शासकीय अधिकारी कल्याणकारी राज्याचे प्रतिनिधित्व करत असतात. शासनाच्या नफ्या-तोटय़ाचे नव्हे तर जनतेच्या ‘कल्याणा’चे उद्दिष्ट ठेवून त्यांना कार्य करायचे असते. हे कल्याणकारी कामाचे मापदंड समाजाची रचना, वैशिष्टय़े आणि इतिहास यांच्या आधारे ठरतात. त्यामुळेच स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमामध्ये ‘इतिहास’ हा घटक समाविष्ट असतो. ‘इतिहास’ हा समाज समजून घेण्याचा एक दृष्टिकोन आहे. त्यामुळे तथ्यांच्या जंत्रीपेक्षा लॉजिक वापरून केलेला अभ्यास सोपा आणि परिणामकारक ठरतो, हे लक्षात घ्यायला हवे.

मागील लेखामध्ये चर्चा केल्याप्रमाणे अभ्यासक्रमाचे विभाजन तीन कालखंड आणि कला संस्कृतिघटक अशा चार विभागांत करणे व्यवहार्य ठरेल असे मांडण्यात आले आहे. त्या त्या कालखंडातील सामाजिक व आर्थिक मुद्दय़ांचा तसेच कला व संस्कृतिघटकाचा अभ्यास कशा प्रकारे करावा या बाबतची चर्चा या लेखामध्ये करण्यात येत आहे.

सामाजिक इतिहास

*    आधुनिक शिक्षणाचा अभ्यास करताना विविध समाजसुधारकांचे शिक्षणविषयक कार्य, शैक्षणिक संस्था, त्यांचे संस्थापक, देणगीदार, वैशिष्टय़े अशा मुद्दय़ांच्या आधारे करावा. या बाबतीत नेमलेल्या समित्या व त्यांच्या शिफारशी यांचा अभ्यासही महत्त्वाचा ठरेल. महिला, मागासवर्गीयांच्या शिक्षणावर भर द्यावा, तसेच छत्रपती शाहू महाराजांची वसतिगृहे व इतर शैक्षणिक निर्णय यांचा अभ्यास महत्त्वाचा आहे.

*    वृत्तपत्रे, भाषा, त्यांचे संस्थापक, असल्यास ब्रीदवाक्य, सर्वात पहिले, सर्वात जुने वृत्तपत्र, नियतकालिक अशा पद्धतीने मुद्रित माध्यमांचा अभ्यास करता येईल. यामध्ये काही संघटनांची मुखपत्रेसुद्धा महत्त्वाची आहेत. महत्त्वाच्या वृत्तपत्रांबाबत त्यांमधील महत्त्वाच्या लेखांची शीर्षके, जाहिराती, देणगीदार, मदतगार व्यक्ती यांचा आढावाही अतिरिक्त स्कोअरसाठी महत्त्वाचा ठरेल.

*    सामाजिक-सांस्कृतिक बदल व भारत आणि महाराष्ट्रातील समाजसुधारकांचे कार्य या बाबी एकत्रितपणे अभ्यासायच्या आहेत. हा भाग संबंधित मुद्दय़ाची पाश्र्वभूमी समजून घेऊन मग याच्या नोट्स टेबलमध्ये काढाव्यात. समाजसुधारकांचा अभ्यास करताना त्यांची ठळक वैयक्तिक माहिती – पूर्ण नाव, महत्त्वाचे नातेवाईक, शिक्षण, सोबती इ., स्थापन केलेल्या आणि महत्त्वाची भूमिका निभावलेल्या संस्था, असल्यास वृत्तपत्र/ नियतकालिक, साहित्य, त्यातील काही महत्त्वाचे उद्गार, महत्त्वाच्या घटना, कार्ये (कालानुक्रमे), असल्यास लोकापवाद आणि इतर माहिती.

*    यामधील संस्थांच्या स्तंभात संस्थेची स्थापना, कार्यपद्धती, महत्त्वाचे योगदान, ब्रीद, असल्यास मुखपत्र व संबंधित महत्त्वाची व्यक्तिमत्त्वे यांचा समावेश असावा.

*    विशेषत: अभ्यासक्रमात नमूद केलेल्या संस्था, समाजसुधारक, स्वातंत्र्यलढय़ावर प्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या दलित व मुस्लीम सुधारणा चळवळींचा अभ्यास पाश्र्वभूमी, कारणे, स्वरूप, परिणाम, प्रतिक्रिया व व्यक्तिमत्त्वे या मुद्दय़ांच्या आधारे करणे आवश्यक आहे.

*    ऐतिहासिक तथ्यांच्या आधारे सामाजिक सुधारणांबाबतचे मूल्यमापन नोंदवल्यास बहुविधानी प्रश्नांची चांगली तयारी होईल.

आर्थिक इतिहास

*    ब्रिटिशांची आर्थिक नीती, महत्त्वाचे चार्टर कायदे, जमीन सुधारणा, जंगल कायदे इ.चा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम व संबंधित भारतीय नेत्यांची विधाने या गोष्टी राष्ट्रवादाचा उदय व संघर्ष अभ्यासण्याआधी समजून घ्यायला हव्यात.

*    रेल्वे, टपाल व इतर प्रशासनिक व आर्थिक सुधारणांचा अभ्यास विकासाचे टप्पे, प्रत्येक टप्प्याची पाश्र्वभूमी, संबंधित राज्यकत्रे या मुद्दय़ांच्या आधारे करणे आवश्यक आहे.

*    भारतीय उद्योगपती, भारतीय उद्योगांची सुरुवात व त्यांची पाश्र्वभूमी आणि त्यांच्याबाबत ब्रिटिशांचे धोरण हा भाग स्वातंत्र्यपूर्व कालखंडासाठी तर कामगार चळवळी आणि त्यांची वाटचाल, महत्त्वाचे नेते, संघर्ष, मुखपत्रे या मुद्दय़ांचा विचार स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योतर या दोन्ही कालखंडांसाठी करावा. गांधी पर्वामधील स्वातंत्र्यलढय़ातील त्यांचे योगदानही विशेषत्वाने अभ्यासावे.

*    शेतकरी व आदिवासींचे बंड, १८५७ चा उठाव, गांधी युगातील शेतकरी, आदिवासी, कामगार,  संस्थानातील जनता  इ.च्या चळवळी/ बंड अशा संघर्षांचा अभ्यास पुढील मुद्दय़ांच्या आधारे करता येईल.

*  कारणे/ पाश्र्वभूमी

*  स्वरूप/ विस्तार/ वैशिष्टय़े

*  प्रमुख नेते व त्यांच्या बाबतीत ठळक घडामोडी

*  यशापयशाची कारणे

* परिणाम

*  उपलब्ध असल्यास इतिहासकारांच्या/ समकालीनांच्या प्रतिक्रिया

सांस्कृतिक इतिहास

*    महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशामध्ये दृश्यकलांचा अभ्यास प्राचीन ते आधुनिक अशा क्रमाने करणे सोपे होईल. प्राचीन कला आढळणारी स्थाने, त्यांचा काळ व स्वरूप (आकृत्या, रंग, तंत्रज्ञान इ.) आश्रयदाते राज्यकत्रे अशा मुद्दय़ांच्या आधारे टेबल फॉर्ममध्ये करता येईल. मध्ययुगीन दृश्यकलांचाही अशाच प्रकारे अभ्यास करता येईल. येथे समकालीन इतर स्थापत्य व चित्रकलांचा आढावा घेतला तर जास्त उपयोगी ठरेल.

*    वाङ्मय प्रकारातील ज्यांचा उल्लेख अभ्यासक्रमात केलेला आहे त्यांची वैशिष्टय़े, महत्त्वाचे साहित्यकार, त्यांच्या प्रसिद्ध रचना, त्यांचे महत्त्व अशा प्रकारे अभ्यास आवश्यक आहे.

*    प्रायोगिक कलांपैकी लोककलांचे स्वरूप, त्यांचे सांस्कृतिक-धार्मिक पलू व त्यांचे विशिष्ट प्रदेश व असल्यास संबंधित महत्त्वाचे कलाकार, त्यांच्या संवर्धनाचे प्रयत्न असे मुद्दे अभ्यासावेत. इतर प्रायोगिक कलांमधील विकासाचे प्रमुख टप्पे, प्रसिद्ध/ पुरस्कारप्राप्त कलाकार इ. बाबी महत्त्वाच्या आहेत.

Story img Loader