व्यवस्थापनाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षांत उपलब्ध असणाऱ्या ‘कौटुंबिक व्यवसाय व्यवस्थापन’ या स्पेशलायझेशनचे उपघटक, अभ्यासाची पद्धत आणि उपयुक्तता यांविषयी सविस्तर माहिती-
कौटुंबिक व्यवसाय व्यवस्थापन हा विषयसुद्धा एमबीए अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षांसाठी स्पेशलायझेशनचा एक चांगला पर्याय आहे. महाराष्ट्रातील काही विद्यापीठांत हा विषय शिकण्याची सोय आहे. मात्र याही विषयाला विद्यार्थ्यांचा मिळणारा प्रतिसाद अतिशय कमी आहे आणि अनेक ठिकाणी या विषयासाठी पुरेसे विद्यार्थीच नसल्यामुळे हा विषय शिकवला जात नाही. या स्वारस्यपूर्ण विषयाचा परिचय करून घेऊयात आणि त्याचबरोबर पाठय़पुस्तके आणि संदर्भ ग्रंथांसोबतच प्रत्यक्ष व्यवहारात हा विषय कसा शिकला पाहिजे आणि उपयोगात आणला पाहिजे हेसुद्धा जाणून घेऊयात.
सुरुवातीला हे लक्षात घ्यायला हवे की, अनेक मोठय़ा उद्योगांची-व्यवसायांची सुरुवात ही कौटुंबिक उद्योगापासूनच होते. आपल्या देशामध्ये अशी अनेक उदाहरणे आपल्या अवतीभोवती दिसतात. आज कौटुंबिक स्तरावर चालवले जाणारे अनेक व्यवसाय आपल्याला दिसतात. या व्यवसायांचे स्वरूप सुरुवातीच्या काळामध्ये अर्थातच लहानसे असते; परंतु एखाद्या लहान व्यवसायाचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्थापन कार्यक्षम असायला हवे. कोणताही व्यवसाय हा दीर्घ काळामध्ये लहान राहणार नाही, तो वाढणारच. या वाढीबरोबर उद्योग-व्यवसायाला लागणारी कार्यक्षमता तसेच दूरदृष्टी, बाजारपेठेची माहिती, भांडवल उभारणीसंबंधीची माहिती या सर्व गोष्टी नसतील तर व्यवसायाची वाढ खुंटते आणि असा व्यवसाय कालांतराने बंदसुद्धा पडण्याची शक्यता असते. यामुळेच प्रशिक्षित व्यवस्थापकांची गरज अशा प्रकारच्या कौटुंबिक स्तरावरील व्यवसायांनासुद्धा आहे. हे व्यवसाय जर वाढले तर त्यातून रोजगारनिर्मिती होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागू शकतो.
या सर्व बाबींचा विचार करून या स्पेशलायझेशनमधील वेगवेगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर अभ्यासक्रमाची कल्पना येते. कौटुंबिक व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या व्यवस्थापनातील आवश्यक बाबी या विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहेत. या विषयामध्ये कौटुंबिक व्यवसायाचे नेमके स्वरूप काय आहे याचा समावेश आहेच, पण याशिवाय कौटुंबिक व्यवसायाच्या वेगवेगळ्या वैशिष्टय़ांचाही समावेश आहे.
या प्रकारच्या व्यवसायांची शक्तिस्थाने आणि कमकुवत बाजू समजून घेणे आवश्यक ठरते. म्हणूनच या व्यवसायांमधील संघटन रचना (Organisation Structure), निर्णय घेण्याची प्रक्रिया, अल्पकालीन व दीर्घकालीन नियोजनाची पद्धत, वारसा योजना, त्याचप्रमाणे कार्यसंस्कृती, मार्केटिंगची पद्धत अशा अनेक गोष्टींचा समावेश अभ्यासक्रमामध्ये करण्यात येतो. त्याबरोबरच अशा व्यवसायांमध्ये ध्येय, उद्दिष्टय़, लक्ष्य आदी व्यवस्थापनातील संकल्पना कशा प्रकारे अमलात आणाव्यात यांचाही समावेश केलेला आहे.
या विषयाचा अभ्यास करताना, वेगवेगळ्या संकल्पनांचा प्रत्यक्ष व्यवहारातील वापर कसा होतो आणि व्यवस्थापनातील आधुनिक संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणताना कोणकोणत्या अडचणी येतात हे प्रत्यक्ष पाहणे आवश्यक ठरते. त्यासाठी अशा व्यवसायांना शक्य तेवढय़ा भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करणे याचा मोठा फायदा होतो.
कोणत्याही व्यवसायामध्ये नव्या संशोधनाला मोठे महत्त्व आहे. ज्या व्यवसायाचे स्वरूप कौटुंबिक स्वरूपाचे आहे, त्यात हे नवीन संशोधन कसे करावे? असे संशोधन नेमके कोणत्या विभागामध्ये करावे? म्हणजेच संशोधन हे फक्त नवीन वस्तू निर्माण करणे यापुरतेच मर्यादित ठेवावे की ते व्यवसायातील वेगवेगळ्या प्रक्रियांमध्येही करावे?.. यांसारखे अनेक प्रश्न यातून निर्माण होतात. यासाठी संशोधनाचे व्यवस्थापन (मॅनेजिंग इनोव्हेशन) या विषयाचा समावेशही अभ्यासक्रमामध्ये आहे. मात्र, या विषयाचा केवळ सैद्धान्तिक अभ्यास न करता प्रत्यक्षात ज्या ठिकाणी असे संशोधन यशस्वीपणे केलेले आहे त्या ठिकाणी जाऊन भेटी देणे व समजावून घेणे आवश्यक ठरते.
कित्येक वेळा असा अनुभव येतो की, लहान प्रमाणावर कौटुंबिक व्यवसाय करणारे संशोधनासाठी गुंतवणूक करण्यास फारसे उत्सुक नसतात. अशा वेळी ही मन:स्थिती बदलण्यासाठी कोणते प्रयत्न आवश्यक ठरतील याचाही विचार करता येतो.
बऱ्याच वेळा असे दिसते की, लहान लहान उद्योग-व्यवसाय चालवणारे उद्योजक आपल्या व्यवसायाचे नियोजन (बिझनेस प्लानिंग) आवश्यक तितक्या प्रमाणात करीत नाहीत. व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने अल्पकालीन आणि दीर्घकालीन असे दोन्ही प्रकारचे नियोजन करणे आवश्यक असते. नियोजन केल्यामुळे व्यवसायाची वाढ नियोजनबद्ध प्रकारे होते आणि त्यामुळे सर्वाचाच फायदा होतो. असे अल्पकालीन व दीर्घकालीन नियोजन कसे करावे आणि त्यामध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट कराव्यात, याचेही शिक्षण अभ्यासक्रमाच्या दरम्यान होते. यामध्ये नियोजन कसे करावे, त्याच्या नोंदी कशा कराव्यात, या नियोजनाची अंमलबजावणी कशी करावी आणि अंमलबजावणी व्यवस्थित झाली किंवा नाही म्हणजेच ज्याला आपण नियंत्रण म्हणतो ते कसे करावे, या विविध घटकांचा समावेश होतो.
या विषयाचा अभ्यासक्रम शिकताना एक गोष्ट विद्यार्थ्यांना जरूर करता येईल. ती म्हणजे आपल्या ओळखीच्या व्यक्ती चालवत असलेल्या व्यवसायाचे नियोजन करणे. यामध्ये त्या व्यवसायाची प्रत्यक्ष माहिती घेऊनही नियोजन करता येते. अर्थात काल्पनिक माहिती घेऊनसुद्धा व्यवसायाचे नियोजन (बिझनेस प्लॅन) करता येतो, पण एखाद्या चालू व्यवसायाचे नियोजन केल्यास प्रत्यक्ष माहितीवर आधारित योजना बनवण्याचा अनुभव मिळतो. व्यवसायाचे नियोजन करताना संशोधन, अर्थव्यवस्थेचा अंदाज, वित्तीय बाबी, विपणन, ग्राहकांचे मानसशास्त्र इत्यादी अनेक बाबींचा आपोआपच अभ्यास होईल.
कोणत्याही व्यवसायाचा मुख्य भाग म्हणजे भांडवल उभारणी हा असतो. कौटुंबिक व्यवसाय चालवताना लागणारे स्थिर (फिक्स्ड) आणि खेळते भांडवल (वर्किंग कॅपिटल) कसे उभारावे यासंबंधीचे मार्गदर्शन अभ्यासक्रमामध्ये मिळते. कौटुंबिक व्यवसाय चालवताना सर्वप्रथम तो भागीदारी पद्धतीने चालवायचा की कंपनी स्थापन करायची, हा निर्णय घ्यावा लागतो. कंपनी कायद्यामध्ये २०१३ मध्ये झालेल्या बदलानुसार एक व्यक्तीसुद्धा कंपनी स्थापन करू शकते (वन मॅन कंपनी). जशी संस्था असेल- उदा. भागीदारी संस्था किंवा कंपनी त्याप्रमाणे भांडवल उभारणीचे मार्ग ठरवावे लागतात. व्यवसायाच्या वाढीसाठी कर्ज उभारणीसुद्धा आवश्यक ठरते. हे कर्ज कसे उभारावे, त्यासाठी कोणकोणत्या कायदेशीर बाबींची पूर्तता करणे आवश्यक असते या सर्व मुद्दय़ांची माहिती या अभ्यासातून मिळते. अधिकाधिक नफा मिळवण्यासाठी उभारलेले भांडवल कसे उपयोगात आणावे हा वित्तीय व्यवस्थापनातील एक महत्त्वाचा भाग असतो. या मुद्दय़ासोबतच दैनंदिन वित्तीय व्यवस्थापन कसे करावे याचेही मार्गदर्शन अभ्यासक्रमाद्वारे मिळते.
कौटुंबिक व्यवसाय हा नव्याने सुरू करायचा असेल किंवा आहे तो व्यवसाय वाढवायचा असेल तर उद्योजकतेची मानसिकता असणे गरजेचे आहे. उद्योजकतेबद्दल पुरेशी माहितीसुद्धा असायला हवी. त्याचबरोबर उद्योजकतेचे महत्त्व, ग्रामीण भागात उद्योजकता कशी विकसित करावी, उद्योजकतेला मदत करणाऱ्या संस्थांची माहिती.. यांचीसुद्धा माहिती करून घेणे गरजेचे आहे. या कारणांमुळे उद्योजकता या विषयाची एक प्रश्नपत्रिका अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. सामाजिक उद्योजकता या संकल्पनेचाही या अभ्यासक्रमात समावेश आहे.
याशिवाय व्यवस्थापनाचे इतर महत्त्वाचे विभाग म्हणजे मनुष्यबळ विकास, मटेरिअल्स मॅनेजमेंट, सप्लाय चेन मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट अशा अनेक बाबींचा समावेश अभ्यासक्रमामध्ये करण्यात आला आहे. कोणत्याही व्यवसायामध्ये व्यवस्थापनाच्या कामाचे स्वरूप सामायिक असते, मात्र व्यवसायाच्या स्वरूपाबरोबर त्याच्या कार्यपद्धतीत तसेच कार्यसंस्कृतीमध्ये बदल होतात. या बदलत्या परिस्थितीमध्ये व्यवस्थापनाची मूळ तत्त्वे कशी वापरावीत व विविध कामे कशी पार पाडावीत हे समजायला हवे. शहरी भागातील काम करणाऱ्यांची मानसिकता ग्रामीण भागात काम करणाऱ्यांच्या मानसिकतेपेक्षा वेगळी असते. म्हणून सर्व प्रकारच्या परिस्थितीत व सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांबरोबर काम करण्याचे कौशल्य विकसित करावे लागते. यामुळे व्यवसाय यशस्वी होण्यास मदत होते.
बदलत्या परिस्थितीत कौटुंबिक स्तरावरील व्यवसाय चालवताना अनेक आव्हाने उभी ठाकत आहेत. जागतिक स्तरावरील स्पर्धा दिवसेंदिवस वाढत आहे. या स्पर्धेमध्ये टिकून व्यवसाय वाढवण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते. स्वत:चा व्यवसाय चालवणे व वाढवणे हे खरोखरीच एक आव्हान आहे, मात्र, आपण आपला व्यवसाय चालवतो याचे एक आगळे समाधान असते. त्या दृष्टीने केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वत:चा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांना तसेच अगोदरच चालू असलेला व्यवसाय वाढवण्यासाठी या विषयाचा निश्चितच उपयोग होईल.
nmvechalekar@yahoo.co.in
(लेखक पुण्याच्या इंडसर्च संस्थेचे अधिष्ठाता आहेत.)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा