परदेशात शिकायला जाण्याचे स्वप्न अनेकजण बाळगून असतात. पण त्यासाठी नेमके करायचे तरी काय? हे अनेकांना माहिती नसते. म्हणूनच लोकसत्ता मार्ग यशाचाया कार्यशाळेमध्ये परदेशातील संधीया विषयावर विशेष व्याख्यान आयोजित केले होते. करिअर समुपदेशक प्रथमेश आडविलकर यांनी परदेशी शिक्षण घेण्यासाठी कोणत्या परीक्षा द्याव्या, शिष्यवृत्तीच्या संधी कोणत्या आहेत, याविषयी उपयुक्त माहिती दिली.

  • परदेशातील उच्च शिक्षणाच्या वाटा

दरवर्षी भारतातून सुमारे साडेतीन लाख मुले परदेशात शिक्षणासाठी जात असतात. परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, आर्थिक मदत सहजपणे उपलब्ध होते. पण विद्यार्थ्यांना त्याची फारशी माहिती नसते. शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणांवर आर्थिक मदत मिळत असते. भारतीय विद्यार्थ्यांचा या स्पर्धातील निकालही चांगला असतो. कारण आपल्या शिक्षणपद्धती आणि या परीक्षांचा साचा समान असतो. गणितामध्ये गती, बहुभाषिक असणे, यामुळे टोफेल किंवा आयआयटीएस, डीआयईमधील इंग्रजीचा भाग विद्यार्थ्यांना सोपा जातो.

Success Story Of Aditya Srivastava In Marathi
Success Story Of Aditya Srivastava: स्वप्ने सत्यात उतरतात! लाखोंची नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेत आला पहिला, वाचा अनेकांची प्रेरणा ठरणाऱ्या आदित्य श्रीवास्तवचा प्रवास
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
India Refuses Cricket In Pakistan
पाकिस्तानात चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचा नकार का? पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा का चर्चेत?
first time in history of Maharashtra 52 separate hostels for OBCs and vagabonds 5 thousand 200 students admitted
५२ वसतिगृहात तब्बल ५,२०० ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा…विद्यार्थी म्हणाले, फडणवीसांनी…
state govt form committee to study implementation sub classification in sc reservation sparks controversy
दलित मतदारांत दुभंग? आरक्षण उपवर्गीकरणाच्या हालचालींचे पडसाद निवडणुकीत उमटण्याची शक्यता
expert answer on career advice questions career advice tips
कराअर मंत्र
TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
  • परदेशी शिक्षणासाठी का जावे?

अमेरिका, जर्मनी, युरोपीयन देश, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या ठिकाणी अनेक जागतिक दर्जाच्या संस्था आणि विद्यापीठे आहेत. जगातील महत्त्वाच्या विद्यापीठांत त्यांचा समावेश होतो. पायाभूत सुविधा, प्राध्यापक, शिक्षणकौशल्य आदी अनेक निकषांत या संस्था उच्च क्रमांकावर असतात. अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये दिग्गज प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थ्यांना शिकवतात. अशा व्यक्तींकडून शिकण्याचा त्यांना भेटण्याचा अनुभव केवळ ज्ञानदायी असतो. तसेच विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे विषय निवडण्याचे स्वातंत्र्य मिळते. भारतात तसे नाही. अनेक विद्यापीठे गुणी विद्यार्थ्यांसाठी भरीव आर्थिक निधी उपलब्ध करून देतात. शैक्षणिक शुल्क, राहण्या-जेवणाचा खर्च, अभ्यासासाठीचा निधी तसेच इतर खर्चासाठीही यातील अनेक विद्यालये मदत करत असतात. याशिवाय व्यक्तिमत्त्व विकास, करिअरच्या चांगल्या संधी आणि करिअरच्या टप्प्यावर आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांना होतो. कमी वयामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरचा अनुभव मिळतो. इतर देशातील संस्कृती आणि भाषेची ओळख होते.

  • उपलब्ध अभ्यासक्रम

आपल्याकडील शिक्षण पद्धतीमध्ये नर्सरी, प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी शिक्षण असे टप्पे असतात. परदेशात हे टप्पे वेगवेगळे आहेत. बहुसंख्य देशांमध्ये अमेरिकेप्रमाणेच शिक्षणाचे टप्पे ठरलेले आहेत. अमेरिकेत नर्सरीनंतर पहिले ते सहावीचा समावेश प्राथमिक स्तरावर होतो. आठवीपासून बारावीपर्यंत माध्यमिक स्तर असतो. तर बारावीनंतर पदवीपूर्व शिक्षण दिले जाते. त्यापुढे पदवी शिक्षण घेतले जाते. आपल्याकडे त्यालाच पदव्युत्तर पदवी म्हणतो. त्यांच्याकडे पदव्युत्तर पदवी केवळ पीएच.डी. हीच आहे.

  • पदवीपूर्व शिक्षण

परदेशात चार वर्षांचा अभ्यासक्रम असून त्यांना वेगवेगळी नावे आहेत. पहिल्या वर्षांला फ्रेशमन, दुसऱ्या वर्षी सोफोमोर, तिसऱ्या वर्षी ज्युनिअर आणि चौथ्या वर्षी सीनिअर म्हणतात. भारतात कोणत्याही बोर्डातून बारावी शिक्षण घेतलेले विद्यार्थी पदवीपूर्व परीक्षेला प्रवेश घेतात. बीएस, बीए, बीबीए, बी इंग्लिश असे पदवीपूर्व अभ्यासक्रम आहेत.

  • पदवी शिक्षण

पदवीचे शिक्षण दोन वर्षांचे असते. एमएस, एमए आणि एमबीए हे अभ्यासक्रम पदवी शिक्षणात आहेत. कमी वेळात अभ्यास पूर्ण करण्याची संधीसुद्धा मिळते.म्हणजे २४ महिन्यांचा अभ्यासक्रम तुम्हाला १८ महिन्यांतही पूर्ण करता येतो.

  • पदव्युत्तर शिक्षण

परदेशात पीएच.डी. हा एकमेव पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. त्यासाठी शिक्षण शुल्क घेतले जात नाही. भारतात मास्टर डिग्री पूर्ण करणारे विद्यार्थी पीएच.डी.ला प्रवेश घेऊ शकतात.

  • प्रवेश परीक्षा

परदेशी शिक्षणासाठी वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा उपलब्ध आहेत. उदा. सॅट, टोफेल. या सर्व परीक्षा देण्यासाठी सर्वात आधी तुमच्याकडे वैध पासपोर्ट हवा. पदवीपूर्व शिक्षणासाठी सॅट, टोफेल किंवा आयईएलटीएससारख्या परीक्षा आहेत. अमेरिकेसाठी टोफेल तर इतर देशांसाठी आयईएलटीएस या परीक्षा आहेत. भारत नॉन इंग्लिश स्पिकिंग लिस्टमध्ये येणारा देश असल्यामुळे या परीक्षांमधून विद्यार्थ्यांचे इंग्रजी तपासले जाते. सॅटमधून गणित, इंग्रजी आणि अ‍ॅप्टिटय़ुड टेस्ट केली जाते. पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे असल्यास ग्रॅट द्यावी लागेल. एमबीएसाठी जीमॅट आणि पीएच.डी.साठी ग्रॅट किंवा टोफेल द्यावी लागेल. ग्रॅटमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे महत्त्वाचे विषय आहेत.

  • प्रवेश परीक्षांची रचना

आयईएलटीएसमध्ये लेखी पेपर सोडवण्याप्रमाणे परीक्षा द्यायची असते. यात गुण नव्हे तर बँड असतात. नऊ विभागांत गुण विभागलेले असतात. किमान साडेपाच बँड मिळवावे लागते. टोफेल इंटरनेटवर आधारित परीक्षा आहे. वाचा, लिहा, बोला आणि ऐका या चार प्रकारांमध्ये ही परीक्षा होते. या विभागांत १२० गुण मिळतात.जीआरई, जी मॅट आणि सॅट या कॉम्प्युटर अ‍ॅडय़प्टय़ुटिव्ह टेस्ट आहेत. तुम्ही सोडवलेल्या प्रश्नावर त्याची काठिण्य पातळी वाढत किंवा कमी होत जाते. या परीक्षेचे गुण तुम्ही कोणत्या काठिण्य पातळीपर्यंत पोहचला आहात त्यावर अवलंबून असतात. जीआरई २९०, जीमॅट ८०० आणि सॅट १६०० गुणांची परीक्षा असते. यापैकी सॅट वगळता सर्व परीक्षा प्रत्येक आठवडय़ाला नोंदवता येतात. सॅट ही दोन ते तीन महिन्यांतून एकदा नोंदवता येते. या परीक्षा देण्यासाठीही महिन्यांची मर्यादा आहे. त्यांच्या संकेतस्थळांवरून  विस्तृत माहिती मिळू शकते.

  • खर्चाचा आकडा

परदेशी शिक्षणाचा केवळ अभ्यासाचा एकूण वर्षांचा खर्च नऊ हजार डॉलर्सपासून ३० हजार डॉलर्सपर्यंत असतो. त्याबरोबरच राहण्या-जेवण्याचा खर्च विद्यापीठाप्रमाणे बदलतो. चांगल्या विद्यापीठांमध्ये तो, १२ ते १५ हजार डॉलर्स इतका येतो. सरासरी विचार केला तर महिन्याला ३५० ते ४५० डॉलर्स इतका खर्च होऊ शकतो. यासोबतच गुणवान विद्यार्थी फेलोशिप, असिस्टंटशिपसोबतच कॅम्पसमध्ये काम करूनही उत्पन्न मिळवू शकतात.

  • विद्यापीठ आणि औद्योगिक क्षेत्राचा समन्वय

परदेशामध्ये विद्यापीठे आणि औद्योगिक क्षेत्र एकमेकांशी संयुक्तपणे उपक्रम राबवत असतात. यामुळे विद्यापीठांना विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ मिळत असते. तर औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असलेली पेटंट मिळवून देण्याचे काम विद्यापीठे करत असतात. त्यामुळे औद्योगिक क्षेत्र विद्यापीठांना आर्थिक पुरवठा करतो आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत असतो. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चामध्ये यामुळे मोठय़ा प्रमाणात बचत होत असते. ग्रॅटस्कूलमध्ये संशोधन करणाऱ्या संशोधकांना मदत करून तुम्ही आर्थिक उत्पन्न मिळवू शकता. तसेच शिक्षण घेतल्यानंतर पुन्हा शिकवणे किंवा शिक्षकांचे मदतनीस म्हणून काम करण्याचीही संधी असते. जी आर्थिक फायदा मिळवून देते. आर्थिक निधी मदत म्हणून मिळवायचा असल्यास नोंदणी मात्र बरीच आधी करावी लागते. याबाबतीतील प्रत्येक विद्यापीठाचे नियम समजून घ्यावेत.

  • भारतीय शिष्यवृत्ती

परदेशी शिक्षणासाठी अनेक भारतीय संस्थाही शिष्यवृत्त्या देतात. त्यामध्ये टाटा इन्व्हेस्टमेंट ही कर्ज स्वरूपातील शिष्यवृत्ती जास्तीत जास्त सहा लाखांपर्यंत मिळते. इनलॅक्स शिष्यवृत्तीमध्ये ८५ युएस डॉलर्स म्हणजे ५१ ते ५५ लाखांपर्यंतची रक्कम मिळते. केसी महिंद्रा शिष्यवृत्ती, आगाखान आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती, ब्रिटिश कौन्सिल, रोटरी शिष्यवृत्ती, आरडी सेठीना शिष्यवृत्ती आणि लोटस ट्रस्टसारख्या शिष्यवृत्तीतून मदत मिळते.

  • प्रवेशाचे वेळापत्रक..

फॉल आणि स्प्रिंग अशा दोन सेमिस्टर परदेशात असतात. फॉल सेमिस्टर ऑगस्टमध्ये सुरू होते तर स्प्रिंग सेमिस्टर जानेवारीमध्ये सुरू होत असते. पुढील दोन वर्षांचा विचार करून आपल्याला नियोजन करण्याची गरज असते तरच आपल्याला चांगल्या विद्यापीठात प्रवेश मिळू शकतो. फॉल २०१८ चा विचार केला तर जून २०१७ साली विद्यापीठांची निवड करावी लागेल. किमान दहा विद्यापीठांची लिस्ट तयार करण्याची गरज असून त्यामध्ये पहिल्या १०० विद्यापीठांचे चार पर्याय, पहिल्या सहाशे विद्यापीठातील चार आणि अन्य खालच्या विद्यापीठांचे दोन पर्याय लिस्टमध्ये समाविष्ट करावे. त्यानंतर जुलै महिन्यात नोंदणी करून परीक्षांसाठी अर्ज भरावा. ऑक्टोबर १७ ते जानेवारी १८ पर्यंत ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रांची पूर्तता करावी. मार्च ते मेमध्ये विद्यापीठांकडून तुमचा अर्ज स्वीकारल्याचे प्रतिसाद मिळून प्रवेशाची ऑफर तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. त्यानंतर आय-२० फॉर्मची मागणी करून तुम्ही व्हीसासाठी अ‍ॅप्लिकेशन करू शकता. त्यानंतर प्रवेशपूर्व प्रक्रिया पूर्ण करणे, विमान तिकिटांची बुकिंग आणि परदेशी चलन बदलण्याबरोबरच त्यांचे काही ऑनलाइन अभ्यासक्रमही पूर्ण करण्याची गरज असते.

उत्कृष्ट उपक्रम

आजच्या तरुणाईसाठी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ हा अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे. स्किल इंडियामुळे आता कौशल्यपूर्ण शिक्षणालाही चांगला वाव मिळतो आहे. ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना याविषयीचे अभ्यासक्रम आणि ते उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांची माहिती मिळाली.  कोहिनूर टेक्निकल इन्स्टिटय़ूटचे ध्येय आहे की, ‘कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये. आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना उपयुक्त ज्ञान द्यावे.’ अशा कार्यक्रमातून आमच्या या उद्देशाला पुष्टीच मिळत आहे. लोकसत्ताने आणखी अनेक ठिकाणी अशा प्रकारचे उपक्रम राबवावेत.

समीर जोशी, सीईओ आणि डिरेक्टर ऑफ कोहिनूर टेक्निकल इन्स्टिटय़ूट

उत्तम वक्ते

आपल्यासमोर करिअरचे काय पर्याय आहेत, याची माहिती ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना झाली. म्हणूनच या उपक्रमाशी जोडले जाणे हा फारच चांगला अनुभव आहे.  आपल्या करिअरला आकार देऊ पाहणारे विद्यार्थी बघणे हे अतिशय समाधानकारक आहे. या कार्यक्रमासाठी आलेले वक्तेही उत्तम होते. विद्यार्थ्यांना त्यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली.  त्यामुळे त्याचा जास्त उपयोग झाला.

रणवीर देवकर, मॅनेजर बिझनेस डेव्हलपमेंट आणि ट्रेनिंग, अलिफ ओव्हरसीज

माहितीपूर्ण उपक्रम

आज माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात वावरताना ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यक्रमासारखे  व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल लोकसत्ताचे कौतुक. हा अतिशय उपयुक्त आणि माहितीपूर्ण उपक्रम आहे. विद्यार्थी आणि त्यांना शिक्षण देऊ इच्छिणाऱ्या संस्था यांना एकत्र आणणारे हे उत्तम व्यासपीठ आहे. या ठिकाणी विद्यार्थी एकत्र येतात, बोलतात, माहिती घेतात आणि आवश्यक माहितीही मिळवतात. म्हणूनच अशा प्रकारचे जास्तीत जास्त कार्यक्रम महाराष्ट्राच्या गावागावांत राबवले जायला हवेत.

भास्कर रंजन दास, हेड ऑफ मार्केट्स, चार्टर्ड इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अकाउन्टन्ट्स.

प्रायोजक :  या उपक्रमाचे ‘टायटल पार्टनर’ पितांबरी तर ‘असोसिएट पार्टनर’ विद्यालंकार क्लासेस होते. ‘पॉवर्ड बाय पार्टनर्स ’ अलिफ ओव्हरसीज, सक्सेस फोरम, रोबोमेट प्लस, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिटय़ूट, आयटीएम ग्रूप ऑफ इन्स्टिटय़ूशन, विद्यासागर क्लासेस आणि चार्टर्ड इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अकाऊंटन्ट्स, दिलकॅप कॉलेजेस अ‍ॅण्ड इन्स्टिटय़ूट्स, नेरळ, द युनिक अ‍ॅकॅडमी हे होते. तर हॉटेल टिप टॉप प्लाझा हे ‘व्हेन्यू पार्टनर’ होते.