मी १२वी विज्ञान शाखेत आहे. मला दिग्दर्शक व्हायचे आहे. मी पुढे काय करू?
प्रेमराज रावसाहेब त्रिभुवन
प्रेमराज, तू पुणे येथे असलेल्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूटमधून पोस्ट ग्रज्युएट डिप्लोमा इन डायरेक्शन अँड स्क्रीन प्ले रायटिंग करू शकतोस. ही संस्था भारत सरकारच्या अखत्यारीत आहे. हा अभ्यासक्रम ३ वर्षांचा असून त्यासाठी कोणत्याही विषयातील पदवी आवश्यक आहे. तसेच पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन टीव्ही डायरेक्शन हा अभ्यासक्रमही करता येईल. हा अभ्यासक्रम एक वर्षांचा असून त्यासाठी कोणत्याही विषयातील पदवी आवश्यक आहे. संपर्कासाठी संकेतस्थळ – http://www.ftiindia.com/
तुझ्या लक्षात आले असेलच की या करिअरसाठी तुला आधी पदवी परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागेल. तू तुझ्याकडे असलेल्या कालावधीत जगातील उत्तमोत्तम दिग्दर्शकांचे विविध प्रकारातील चित्रपट पाहा. ते समजून घे. दिग्दर्शकांच्या शैलीचा अभ्यास कर. चित्रपट दिग्दर्शनाविषयी व चित्रपट निर्मिती कलेविषयी भरपूर वाचन करणे आवश्यक आहे.
मी आता १२वी कला शाखेत शिकत आहे. यात उत्तीर्ण झाल्यावर मला समाजकल्याण विभागात नोकरी मिळेल का?
राहुल शेगार
राहुल, तुला समाज कल्याण विभागात नोकरी मिळवायची आहे, असे तू म्हणतोस. पण सध्या शासनात १२वी उत्तीर्णच काय तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असलेल्यांनाही थेट संधी मिळत नाही. त्यासाठी चाळणी परीक्षा, मुलाखत या प्रक्रियेमधून प्रत्येकाला जावे लागते. त्यामुळे तू सध्या पदवी अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित कर. त्यामध्ये चांगले गुण प्राप्त कर. एमपीएससीची उत्तम तयारी करून तू राज्यशासनाच्या नोकरीमध्ये ये. समाजकल्याण अधिकारी पदासाठी समाजशास्त्र वा सामाजिक कार्य हे विषय पदवीस्तरावर असतील तर उत्तम.
मी नुकतेच पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. मी अकांउट्स क्षेत्रात कार्य करत आहे. आता पुढे काय करावे याबाबत मी गोंधळलेली आहे. भविष्यात मी कोणता अभ्यासक्रम करावा?
प्रियंका करगुटकर
प्रियंका ,अकाउंट्सचे क्षेत्र हे करिअर घडवण्यासाठी चांगले क्षेत्र आहे. मात्र तुम्ही तुमच्याकडे आलेल्या ग्राहकाला उत्तम प्रकारची, गतिमान सेवा देणे गरजेचे आहे. त्यासाठी अकाउंट्स विषयातील सर्व संकल्पना स्पष्ट असणे व त्याचा योग्य व अचूक वापर करता येणे आवश्यक ठरते. शिवाय आता या विषयाशी संबंधित अनेक सॉफ्टवेअर आली आहेत. त्यांचे प्रशिक्षण घेऊनही त्यात तज्ज्ञता मिळवता येते. तुम्ही त्याचा त्याचा अभ्यास करू शकता. या निरनिराळ्या सॉफ्टवेअर्समुळे सेवा जलद गतीने आणि अधिक अचूक देता येईल. तुम्ही बीकॉम झाला असाल तर एमकॉम करून एखाद्या विषयात स्पेशलायझेशन करता येईल. अध्यापनाच्या व्यतिरिक्त मोठय़ा अकाउंट्स फर्म, टॅक्सेशन फर्म, सीए यांच्याकडे नोकरी मिळू शकते. अनुभवानंतर तुम्ही स्वत:चा व्यवसायसुद्धा सुरू करू शकता.
तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)