राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर-१ मधील इतिहास या विषय घटकाच्या अभ्यासाविषयी या लेखात चर्चा करूयात.
ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना या मुद्दय़ाच्या अनुषंगाने प्रमुख भारतीय सत्तांच्या विरुद्ध युद्धे, तनाती फौज धोरण, खालसा धोरण, १८५७ पर्यंतची ब्रिटिश राज्याची रचना हा पूर्णपणे तथ्यात्मक भाग असून त्याचा अभ्यास तक्त्याच्या स्वरूपात करणे सोयीचे ठरेल. आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास (१८१८ ते १८५७) अभ्यासताना आधुनिक शिक्षणाची ओळख- वृत्तपत्रे, रेल्वे, टपाल व तार, उद्योगधंदे, जमीन सुधारणा व सामाजिक-धार्मिक सुधारणा यांचा समाजावरील परिणाम हे घटक ध्यानात घ्यावेत. हे घटक अभ्यासताना वृत्तपत्रे, रेल्वे, टपाल व तार, उद्योगधंदे व जमीन सुधारणा यांची तथ्ये कालक्रमाने लक्षात घ्यावी. १८१८ ते १८५७ आणि त्यानंतर काँग्रेसच्या कालखंडात या मुद्दय़ांची भूमिका, महत्त्व काय होते हे अभ्यासावे.
सामाजिक, सांस्कृतिक बदलांचा अभ्यास करताना ख्रिश्चन मिशनसोबतचे संबंध, इंग्रजी शिक्षण व मुद्रणालयाचे आगमन, अधिकृत सामाजिक सुधारणांचे उपाय (१८२८ ते १८५७), सामाजिक, धार्मिक सुधारणांच्या चळवळी- उदा. ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, शीख तसेच मुस्लीम धर्मीयांतील सुधारणा चळवळी, पददलितांच्या उद्धाराचे कार्य, ब्राह्मणेतर चळवळ आणि जस्टिस पार्टी यांचा अभ्यास आवश्यक आहे. सत्यशोधक समाज, अस्पृश्यता निर्मूलनासाठी चळवळी आदींचा अभ्यास करतेवेळी गांधी युगातील त्यांच्या वाटचालींचा अभ्यास जास्त बारकाईने आणि सविस्तर करणे आवश्यक आहे.
सामाजिक, सांस्कृतिक बदलांच्या अभ्यासाबरोबरच महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक व त्यांची विचारप्रणाली आणि कार्य यांचा एकत्रित अभ्यास करावा. राज्य लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षेत दिलेला अभ्यासक्रम आपल्या अभ्यासाच्या क्रमनीतीप्रमाणे करण्यापेक्षा अभ्यासाच्या रणनीतीप्रमाणे करावा, जेणेकरून कमी वेळेत प्रभावी अभ्यास करता येईल. निवडक समाजसुधारक अभ्यासताना गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, म. गो. रानडे, प्रबोधनकार ठाकरे, महर्षी कर्वे, राजश्री शाहू महाराज, महर्षी विठ्ठल शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, विनोबा भावे, वि. दा. सावरकर, अण्णा भाऊ साठे, क्रांतिवीर नाना पाटील, लहुजी साळवे व कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार व कार्य यांचा तथ्यात्मक व विश्लेषणात्मक अभ्यास करावा.
सामाजिक व आíथक जाणीवजागृतीचा अभ्यास करताना भारतीय राष्ट्रवाद- १८५७ चा उठाव आणि त्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेस- १८८५ ते १९४७, आझाद हिंद सेना, महत्त्वाच्या व्यक्तींची भूमिका, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक उत्थानातील वृत्तपत्रांची आणि शिक्षणाची भूमिका अभ्यासायला हवी. भारतीय राष्ट्रवादाची निर्मिती व विकास यांचा अभ्यास करताना त्यामागील सामाजिक पाश्र्वभूमी, राष्ट्रीय संघटनांची स्थापना, शेतकऱ्यांचे उठाव, इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना, मवाळ गट, जहाल गट, मोल्रे-मिंटो सुधारणा, स्वराज्याची चळवळ, लखनौ करार, माँट-फोर्ड सुधारणा अभ्यासावी.
गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ अभ्यासताना गांधीजींचे नेतृत्त्व आणि प्रतिकाराचे तत्त्व, गांधीजींच्या लोकचळवळी, असहकार, सविनय कायदेभंग, वैयक्तिक सत्याग्रह, चले जाव चळवळ, सत्यशोधक समाज, गांधीजी आणि अस्पृश्यता निर्मूलन, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यतेच्या समस्येविषयीचा दृष्टिकोन अभ्यासावा लागेल. मुस्लीम राजकारण आणि स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास करताना सर सय्यद अहमद खान व अलिगढ चळवळ, मुस्लीम लीग व अली बंधू, मो. इक्बाल, मोहमंद अली जीना यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. संयुक्त पक्ष युनियनिस्ट पार्टी व कृषक प्रजा पार्टी, हिंदू महासभेचे राजकारण, साम्यवादी नेते आणि भारतीय स्वातंत्र चळवळ, काँग्रेस समाजवादी पार्टी, राष्ट्रीय चळवळीतील महिला सहभाग, संस्थानातील जनतेची चळवळ, साम्यवादी (डावी) चळवळ, शेतमजुरांची चळवळ, आदिवासींचे बंड, ट्रेड युनियन चळवळ व आदिवासी चळवळ व्यवस्थित अभ्यासावी. हे घटक अभ्यासताना स्वातंत्र्य चळवळ सलगपणे अभ्यासावी.
गांधी युगातील सामाजिक सुधारणांचा अभ्यास करताना अभ्यासक्रमातील १.१, १.३ व १.८ या घटकांतील ‘गांधी युग’ अशा शीर्षकाखाली विशेष लक्ष देऊन अभ्यासाव्यात. मुस्लीम लीग व हिंदू महासभा यांचे राजकारण हे मुद्दे स्वातंत्र्य चळवळीतील प्रवाह म्हणून अभ्यासावेत.
स्वातंत्र्योत्तर भारताचा अभ्यास करताना अंतर्गत राजकारण व व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय भूमिका असे दोन भाग करून अभ्यास करावा. फाळणीचे परिणाम, संस्थानांचे विलीनीकरण, भाषावार प्रांतरचना, नेहरूंचे अलिप्ततेचे धोरण, संयुक्त महाराष्ट्र चळवळ व त्यात सहभागी झालेले महत्त्वाचे राजकीय पक्ष व व्यक्ती, शेजारील राष्ट्रांशी संबंध, आंतरराष्ट्रीय राजकारणामधील भारताची भूमिका, कृषी, उद्योगधंदे, शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान यांमधील प्रगती, इंदिरा गांधींच्या नेतृत्त्वाचा उदय, बांगलादेशाची मुक्ती, इंदिरा गांधींच्या काळातील अलिप्ततावाद, राज्यांतील आघाडीची सरकारे, विद्यार्थ्यांमधील असंतोष, जयप्रकाश नारायण आणि आणीबाणी, पंजाब व आसाममधील दहशतवाद, नक्षलवाद व माओवाद, पर्यावरण चळवळ, महिला चळवळ व वांशिक चळवळ हे घटक अभ्यासक्रमात नमूद करण्यात आले आहेत. मात्र, पं. नेहरू, लालबहादूर शास्त्री व इंदिरा गांधी यांच्या कालखंडातील आंतरराष्ट्रीय भूमिकांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा