फ्रान्समध्ये अभियांत्रिकी आणि मूलभूत विज्ञानविषयक पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकू इच्छिणाऱ्या तसेच अर्थशास्त्रात पीएच.डी. करू इच्छिणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना फ्रान्सच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून आयफेल शिष्यवृत्ती दिली जाते.
या शिष्यवृत्तीविषयी..
फ्रान्समध्ये अभियांत्रिकीचा पदव्युत्तर अभ्यासक्रम, मूलभूत विज्ञानविषयक अभ्यासक्रम आणि अर्थशास्त्रातील पीएच.डी. या अभ्यासक्रमांसाठी विविध विद्यापीठे अथवा संशोधन संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना त्यांच्या तिथल्या शिक्षणाचा खर्च सुसह्य व्हावा याकरता फ्रान्स सरकारच्या परराष्ट्र आणि युरोपीय व्यवहार मंत्रालयाकडून दरवर्षी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी आयफेल शिष्यवृत्ती देण्यात येते. २०१६-२०१७ या शैक्षणिक वर्षांतील अभ्यासक्रमांसाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तींसाठी संबंधित विषयातील अर्जदारांनी ८ जानेवारी २०१६ पूर्वी अर्ज करावेत.
शिष्यवृत्तीविषयी..
आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी, मूलभूत विज्ञान आणि अर्थशास्त्रातील पीएच.डी. अभ्यासक्रमांसाठी फ्रान्समधील विविध विद्यापीठांत अथवा संशोधन संस्थांमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर तेथील निवासाचा, भोजनाचा, सांस्कृतिक कार्यक्रमांचा तसेच सामाजिक सुरक्षा यांसारख्या खर्चाचा ताण त्यांच्यावर पडू नये आणि तिथल्या विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना सुलभरीत्या शिक्षण घेता यावे याकरता फ्रान्स सरकारच्या परराष्ट्र आणि युरोपीय व्यवहार मंत्रालयाकडून दरवर्षी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना ‘आयफेल शिष्यवृत्ती’ देण्यात येते. या शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकांना त्यांनी निवडलेल्या पदव्युत्तर किंवा पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती बहाल केली जाते.
या शिष्यवृत्तीअंतर्गत, अभ्यासक्रमाच्या ठरावीक कालावधीकरता पदव्युत्तर शिष्यवृत्तीधारकाला साधारणत: ११८१ युरो एवढा मासिक भत्ता दिला जाईल. याव्यतिरिक्त शिष्यवृत्तीधारकाला विविध सुविधाही उपलब्ध होतील, ज्यामध्ये एकवेळ आंतरराष्ट्रीय विमानप्रवास, सामाजिक सुरक्षा निधी, सांस्कृतिक कार्यक्रम भत्ता यांचा समावेश आहे. पीएच.डी. करणाऱ्या शिष्यवृत्तीधारकाचा मासिक भत्ता १४०० युरो असेल आणि इतर सर्व सुविधा पदव्युत्तर शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांसारख्याच असतील.
आवश्यक अर्हता
ही शिष्यवृत्ती फ्रेंच नागरिकांशिवाय सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांना खुली आहे. ज्या अर्जदारांकडे दुहेरी नागरिकत्व आहे आणि त्यातील एक नागरिकत्व फ्रान्सचे आहे, अशांनाही या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार नाही. संस्थेने या शिष्यवृत्तीसाठी वयाची अट घातली असून, पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या अर्जदाराचे वय ३० पेक्षा कमी असावे तर पीएच.डी.साठी प्रवेश मिळालेल्या अर्जदाराचे वय ३५ पेक्षा कमी असावे.
ज्या अर्जदारांनी यापूर्वी आयफेल शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेला आहे त्यांनी पुन्हा या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू नये. अर्जदाराचा अर्ज फ्रान्समधील कोणतीही संशोधन संस्था किंवा विद्यापीठाकडून येणे अपेक्षित आहे.
अर्जदार ज्या विषयातील शिष्यवृत्तीकरता अर्ज करणार आहे, त्या विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी त्याच्याकडे असावी. त्याला फ्रान्समधील कोणत्याही विद्यापीठात किंवा संशोधन संस्थेत पदव्युत्तर किंवा पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेला असावा. अर्जदाराकडे त्याच्या क्षेत्रातील संशोधन किंवा इतर कोणताही अनुभव असल्यास, त्याला प्राधान्य दिले जाईल. अर्जदाराने त्याच्या संशोधनाचे किंवा अनुभवाचे प्रशस्तीपत्र जोडावे. अर्जदाराची पदवी स्तरावरील शैक्षणिक पाश्र्वभूमी उत्तम असावी. त्याचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. भारतातील अर्जदारांनी टोफेल किंवा आयईएलटीएस यांपैकी इंग्रजीच्या कोणत्याही एका परीक्षेत उत्तीर्ण असावे. अर्जदाराकडे फ्रेंच भाषेचे उत्तम ज्ञान असावे. प्रवेश घेतलेल्या फ्रेंच विद्यापीठाने शिफारस केलेली फ्रेंच भाषेची परीक्षा उत्तीर्ण होणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
अर्ज प्रक्रिया
ज्या अर्जदारांना फ्रान्समधील कोणत्याही विद्यापीठात किंवा संशोधन संस्थेत पदव्युत्तर किंवा पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेला आहे अशा अर्जदारांनी त्या संस्थेमार्फत या शिष्यवृत्तीला अर्ज करावेत, त्याकरता अर्जदाराने प्रवेश घेतलेल्या संस्थेला या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी मेल करावा. त्याने स्वत: पाठवलेला किंवा इतर कोणत्याही स्वरूपात आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. एखाद्या अर्जदाराचे नामांकन एकापेक्षा जास्त संस्थांनी पाठवले तर त्याचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
निवड प्रक्रिया
अर्जदाराचा अर्ज व त्याबरोबर संशोधनातील त्याची गुणवत्ता व त्याची शैक्षणिक पाश्र्वभूमी, तसेच ज्या संस्थेने अर्जदाराचे नामांकन केलेले आहे त्या संस्थेचे किंवा विभागाचे फ्रान्समधील स्थान लक्षात घेऊन संबंधित विषयांतील तीन तज्ज्ञांची समिती त्याच्या अर्जाची छाननी करतील. जे अर्जदार शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतील, त्यांना मार्च २०१६ मध्ये त्यांच्या निवडीबाबत कळवले जाईल.
अंतिम मुदत
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ८ जानेवारी २०१६ आहे.
महत्त्वाचा दुवा
http://www.campusfrance.org/en
itsprathamesh@gmail.com