भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे
प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com
पुणे येथे असलेली इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरॉलॉजी (आयआयटीएम) म्हणजेच भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था ही संशोधन संस्था. भारतातील मान्सूनचे हवामान आणि उष्णकटिबंधीय महासागरातील समुद्राच्या हालचालींसंदर्भात संशोधन करणारी ही देशातील महत्त्वाची आणि एकमेव संशोधन संस्था आहे. या संशोधन संस्थेची स्थापना १९६२ साली झाली. सध्या आयआयटीएम ही एक स्वायत्त शासकीय संशोधन संस्था असून संस्थेच्या स्वायत्त दर्जामुळे ते एक मान्यताप्राप्त शैक्षणिक केंद्रदेखील आहे. केंद्र सरकारच्या भूविज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणारी ही संस्था मात्र सीएसआयआरशी (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) संलग्न नाही. मात्र संस्था भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या व हवामान विज्ञान विभागाअंतर्गत कार्यरत असलेली एक अग्रगण्य प्रयोगशाळा निश्चितच आहे.
* संशोधन संस्थेविषयी
भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था म्हणजेच आयआयटीएम ही स्वायत्त संशोधन संस्था केंद्र सरकारचे भूविज्ञान मंत्रालय आणि हवामान विज्ञान विभाग या दोन्ही आस्थापनांच्या देखरेखीखाली आपले संशोधन करत आहे. १९६२ साली भारत सरकारच्या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत प्रस्तावित केल्यानुसार या संस्थेची स्थापना पुण्यामध्ये इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरॉलॉजी (आयटीएम) म्हणून करण्यात आली. त्या वेळी संस्था पुणे येथील हवामान विज्ञान विभाग (आयएमडी) च्या अंतर्गत स्वतंत्रपणे कार्यरत होती. संस्था त्या वेळेस देशभरातील हवामानाचे निरीक्षण करणे, हवामानाचा अंदाज बांधणे आणि भारतातील भूकंपांसंबंधी संशोधन करणे इत्यादी स्वरूपाची कामे करत असे. नंतर दि. १ एप्रिल १९७१ रोजी भारत सरकारच्या वैज्ञानिक संशोधन समितीची शिफारस ग्राह्य मानून या संस्थेचे नाव सुधारित करून ते आयआयटीएम म्हणजेच भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था असे करण्यात आले. त्याच वेळी संस्थेला स्वायत्त संस्थेचा दर्जा बहाल करण्यात आला. स्थापनेपासून ते १९८४ पर्यंत आयआयटीएम केंद्र सरकारच्या पर्यटन आणि नागरी उड्डाण मंत्रालयाअंतर्गत संशोधन क्षेत्रात कार्यरत होती. नंतर १९८५ मध्ये संस्था केंद्र सरकारच्याच विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिपत्याखाली आपले संशोधन करू लागली. २००६ साली तत्कालीन राष्ट्रपतींच्या सूचनेनुसार आयआयटीएम आपले संशोधनकार्य भूविज्ञान मंत्रालयाअंतर्गत करत आहे. संस्थेकडे चांगल्या पायाभूत सुविधांबरोबरच उत्कृष्ट संगणकीय सुविधाही उपलब्ध आहेत. भारतातील सर्वात मोठय़ा संगणकीय क्षमतेंपैकी एक, आदित्य एचपीसी, आयआयटीएममध्ये आहे. आयआयटीएममधील संशोधकांनी संस्थेमध्येच ‘प्रत्यूष’ या नावाचा एक महासंगणक तयार केलेला असून तो देशातील सर्वात वेगवान महासंगणकांपैकी एक आहे. ‘प्रत्यूष’चा उपयोग संस्था हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी तसेच मान्सूनसहित मासेमारी, हवेची गुणवत्ता, त्सुनामी, चक्रीवादळ, भूकंप, पूर आणि दुष्काळ इत्यादी गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी करते. जगभरात हवामान संशोधनासाठी हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग सुविधा वापरणारा जपान, अमेरिका व इंग्लंडनंतर भारत हा चौथा देश आहे.
* संशोधनातील योगदान
आयआयटीएम या संशोधन संस्थेने हवामानशास्त्र या विषयातील मूलभूत व उपयोजित संशोधनाला पूर्णवेळ वाहून घेतलेले आहे. हवामानाचा अंदाज सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या सागरी वातावरणातील हवामान प्रणालीवरील मूलभूत संशोधनामध्ये आयआयटीएमला जगातील सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र बनवणे, या ध्येयाने संस्था आपले संशोधनकार्य करत आहे. म्हणूनच संस्था हवामानशास्त्राशी संबंधित वा आवश्यक असलेले इतर विषय जसे की भौतिकशास्त्र, समुद्रशास्त्र, रसायनशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र इत्यादी विषयांमध्ये संस्था आंतरविद्याशाखीय संशोधन ((Interdisciplinary research) करत आहे. हवामानशास्त्रातील रेन अॅण्ड क्लाउड मायक्रोफिजिक्स, क्लायमेट व्हेरिएबिलिटी अॅण्ड प्रेडिक्शन, एअर पोल्युशन स्टडीज, ओशन मॉडेिलग, अॅटमॉस्फेरिक इलेक्ट्रिसिटी, अॅटमॉस्फेरिक केमिस्ट्री अॅण्ड डायनॅमिक्स, लँड सरफेस प्रोसेस स्टडीज, एअरबोर्न मेजरमेंट इत्यादी विषय आयआयटीएमच्या संशोधनाचे प्रमुख विषय आहेत. संस्थेकडे या सर्व विषयांतील संशोधन आणि विकासाशी संबंधित विविध विषयांमध्ये मूलभूत संशोधन करण्यासाठी तज्ज्ञ आणि कुशल शास्त्रज्ञांचे पुरेसे पाठबळ उपलब्ध आहे.
* विद्यार्थ्यांसाठी संधी
आयआयटीएम ही संशोधन संस्था आणि विद्यापीठाच्या दर्जाचे एक स्वायत्त शैक्षणिक केंद्रही आहे. त्यामुळे या संस्थेमध्येही विद्यार्थ्यांना पदव्युत्तर व पीएचडी संशोधन अभ्यासक्रम पूर्ण करता येतात. संस्थेचे अनेक पीएचडी पदवीधारक भारतात व परदेशातदेखील संशोधन, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहेत. संस्था देश-विदेशातील विविध विद्यापीठांबरोबर पदव्युत्तर व पीएचडी अभ्यासक्रमासाठी संलग्न आहे. महाविद्यालय किंवा विद्यापीठामधील विद्यार्थी त्यांचे पदवी व पदव्युत्तर स्तरावरील संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी येथे येतात.
* संपर्क
भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था / इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरॉलॉजी (आयआयटीएम),
डॉ. होमी भाभा मार्ग,
पाषाण, पंचवटी, पुणे- ४११००८.
दूरध्वनी +९१-२०-२५९०४२००.
संकेतस्थळ – https://www.tropmet.res.in/