या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखामध्ये स्वातंत्र्यपूर्व भारताचा इतिहास कशा प्रकारे अभ्यासावा याची चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाबाबत चर्चा करू या. स्वातंत्र्योतर भारताचा अभ्यास करताना अंतर्गत राजकारण व व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय भूमिका असे दोन भाग करून अभ्यास करावा.

अंतर्गत राजकारण व व्यवस्था

फाळणीचे कारण, स्वरूप, परिणाम व करण्यात आलेले उपाय असे मुद्दे पाहावेत. संस्थानांचे विलीनीकरण त्याचा क्रम, जुनागढ, हैद्राबाद संस्थाने तसेच गोवामुक्ती या बाबी व्यवस्थित समजून घ्याव्यात.

भाषावर प्रांतरचनेची मागणी, त्यासाठीचे आयोग व त्यांच्या शिफारशी, विशेषत: संयुक्त महाराष्ट्राबाबतच्या शिफारशी बारकाईने अभ्यासायला हव्यात. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा अभ्यास त्यात सहभागी झालेले महत्त्वाचे राजकीय पक्ष व व्यक्ती, त्यांच्या भूमिका, ठळक घडामोडी या मुद्दय़ांच्या आधारे करावा.

राज्यघटनेची निर्मिती, त्यासाठीचे  ब्रिटिश कायदे व इतर देशांतील कायद्यांचे संदर्भ यांचा आढावा पेपर २ मध्ये समाविष्ट असला तरी इथेही महत्त्वाचा आहे.

अंतर्गत मुद्दय़ांमध्ये आíथक व वैज्ञानिक क्षेत्रातील वाटचाल व राजकीय घडामोडी समांतरपणे अभ्यासाव्यात. कृषी, उद्योगधंदे, शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान यामधील प्रगती, इंदिरा गांधींच्या नेतृत्वाचा उदय, राज्यांतील आघाडीची सरकारे, विद्यार्थ्यांमधील असंतोष, जयप्रकाश नारायण आणि आणीबाणी या सगळ्या घटकांचा अभ्यास एकमेकांशी जोडून परस्परसंबंध समजून घेऊन करायला हवा.

पहिल्या सहा पंचवार्षकि योजनांचा संदर्भ पंजाब व आसाममधील दहशतवाद, नक्षलवाद व माओवाद यांचा अभ्यास करताना घेणे आवश्यक आहे. पर्यावरण, महिला व वंशिक चळवळींचा अभ्यास ४०च्या दशकापासून पुढे करायला हवा.

अंतर्गत व्यवस्थेच्या अभ्यासामध्येच नेहरू, शास्त्री व इंदिरा गांधी यांच्या कालखंडातील आंतरराष्ट्रीय भूमिकांचा संदर्भ लक्षात घेणे आवश्यक आहे.

आंतरराष्ट्रीय भूमिका

नेहरूंचे अलिप्ततेचे धोरण, शेजारील राष्ट्राशी संबंध, आंतरराष्ट्रीय राजकारणामधील भारताची भूमिका, बांगलादेशाची मुक्ती, इंदिरा गांधींच्या काळातील अलिप्ततावादाचा अभ्यासक्रमामध्ये समावेश असला तरी त्यानंतरच्या पंतप्रधानांची ठळक ऐतिहासिक कारकीर्द, जागतिकीकरणाची सुरुवात या बाबींचा आढावा घेणेही आवश्यक आहे.

आंतरराष्ट्रीय धोरणांचा अभ्यास करताना त्याची आंतरराष्ट्रीय पाश्र्वभूमी, नेमके स्वरूप, ठळक वैशिष्टय़े, त्यामध्ये कालंतराने झालेले बदल व त्यांची कारणे; धोरणाच्या अंमलबजावणीदरम्यान घडलेल्या ठळक आंतरराष्ट्रीय घडामोडी व आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया यांचा अभ्यास करायला हवा. याबाबतचे तज्ज्ञांचे मूल्यमापन समजून घ्यायला हवे.

महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा

महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा अभ्यासताना महाराष्टातील लोककला, शास्त्रीय संगीत, चित्रपट, दृष्यकला व वाङ्मय अशा पाच मुख्य विभागांतून सांस्कृतिक वारशाचा अभ्यास करावा.

दृश्यकलांचा अभ्यास प्राचीन ते आधुनिक अशा क्रमाने करावा. प्राचीन कला आढळणारी स्थाने, त्यांचा काळ, त्यांचे स्वरूप (वापरलेले तंत्रज्ञान, आकार इ.) हे मुद्दे प्राचीन कलांच्या बाबतीत महत्त्वाचे आहेत. मध्ययुगीन दृश्यकलांसाठीही हे मुद्दे पायाभूत आहेत. मात्र त्यामध्ये समकालीन इतर कलाकृतींचा तुलनात्मक आढावा घेणे महत्त्वाचे आहे.

वाङ्मय / साहित्याच्या अभ्यासक्रमात उल्लेख केलेल्या साहित्य प्रकाराची वैशिष्टय़े, महत्त्वाचे साहित्यकार, त्यांच्या प्रसिद्ध रचना, त्यांचे महत्त्व तसेच वेगवेगळ्या वाङ्मय कालखंडांची वैशिष्टय़े, महत्त्वाचे साहित्यकार, त्यांच्या प्रसिद्ध रचना, त्यांचे महत्त्व यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

प्रायोगिक कलांपकी लोककलांचे स्वरूप, त्यांचे धार्मिक पलू, त्यांचे सांस्कृतिक महत्त्व, विशिष्ट भौगिलिक स्थान, महत्त्वाचे प्रसिद्ध कलाकार व त्यांच्याबाबतची ठळक तथ्ये व त्यांच्या संवर्धनाचे प्रयत्न असे मुद्दे पाहावेत. इतर प्रायोगिक कलांसाठी वैशिष्टय़े, महत्त्वाचे कलाकार, विकासाचे प्रमुख टप्पे या बाबी महत्त्वाच्या आहेत.

महाराष्ट्राच्या विविध प्रांतांतील महत्त्वाचे उत्सव स्वरूप, त्यांचे धार्मिक पलू, त्यांचे सांस्कृतिक महत्त्व, त्यांचे विशिष्ट भौगिलिक स्थान व त्यांच्याबाबतची ठळक तथ्ये या मुद्दय़ांच्या आधारे अभ्यासायला हवेत. महाराष्ट्राच्या विविध प्रांतांतील महत्त्वाचे नृत्यप्रकार, क्रीडा प्रकार, विशिष्ट कला यांचा आढावाही त्यांचे विशिष्ट भौगिलिक स्थान, महत्त्वाचे प्रसिद्ध कलाकार व त्यांच्याबाबतची ठळक तथ्ये या मुद्दय़ांच्या आधारे करावा.