लंडनमधील इंपिरियल विद्यापीठाच्या उद्योग व व्यवस्थापन विभागाकडून (इंपिरियल कॉलेज बिझनेस स्कूल) दरवर्षी हुशार व उत्तम शैक्षणिक पाश्र्वभूमी असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना एमबीएसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. दरवर्षीप्रमाणे २०१८-१९  या शैक्षणिक वर्षांत दिल्या जाणाऱ्या  Brilliant Minds MBA Scholarship या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

शिष्यवृत्तीविषयी

लंडनमधील ‘इंपिरियल कॉलेज’ हे एक नामांकित विद्यापीठ आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख टिकवून असलेले हे विद्यापीठ जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या दहा विद्यापीठांपैकी एक आहे. तसेच टाइम्स हायर एज्युकेशनच्या क्रमवारीनुसार जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेले हे विद्यापीठ राष्ट्रीय क्रमवारीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या इंपिरियल कॉलेज बिझनेस स्कूलची स्थापना अगदीच अलीकडे म्हणजे सन २००४ साली झालेली आहे. लंडन शहराच्या पश्चिमेला असलेल्या विद्यापीठाच्या मुख्य आवारात स्थित या विभागाची स्थापना दुसऱ्या एलिझाबेथ यांच्या प्रयत्नाने झाली. विद्यार्थ्यांमध्ये जागतिक पातळीवरील व्यावसायिक स्पर्धेचे आव्हान पेलण्याची क्षमता विकसित व्हावी आणि त्या त्या क्षेत्रांमधील गुणवत्ता तयार होऊन त्या माध्यमातून जागतिक नेतृत्व आकारास यावे या हेतूने विद्यापीठाकडून हा शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो. याअंतर्गत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना २०१८-१९ या शैक्षणिक वर्षांत एमबीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश व शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. एमबीए अभ्यासक्रम व शिष्यवृत्ती दोन्हींचा कालावधी एक वर्षांचा असेल. या शिष्यवृत्ती अंतर्गत अर्जदारास कमाल ५१,००० युरोज शिक्षण शुल्क व त्यासहित इतर सुविधा दिल्या जाणार आहेत.

आवश्यक अर्हता

ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. अर्जदार मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान प्रथमश्रेणी  पदवीधर असावा. त्याच्याकडे कार्यानुभव असावा. अर्जदाराचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. अर्जदाराची पदवीपर्यंतची शैक्षणिक पाश्र्वभूमी उत्कृष्ट असावी. त्याचा सीव्ही अतिशय उत्तम असावा. अर्जदाराने जीमॅट ही परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय भारतीय विद्यार्थ्यांनी इंग्रजीच्या टोफेल किंवा आयईएलटीएस या दोन्ही परीक्षांपैकी एक परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. या शिष्यवृत्तीसाठी त्याने पूर्ण केलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसहित जमा करावा. अर्जदाराने अभ्यासक्रमाबद्दल अधिक माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन मिळवावी.

अर्ज प्रक्रिया

या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या सॉफ्ट प्रतींसह संकेतस्थळावरच जमा करायचा आहे. अर्जासह अर्जदाराने त्याचे एसओपी, सीव्ही, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सस्क्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती, जीमॅट व आयईएलटीएस किंवा टोफेल यापैकी आवश्यक परीक्षांचे गुण, कार्यानुभवाचे प्रशस्तीपत्र इत्यादी गोष्टी जोडाव्यात. शिफारसपत्रांसाठी मात्र अर्जदाराने त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन शिक्षक वा प्राध्यापकांचे ई-मेल अर्जामध्ये नमूद करावेत. विद्यापीठ स्वतंत्रपणे संबंधित प्राध्यापकांस संपर्क करून शिफारसपत्र देण्यासाठी विनंती करेल. अर्जदाराने शिष्यवृत्तीसाठी निबंध लिहून तो अर्जासह जमा करावयाचा आहे, अथवा स्वत: तो अर्ज  mba@imperial.ac.uk या ई-मेलवर पाठवायचा आहे. या इमेलच्या विषयामध्ये मात्र अर्जदाराने  Brilliant Minds Scholarship application असे स्पष्टपणे लिहिणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया

शिष्यवृत्तीसाठी अंतिम निवड करण्यासाठी विद्यापीठाकडून दोन समितींची स्थापना केली गेली आहे. अर्जदाराची गुणवत्ता लक्षात घेऊन त्याच्या अर्जाची तपासणी केली जाईल. यातून गुणवत्तेनुसार निवडक विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात येईल. दोन्ही समितींचा निर्णय अंतिम राहील. अंतिम निवड झालेल्या अर्जदारांना त्यांच्या निवडीबाबत कळवले जाईल.

उपयुक्त संकेतस्थळ :- https://wwwf.imperial.ac.uk/

अंतिम मुदत  

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. २६ जानेवारी २०१८ आहे.

itsprathamesh@gmail.com

Story img Loader