्रिकीची पदवी घे. अभियांत्रिकी पदवीच्या शेवटच्या वर्षांला किंवा शेवटच्या सत्राला असणारे विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात. मात्र निर्धारित तारखेपर्यंत अंतिम निकाल जाहीर होणे आवश्यक असते.
मी आत्ताच बारावी झालो आहे. मला पुढे वैज्ञानिक व्हायची इच्छा असेल तर मला काय करावे लागेल? पुढे कोणते शिक्षण घ्यावे लागेल?
– आशीष करवादे
आशीष, तू बी.एस्सी., एम.एस्सी. करून तुझ्या आवडीच्या विषयात पीएच.डी. करू शकतोस. ही संधी तुला आयआयटी, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च अशा सारख्या संस्थेत मिळू शकते. त्यासाठी तुला जॉइंट एण्ट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट फॉर पीएच.डी. ही परीक्षा द्यावी लागेल. किंवा तुला इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च या संस्थेत १२ वीनंतर पाच वर्षांच्या बीएस-एमएस इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतोस. त्यासाठी तुला या संस्थेची प्रवेश परीक्षा द्यावी लागेल किंवा मग आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणारी जॉइंट एण्ट्रन्स टेस्ट उत्तम रीतीने उत्तीर्ण व्हावी लागेल. या परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारित तुला थेट प्रवेश मिळू शकतो.
तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)