छंद आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वाची पारख करण्यामध्ये त्याला असलेले महत्त्व याबाबत मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये छंद नमूद करताना उमेदवारांकडून होणाऱ्या चुका, अपेक्षित प्रश्न व त्यांची तयारी याबाबत चर्चा करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बरेचसे उमेदवार बायोडेटामध्ये फारसा विचार न करता वाचन, चित्रपट पाहणे, गाणी ऐकणे असे छंद लिहितात. असे औपचारिक छंद अनेक उमेदवारांसाठी अपयशाचे कारण सिद्ध झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. सध्या आयकर विभागात कार्यरत अधिकारी मित्राने गाणी ऐकणे हा छंद लिहिला होता. काही आवडती गाणी सांगा, आवडते गायक, काही विशिष्ट गाण्यांचे गीतकार अशी प्रश्नांची संख्या वाढत गेली. मुळातच आवडीने जोपासलेला छंद नसल्यामुळे असे प्रश्न हाताळणे कठीण गेले. परिणामी मुलाखतीमध्ये कमी गुण मिळाले. मुख्य परीक्षेत अतिशय चांगले गुण असताना, फक्त मुलाखतीत मिळालेल्या कमी गुणांमुळे आयएएसची शक्यता शेवटी खालच्या क्रमांकावर स्थिरावली.

फक्त मुलाखतीसाठीच एखादा रेडीमेड छंद तयार करून त्याविषयी प्रश्नोत्तरांची घोकंपट्टी केली असेल तर ती उपयोगी तर ठरणार नाहीच उलट तुम्हाला अडचणीत आणेल. तुमचा व्यवसाय, काम-धंदा छंद होऊ शकत नाही. ती उपजीविकेची साधने असतात. उदाहरणार्थ पेशाने डॉक्टर, वकील, शिक्षक असलेली व्यक्ती आपल्या कामाशी संबंधित इतर अ‍ॅक्टिव्हिटीचा उल्लेख छंद म्हणून करू शकत नाही.

अनेक उमेदवार साधा छंद लिहू या, या नादात वाचन हा छंद नोंदवतात. खरेच वाचनाची आवड असेल, चांगले वाचन असेल तर तसे लिहायला काहीच हरकत नाही.  काय वाचता? कोणत्या प्रकारचे साहित्य आवडते? आवडते लेखक? तेच का आवडतात? त्यांची इतर पुस्तके? अलीकडे वाचलेले पुस्तक अशा प्रश्नांशी सामना करण्याची वैचारिक क्षमता तुमच्याकडे असली पाहिजे. अन्यथा तुमचा प्रभाव कमी होऊन बाकी मुलाखत चांगली झाली असेल तरी निकालावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. एका उमेदवाराने छायाचित्रण हा छंद लिहिला होता. त्याला पहिलाच प्रश्न विचारला गेला, टेलीलेन्स म्हणजे काय? क्रिकेट खेळायला, पाहायला आवडते म्हणून तो छंद होऊ शकत नाही. मुद्दा हा की तुम्हाला तुमच्या छंदाविषयी पुरेशी खरे तर जास्त माहिती असणे अपेक्षित आहे. छंदाच्या तांत्रिक बाजू, संबंधित व्यक्तिमत्त्वे, उदाहरणे, त्या क्षेत्रातील मलाचे टप्पे या बाबींबाबत निरुत्तर होणे परवडणारे नाही. तुमच्या छंदाबाबतच्या चालू घडामोडी, उद्भवले असल्यास विवादबाबतही प्रश्नांची अपेक्षा करता येईल. तुमच्या छंदाचा व्यावहारिक उपयोग आहे का? त्यामध्ये करिअरच्या संधी उपलब्ध आहेत का? असल्यास तुम्ही त्या करिअरकडे का वळला नाही? असे प्रश्न अपेक्षित असतात. मुलाखतीसाठी छंदाविषयी तयारी करताना उमेदवारांनी अपेक्षित प्रश्नांची यादी तयार करावी. मुलाखत घेणाऱ्याच्या भूमिकेतून विचार करावा.

आजच्या स्पध्रेच्या युगात, व्यस्त जीवनशैलीत प्रत्येकाकडे वेळेचाच अभाव आहे. आवश्यक कामे करण्यासाठीच वेळ काढणे शक्य होत नाही, तिथे छंद जोपासणे केवळ अशक्य आहे. अशी अनेकांची भूमिका असते. बऱ्याचदा इच्छा असूनही वेळेचे नियोजन करता येत नाही. अनेकांचा कोणताच छंद नसतो. अशा वेळी औपचारिकता म्हणून किंवा छंद लिहिला नाही असे होऊ नये म्हणून काहीबाही लिहिण्यापेक्षा छंदाचा उल्लेख न केलेलाच बरा. यातून दोन फायदे होतील एकतर औपचारिकता म्हणून एखादा छंद लिहिला आणि त्याबाबत चर्चा झाली तर घोटाळा व्हायचा धोका टळेल. दुसरा महत्त्वाचा फायदा तुमचा प्रामाणिकपणा मुलाखत मंडळाच्या समोर प्रकट होईल. छंद नसणे किंवा बायोडेटामध्ये छंदाचा उल्लेख न केल्यामुळे, मुलाखत मंडळ उमेदवाराविषयी नकारात्मक मत बनवून घेत नाही. छंद असायलाच हवा किंवा तो लिहायलाच हवा असा नियम नाही. पण छंद जोपासला असेल आणि तो लिहिला असेल तर यातून व्यक्तीची अभिरुची, बहुश्रुतता, व्यासंग, चौफेर व्यक्तिमत्त्वाची झलक दिसते. जी मुलाखत मंडळाला प्रभावित करते. म्हणूनच छंद असावा. तो जाणीवपूर्वक जोपासावा.