पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये २०११ साली बदल झाल्यानंतर सामान्य विज्ञान या अभ्यासघटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये वाढ झाली. परिणामी यूपीएससीसाठी पूर्वपरीक्षेकरिता सामान्य अध्ययनांतर्गत येणाऱ्या इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था या विषयांइतकेच महत्त्व सामान्य विज्ञानाला प्राप्त झाले. २०११ ते २०१७ या कालावधीमध्ये सामान्य विज्ञानावर सुमारे ८ ते २० प्रश्न विचारले गेले. सामान्य विज्ञान या अभ्यासघटकाचे इतके वेटेज असूनही विद्यार्थी या घटकाकडे दुर्लक्ष करताना दिसतात. याची कारणमीमांसा करताना एक बाब स्पष्ट होते ती म्हणजे, या अभ्यासघटकाची व्याप्ती होय. सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, कृषीशास्त्र या पारंपरिक शास्त्र विषयांबरोबरच जैवतंत्रज्ञान, अवकाश संशोधन, जेनेटिक्स, नॅनो तंत्रज्ञान, दूरसंचार तंत्रज्ञान इ. विषयांचा समावेश होतो. या अभ्यासघटकातील विषयांचे वैविध्य पाहता हा घटक विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण करतो.
सामान्य विज्ञानाची तयारी करताना विद्यार्थ्यांसमोर मोठे आव्हान असते ते म्हणजे कुठून सुरुवात करायची, नेमके काय वाचायचे, नोट्स कशा बनवायच्या. परिणामी हा विषय कसा हाताळायचा याबाबत अगदी शास्त्र वा मेडिकल सायन्सची पाश्र्वभूमी असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही संभ्रमावस्था दिसते. या अभ्यासघटकाविषयीची संभ्रमावस्था काढून टाकावी; कारण विज्ञानाचे सर्व प्रश्न सोडवू शकलो तर निश्चितच इतरांपेक्षा आघाडी मिळू शकते. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधून या घटकावर विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण केल्यानंतर असे दिसते की, या अभ्यास घटकावर प्रभुत्व मिळविण्यासाठी कुठल्याही विशेष ज्ञानाची आवश्यकता नसते. असे प्रश्न, कोणतीही शिक्षित व्यक्ती अगदी शास्त्रशाखेची पाश्र्वभूमी नसतानाही सोडवू शकते.
उदा. २०१४ –
‘खालीलपैकी रासायनिक बदलांचे उदाहरण/उदाहरणे कोणती?
पर्याय
(१) सोडियम क्लोराईडचे स्फटीकीकरण, (२) बर्फाचे वितळणे
(३) दूध आंबणे.
या प्रश्नावरून स्पष्ट होते की, या अभ्यासघटकावर येणाऱ्या प्रश्नांमधून प्रामुख्याने विद्यार्थ्यांचा सामान्य विज्ञानातील ‘अवेअरनेस’ तपासला जातो.
सामान्य विज्ञानावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमध्ये पारंपरिक घटकांवरील प्रश्नांसोबतच चालू घडामोडी व तंत्रज्ञानविषयक प्रश्नांचेही प्राबल्य दिसून येते. उदा. काही वर्षांपूर्वी ‘स्वाईन फ्लू’ या रोगाचा मोठय़ा प्रमाणावर प्रसार झाला होता. या पाश्र्वभूमीवर २०१५ मध्ये प्रश्न विचारला गेला.
एचवनएनवन हा विषाणू सध्या चच्रेमध्ये आहे, खालीलपैकी कोणत्या रोगाशी संबंधित आहे?
(१) एड्स (२) बर्ड फ्लू
(३) डेंग्यू (४) स्वाईन फ्लू.
सामान्य विज्ञानावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी विज्ञानातील मूलभूत संकल्पना जाणून घेणे श्रेयस्कर ठरेल. सामान्य विज्ञानाचा आवाका लक्षात घेता यामध्ये अंतर्भूत विषयातील घटकांचे प्राधान्याने अध्ययन करणे आवश्यक आहे. यामध्ये भौतिकशास्त्रातील विविध नियम, सिद्धांत उदा. ऑप्टिक्स, ध्वनी, चुंकबत्व, विद्युत, घनता इ. तर जीवशास्त्रामध्ये पचनसंस्था, प्रजननसंस्था, विविध प्रकारचे रोग, पेशींचे प्रकार, वनस्पतीचे वर्गीकरण, जनुकीय अभियांत्रिकी, जीवनसत्त्वे या बाबींविषयी माहिती घ्यावी. रसायनशास्त्रामध्ये महत्त्वाची रासायनिक संयुगे, खनिजे व त्यांचा आढळ, धातू व त्यांचे गुणधर्म, कार्बन व त्यांची संयुगे, रोजच्या आयुष्यामध्ये होणारा रसायनशास्त्राचा वापर यांचा प्रामुख्याने अभ्यास करावा. यासोबतच जैवतंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान, ऊर्जा संरक्षण या क्षेत्रातील चालू घडामोडींचा मागोवा घेत राहावे. दरवर्षी नोबेल पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर त्यातील शास्त्रशाखेशी संबंधित संशोधनाविषयी अधिक जाणून घेणे श्रेयस्कर ठरेल.
सामान्य विज्ञान या घटकासाठी सर्वप्रथम
८ ते १२ पर्यंतची एनसीईआरटीची क्रमिक पुस्तके अभ्यासावीत. कारण या पुस्तकांमधूनच मूलभूत संकल्पना स्पष्ट होतात. जर एखादी संकल्पना गोंधळात टाकणारी असेल तर इंटरनेटचा वापर श्रेयस्कर ठरेल. बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या संदर्भग्रंथांचा साठा करून त्यांची घोकंपट्टी करू नये; कारण बहुतेक प्रश्न मूलभूत संकल्पना व चालू घडामोडींशी संबंधित असतात.
या घटकाच्या तयारीकरिता ‘सायन्स रिपोर्टर’, ‘डाऊन टू अर्थ’ इ. मासिके, ‘द हिंदू’ या वृत्तपत्रामधील ‘सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी’ ही पुरवणी उपयुक्त ठरते. मात्र वरील मासिकांमध्ये पुष्कळ माहिती दिलेली असते. परिणामी त्यातील निवडक बाबींवर फोकस करून त्यांच्या नोट्स तयार कराव्यात. याशिवाय इस्रो, डीआरडीओ, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, पी. आय. बी. यांच्या संकेतस्थळांना नियमितपणे भेट द्यावी. मानवी शरीरासंबंधीच्या माहितीकरिता एनबीटी प्रकाशनाचे ‘ह्य़ूमन मशीन’ हे पुस्तक उपयुक्त आहे.