विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेतून किंवा त्यांच्या परिसर भाषेतून शिक्षण देण्याबाबत सध्या जगभर मोहीम सुरू आहे. स्थानिक भाषेतून शिक्षण देण्याचे अनेक फायदे आहेत, पण त्याच्या अंमलबजावणीमध्ये अनेक अडचणी येत आहेत. त्यातील सर्वात मोठी अडचण आहे ती, शब्दार्थाची. विशेषत: आदिवासी बोली भाषांबाबत अधिक अडचण येते. सध्या गोंड भाषेबाबत काही प्रमाणात तरी ही अडचण दूर झाली आहे. कारण गोंड भाषेचा शब्दसंग्रह तयार करण्यात आहे. यामध्ये तीन हजार पाचशे शब्दांचे संकलन आणि त्याचे अर्थ, छटा यांचा समावेश सद्य:स्थितीत आहे. या शब्दसंग्रहात भर घालण्याचे कामही सुरू आहे.

महाराष्ट्र, छत्तीसगढ, ओडिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेश या राज्यांतील गोंड जमातीतील ८० प्रतिनिधींचा गट हा प्रकल्प साकारत आहे. इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स (आयजीएनसीए) या संस्थेच्या माध्यमातून शब्दसंग्रह तयार करण्यात येत आहे. गोंडणी सहा राज्यांत बोलली असली तरी परिसरातील अनेक प्रादेशिक भाषांवर गोंड भाषेचा प्रभाव आहे. जवळजवळ १२ दशलक्ष गोंड आदिवासींना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. अनेक शासकीय योजनांच्या प्रसारासाठी आणि मुख्य म्हणजे गोंड आदिवासींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीही हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. अगदी प्राथमिक स्तरापासून स्थानिक भाषेतून शिक्षण देण्याचे धोरण यामुळे अमलात येण्यास मदत होईल. गोंड संस्कृती, लोकगीते यांचे जतनही या माध्यमातून होऊ  शकेल. मात्र त्याचवेळी गोंड प्रमाणेच देशातील इतरही आदिवासी बोलींबाबतही असेच कार्य होण्याची गरज आहे.

संकलन – रसिका मुळ्ये