सीएसआयआर फोर्थ पॅराडिम इन्स्टिटय़ूट, बंगळुरू
कर्नाटक राज्यातील बंगळुरूस्थित असलेली सीएसआयआर फोर्थ पॅराडिम इन्स्टिटय़ूट (सीएसआयआर – ४ पीआय) ही मॅथॅमॅटिकल मॉडेलिंग अॅण्ड कॉम्प्युटर सिम्युलेशन या विषयामध्ये संशोधन करणारी संस्था आहे. या संशोधन संस्थेची स्थापना १९८८ मध्ये झाली आहे. सीएसआयआर – ४ पीआय ही नावाप्रमाणे सीएसआयआरशी (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) संलग्न संशोधन संस्था आहे. समाजाच्या विकासासाठी आवश्यक असणारे गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी क्षमता विकसित करणे, नवीन तंत्र वा अल्गोरिदम इत्यादीच्या विकासाद्वारे गणिती मॉडेलिंगची व्याप्ती आणि ताकद वाढविणे आणि गणिती मॉडेलिंग आणि कॉम्प्युटर सिम्युलेशनच्या क्षेत्रातील उच्च दर्जाची मनुष्य-शक्ती प्रशिक्षित आणि विकसित करणे या विशिष्ट हेतूंनी या संशोधन संस्थेची स्थापना करण्यात आली होती.
संस्थेविषयी – सीएसआयआर – ४ पीआय ही संस्था यापूर्वीची सेंटर फॉर मॅथॅमॅटिकल मॉडेलिंग अॅण्ड कॉम्प्युटर सिम्युलेशन म्हणजेच सीएमएमएसीएस किंवा सीमॅक्स म्हणूनही ओळखली जाते. ही संस्था गुंतागुंतीच्या व्यवस्था आणि संरचनामधील मॉडेलिंग पद्धती विकसित करण्यामध्ये आपले योगदान देत आहे. विज्ञान शाखेमधील भूशास्त्र आणि जीवशास्त्रासारख्या मूलभूत विषयांच्या विविध उपशाखांमधील संशोधनाच्या दृष्टिकोनातून जटिल प्रणालींचे प्रारूप विकसित करण्याच्या दृष्टीने मॉडेलिंगमधील विविध पद्धती अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. मूलभूत संशोधनाच्या बरोबरच इतर क्षेत्रांमधीलही मॅथॅमॅटिकल मॉडेलिंग आणि कॉम्प्युटर सिम्युलेशनचे वाढते महत्त्व ओळखून कौन्सिल ऑफ सायंटिफिक अॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च (सीएसआयआर) ने १९८० च्या उत्तरार्धात त्या दृष्टिकोनातून हळूहळू पावले उचलायला सुरुवात केली. म्हणूनच १९८८ साली मध्ये सीएसआयआरने ‘सेंटर फॉर मॅथॅमॅटिकल मॉडेलिंग अॅण्ड कॉम्प्युटर सिम्युलेशन’ (C-MMACS-सीमॅक्स) या संस्थेची स्थापना केली. सिमॅक्सचे प्रमुख केंद्र नॅशनल एरोस्पेस लेबोरेटरीज (एनएएल), बंगळुरूच्या बेलूर कॅम्पसमध्ये स्थित आहे. या केंद्राचे संशोधन-शैक्षणिक धोरण व अभ्यासक्रम यांना सीएसआयआरच्या महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एका उच्च पातळीवरील सल्लागार समितीने मान्यता दिलेली आहे. या समितीमध्ये विविध शैक्षणिक, संशोधन व विकास व औद्योगिक संस्थांमधील सदस्यांचा समावेश आहे.
संशोधनातील योगदान – सीएसआयआर – ४ पीआय ही मॅथॅमॅटिकल मॉडेलिंग अॅण्ड कॉम्प्युटर सिम्युलेशनमध्ये संशोधन करणारी संस्था आहे. सीएसआयआरच्या मार्गदर्शनानुसार ही संस्था विज्ञान व अभियांत्रिकीच्या इतर शाखांमधील संशोधनाशी जुळवून घेत आंतरविद्याशाखीय संशोधन (Interdisciplinary research) करत आहे. विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील मॉडेलिंग अॅण्ड कॉम्प्युटर सिम्युलेशन म्हणूनच विविध विषयांतील संशोधनासाठी उपयुक्त ठरत आहे. संशोधन विभागांच्या साहाय्याने संस्थेने अनेक प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे ते पूर्ण केले आहेत. संस्थेच्या संकेतस्थळावर याची माहिती सहजपणे मिळून जाते. संस्थेमध्ये कार्बन सायकल अॅण्ड ओशियन मॉडेलिंग, क्लायमेट अॅण्ड एन्व्हायर्मेटल मॉडेलिंग, कॉम्प्युटेशनल मेकॅनिक्स आणि सॉलिड अर्थ मॉडेलिंग इ. शाखांमधील संशोधन होते. सध्या अनेक विद्यार्थी आपापल्या तज्ज्ञ संशोधक मार्गदर्शकांच्या मदतीने वरील विषयांतील पीएच.डी.चे संशोधन पूर्ण करत आहेत.
विद्यार्थ्यांसाठी संधी – सीएसआयआर – ४ पीआय फक्त संशोधन संस्था नाही तर देशातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्रसुद्धा आहे. Academy of Scientific & Innovative Research (AcSIR) च्या अंतर्गत संस्थेमध्ये शेकडो विद्यार्थी येथे पीएच.डी.चे संशोधन करतात. तसेच, सीएसआयआर -४ पीआय भारतातील व भारताबाहेरील अनेक विद्यापीठांशी पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी संलग्न आहे. विद्यापीठांमध्ये पीएच.डी.चे संशोधन करणारे अनेक विद्यार्थी संशोधनाचा विशिष्ट भाग अथवा माहिती संकलन किंवा माहिती प्रक्रिया इत्यादीसारख्या बाबी पूर्ण करण्यासाठी सीएसआयआर – ४ पीआयमध्ये ठरावीक काळ व्यतीत करत असतात. तसेच दरवर्षी उरकफ वा वॅउ च्या परीक्षांमधून गुणवत्ताप्राप्त अनेक जेआरएफ/ एसआरएफ विद्यार्थी पीएच.डी.चे संशोधन करण्यासाठी प्रवेश घेतात. याव्यतिरिक्त, दरवर्षी विविध महाविद्यालय व विद्यापीठांमधील पदवी/ पदव्युत्तर विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुट्टय़ांमध्ये त्यांचे संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इथे येत असतात. अूरकफ च्या शैक्षणिक कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, संशोधक विद्यार्थ्यांना ग्रामीण भागांशी संबंधित ६ ते ८ आठवडय़ांचा एखादा प्रकल्प सुरू करणे आवश्यक आहे. या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश ग्रामीण भागातील लोकांशी संवाद साधणे, त्यांच्या समस्या समजून घेणे आणि उर्जा, शिक्षण, पर्यावरण, कृषी, आरोग्य, अन्न, पाणी इत्यादींच्या क्षेत्रातील सुधारणांसाठी मार्ग सुचविणे हा आहे.
संपर्क – सीएसआयआर फोर्थ पॅराडिम इन्स्टिटय़ूट (सीएसआयआर -४ पीआय), (पूर्वीची संस्था – सेंटर फॉर मॅथॅमॅटिकल मॉडेलिंग अॅण्ड कॉम्प्युटर सिम्युलेशन) एनएएल बेलूर कॅम्पस, विंड टनेल रोड, बंगळुरू, कर्नाटक – ५६००३७. दूरध्वनी +९१- ८०-२५०५ १९२०, २५०५ १९२१.
ई-मेल webmaster@csir4pi.in
संकेतस्थळ http://4pi.in
itsprathamesh@gmail.com