मुलाखतीच्या तयारीसाठी बायोडेटा भरणे, देहबोली, प्रभावी संवादकौशल्य, छंद, हजरजबाबीपणा, आवश्यक अभ्यास अशा वेगवेगळ्या पलूबाबत चर्चा करण्यात आली. मुलाखत कक्षातील वातावरणाची, प्रत्यक्ष मुलाखतीची आणि होणाऱ्या संवादाची कल्पना यावी, यासाठी राज्यसेवा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या काही उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखतींचा अनुभव पाहू.
नाम :- प्रियंका माधव गाडीलकर
पदनाम :- उपनिबंधक, सहकारी संस्था (गट अ)
निवड झाल्याचे वर्ष : २०१३–१४
थोडक्यात तुमची ओळख करून द्या.
सर, मी प्रियंका माधव गाडीलकर. मूळ गाव- पारणेर, जि. अहमदनगर</p>
(ते मध्येच थांबवून विचारतात..)
तुमच्या जिल्ह्यात अशा व्यक्ती आहेत ज्यांनी पाणलोट क्षेत्र विकासाबाबत महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्याबद्दल सांगू शकाल का?
हो सर, पोपटराव पवार यांनी हिवरे बाजार येथे व अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धी येथे पाणलोट क्षेत्र विकासाबाबत कार्य केले आहे.
तुम्ही हिवरेबाजारला प्रत्यक्ष गेला आहात का?
हो सर.
पाणलोट क्षेत्र म्हणजे काय?
पावसाचे पाणी जमिनीवर पडल्यानंतर ज्या वरच्या भागातून वाहत येते व नंतर नद्या, ओढे यांना मिळते त्या भागांना पाणलोट क्षेत्र म्हणतात.
कशा पद्धतीने पाणलोट क्षेत्र विकास केला जातो?
डोंगर उतारावर, समपातळीत चर खोदले जातात. पाणी वाहण्यास अडथळा निर्माण केला जातो.
उभे चर की आडवे चर?
सर, आडवे चर खोदले जातात.
पाणलोट क्षेत्र विकासामागचा मूळ हेतू काय?
पाणी अडवा, पाणी जिरवा.
आणखी काही फायदे सांगू शकाल?
पाणलोट क्षेत्र विकासामुळे जमिनीची धूप होण्याला आळा बसतो.
सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून कधीपासून कार्यात आहात?
नोव्हेंबर २०१३ पासून कार्यरत आहे.
टॅक्स आणि डय़ुटी यातील फरक सांगा?
सर, डय़ुटी ही वस्तूंवर आकारली जाते. वस्तूच्या आयात निर्यातीवर आकारली जाते. तर टॅक्स उत्पन्न, वस्तू, सेवा यांच्यावर आकारला जातो.
जीएसटीबद्दल सांगा?
Goods & Service Tax. या पद्धतीमध्ये सेवा वस्तूवर एकाच दराने कर आकारला जाईल. त्यामुळे टॅक्सचे वेगवेगळे दर जाऊन टॅक्स सिस्टिम सिंपल होण्यास मदत होईल.
महिलांच्या सुरक्षा संबंधीचे कायदे सांगा?
कौटुंबिक हिसांचार प्रतिबंधक कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा, सती प्रतिबंधक कायदा, Immoral Traffic Prevantion Act.
विशाखा गाइड लाइन्स कशाशी संबंधित आहेत?
सर, कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१३ शी संबंधित आहेत.
या कायद्यानुसार सरकारी कार्यालयामध्ये एक समिती गठित करायची आहे जी महिलांच्या समस्यांची समस्या सोडवेल अशी समिती तुमच्या ऑफीसमध्ये आहे का?
सर, मला याबाबत माहिती नाही.
मागील महिन्यात माझगाव येथे एक दुर्दैवी घटना घडली. त्याबद्दल सांगू शकाल का?
मला अशा घटनेबद्दल माहिती नाही, सर.
तुम्ही तेथे नोकरी करता आणि ही घटना घडते याबद्दल तुम्हाला माहिती नाही, तुम्ही वर्तमानपत्र वाचत नाही का?
सर, मी रोज वर्तमान पत्र वाचते. तरीदेखिल माझ्या आठवणीत अशी घटना नाही.
तुम्ही जाऊ शकता.
धन्यवाद सर.