पोशाख हा आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग असतो. प्रत्येक व्यक्तीच्या त्याविषयीच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. या आवडीनिवडीला कलात्मक रूप देण्याचे काम फॅशन डिझायनर्स करतात.

आजच्या जगात असण्याइतकेच महत्त्व दिसण्यालाही मिळू लागले आहे. त्यामुळे आपल्या कपडय़ांच्या बाबतीत सारेच खूप जागरूक असतात. पोशाखातून व्यक्त होणारी वास्तवाची भाषा म्हणजे फॅशन, असे म्हणतात. म्हणूनच फॅशन डिझायनिंगला खूपच महत्त्व आलेले आहे. वैशाली  शदांगुळे,  स्वप्निल शिंदे यांच्यासारखे अनेक मराठी तरुण फॅशनविश्वात डिझायनर म्हणून चमकत आहेत. तुम्हालाही यामध्ये चांगले करिअर करायचे असेल तर इच्छुकांनी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेत प्रवेश मिळवायला हवा. जगातील सवरेत्कृष्ट संस्थांमध्ये समावेश होणारी ही संस्था आहे. ती भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाअंतर्गत कार्यरत आहे. या महत्त्वाच्या संस्थेतील प्रवेशाबाबत महाराष्ट्रीय पालक फारसे उत्सुक नसल्याचे दिसून येते. बदलत्या काळानुरूप अधिकाधिक मराठी मुलांनी या संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवा.

संस्थेचे अभ्यासक्रम

या संस्थेमार्फत पुढील अभ्यासक्रम चालवले जातात. सर्व अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी चार वर्षांचा आहे.

१)बॅचलर ऑफ डिझाइन (बी.डिझाइन)इन अ‍ॅक्सेसरी डिझाइन. (कॅम्पस – गांधीनगर, बंगळूरु, नवी दिल्ली, भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, कोलकता, रायबरेली, मुंबई, जोधपूर, कानपूर, भोपाळ आणि शिलाँग)

२)बी.डिझाइन इन फॅशन कम्युनिकेशन  (कॅम्पस – बंगळूरु, नवी दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, कोलकता, मुंबई, कानपूर, कांग्रा आणि गांधीनगर)

३)बी.डिझाइन इन फॅशन डिझाइन  (कॅम्पस –  गांधीनगर, बंगळूरु, नवी दिल्ली, भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, कोलकता, रायबरेली, मुंबई, पाटणा, कानपूर, कांग्रा आणि शिलाँग.)

४)बी.डिझाइन इन नीटवेअर डिझाइन (कॅम्पस – बंगळूरु, नवी दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, कोलकता, मुंबई, कानपूर येथील)

५)बी.डिझाइन इन लेदर डिझाइन (कॅम्पस- नवी दिल्ली, चेन्नई, कोलकता, रायबरेली)

६)बी.डिझाइन इन टेक्स्टाइल डिझाइन  (कॅम्पस- बंगळूरु, भुवनेश्वर, भोपाळ, गांधीनगर, नवी दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, कोलकता, मुंबई, कांग्रा, कानपूर, जोधपूर आणि पाटणा)

(अर्हता- उपरोक्त नमूद १ ते ६ अभ्यासक्रमांसाठी कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण)

७)बॅचलर ऑफ फॅशन टेक्नालॉजी इन अपॅरल प्रॉडक्शन  अर्हता- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह बारावी (कॅम्पस-  गांधीनगर, बंगळूरु, नवी दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, कोलकता, पाटणा, मुंबई, कानपूर, कांग्रा)

या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एनआयएफटी अ‍ॅडमिशन टेस्ट देशभरातील विविध केंद्रांवर घेतली जाते. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर आणि पुणे या शहरांचा समावेश आहे. या चाळणी परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांचे संबंधित विषयासाठी आवश्यक असलेले ज्ञान, कल आणि कौशल्याची चाचणी घेतली जाते. यंदाच्या शैक्षणिक सत्रासाठीची परीक्षा ९ जानेवारी २०१८ रोजी देशभरातील विविध केंद्रांवर घेतली जाईल.

बॅचलर ऑफ फॅशन टेक्नालॉजी

या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी फक्त जनरल अ‍ॅबिलिटी टेस्ट घेतली जाते. यामध्ये क्वांटिटिटिव्ह अ‍ॅबिलिटी (३० प्रश्न), कम्युनिकेशन अ‍ॅबिलिटी आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन (४५ प्रश्न), अनॅलिटिकल आणि लॉजिकल अ‍ॅबिलिटी (२५ प्रश्न), जनरल नॉलेज आणि करंट इव्हेंट्स (२५ प्रश्न) आणि केस स्टडीचा (२५ प्रश्न)  समावेश करण्यात येतो. असे एकूण १५० प्रश्न विचारले जातात. या पेपरचा कालावधी १८० मिनिटे. या टेस्टला १००टक्के वेटेज देण्यात येते.

अभ्यासक्रम – या परीक्षेचा अभ्यासक्रम सर्वसाधारण स्वरूपाचा असतो. पेपरचा दर्जा बारावीच्या परीक्षेइतकाच असतो. दहावी, बारावीपर्यंतच्या इंग्रजीचा अभ्यास, दहावीपर्यंतच्या गणिताचा सर्वसाधारण अभ्यास या परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त ठरू शकतो. इंग्रजी व गणिताच्या संकल्पना स्पष्ट असल्यास पेपर सोडवणे कठीण जात नाही.  दैनंदिन सामान्यज्ञान व चालू घडामोडींवर प्रश्न असतात. या प्रश्नांची तयारी वृत्तपत्र वाचन, आकाशवाणी वा दूरदर्शनवरील बातम्या ऐकणे यांनीही होऊ  शकते. टीव्ही बघताना ज्या जाहिराती आपल्या डोळ्यासमोर येतात त्यावरही आधारित काही प्रश्न असू शकतात. या परीक्षेची तयारी घरीसुद्धा करता येऊ  शकते. तथापि काही खासगी संस्था परीक्षेची पूर्वतयारी करून देतात. त्याचा उपयोग सरावासाठी होऊ शकतो. ही परीक्षा फारशी कठीण नाही. सराव आणि प्रवेश मिळवायचाच हे पक्के उद्दिष्ट ठेवून ही परीक्षा दिल्यास यश मिळणे कठीण जाऊ  नये. या परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांची अंतिम निवड मुलाखत आणि समूह चर्चेनंतर केली जाते.

अशी असते परीक्षा

बॅचलर ऑफ डिझाइन या अभ्यासक्रमांच्या निवडीसाठी जनरल अ‍ॅबिलिटी टेस्ट, क्रिएटिव्ह अ‍ॅबिलिटी टेस्ट आणि सिच्युएशन टेस्ट असे तीन टप्पे आहेत. जनरल अ‍ॅबिलिटी टेस्टला ३० टक्के वेटेज, क्रिएटिव्ह अ‍ॅबिलिटी टेस्टला ५० टक्के वेटेज आणि सिच्युएशन टेस्टला आणि २० टक्के वेटेज दिले जाते.

जनरल अ‍ॅबिलिटी टेस्ट (जीएटी)

ही चाळणी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीची असते. अचूक उत्तराला एक गुण दिला जातो. निगेटिव्ह गुण नाहीत. या पेपरमध्ये क्वांटिटिटिव्ह अ‍ॅबिलिटी – २५ प्रश्न (संख्यात्मक कौशल्य), कम्युनिकेशन अ‍ॅबिलिटी – ३५ प्रश्न (संवादकौशल्य), इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन – २५ प्रश्न (इंग्रजी आकलनकौशल्य), अ‍ॅनालिटिकल अ‍ॅबिलिटी – ३० प्रश्न (पृथ:करणकौशल्य), जनरल नॉलेज आणि करंट इव्हेंट्स – २५ प्रश्न (सामान्य ज्ञान चालू घडामोडी ) या विषयांवर प्रश्न विचारले जातील.

क्वांटिटिटिव्ह अ‍ॅबिलिटी टेस्टमध्ये – बेरीज, गुणाकार, भागाकार, अपूर्णाक, काम आणि कार्य, गुणोत्तर, हिस्सा, अंतर, नफा-तोटा, टक्केवारी, व्याजदर, अंकगणित, भूमिती यांचा समावेश असतो.

तर कम्युनिकेशन अ‍ॅबिलिटी टेस्टमध्ये इंग्रजीचे ज्ञान तपासले जाते. त्यात समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, शब्दार्थ, अचूक स्पेलिंग, एकवचनी, अनेकवचनी शब्द, वाक्प्रचार यांचा समावेश असतो.

इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन टेस्टमध्ये दिलेल्या उताऱ्यावर प्रश्न विचारले जातात. त्याद्वारे विद्यार्थ्यांची आकलनक्षमता तपासली जाते. अ‍ॅनालिटिकल अ‍ॅबिलिटी टेस्टमध्ये दिलेल्या माहितीवरून उमेदवारांची लॉजिकली म्हणजेच तार्किकभावाने व समक्यपणे विचार आणि विश्लेषण करण्याची क्षमता तपासली जाते. जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स टेस्ट यामध्ये उमेदवारांचे सामान्यज्ञान आणि चालू घडामोडीचे ज्ञान तपासले जाते. जनरल अ‍ॅबिलिटी टेस्टमध्ये एकूण १५० प्रश्न विचारले जातात. या पेपरचा कालावधी १२० मिनिटे असतो.

क्रिएटिव्ह अ‍ॅबिलिटी टेस्ट – या टेस्टमध्ये विद्यार्थ्यांचा फॅशन डिझाइनच्या अनुषंगाने असलेला सर्जनशील कल तपासला जातो. यामध्ये त्यांची विचार करण्याची क्षमता, रंगसंगतीबाबतचे आकलन, निरीक्षण, एखाद्या नावीन्यपूर्ण संकल्पनेची निर्मिती, रेखांकनाची क्षमता या बाबींची चाचपणी केली जाते.

सिच्युएशन टेस्ट – एखाद्या डिझाइनसाठी उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर संबंधित विद्यार्थी कौशल्याने कशा प्रकारे करतो, ही बाब या चाळणीद्वारे तपासली जाते.

पत्ता- नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी कॅम्पस, हौज खास, गुलमोहर पार्कजवळ, नवी दिल्ली ११००१६, दूरध्वनी:०११-२६५४२१००, फॅक्स : २६५४२१५१, संकेतस्थळ – ६६६.ल्ल्रऋ३.ूं.्रल्ल

(महाराष्ट्रातील कॅम्पस – नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, प्लॉट क्र. १५, सेक्टर चार, खारघर, नवी मुंबई- ४१०२१०, दूरध्वनी : ०२२-२७५६३८६, फॅक्स : २७५६३५८)

ekank@hotmail.com

Story img Loader