बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स तसेच इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी- भुवनेश्वर, मुंबई, दिल्ली, गांधीनगर, गुवाहाटी, हैदराबाद, इंदूर, जोधपूर, कानपूर, खङ्गपूर, चेन्नई, पाटणा, रुडकी व रोपड या आघाडीच्या शिक्षणसंस्थांमध्ये उपलब्ध असणाऱ्या एम.एस्सी. या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘जॉइंट अॅडमिशन टेस्ट फॉर एम.एस्सी.’- ‘जेएमएम- २०१६’ या प्रवेश चाचणीची अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता- अर्जदार पदवीधर असावेत. त्यांची गुणांची टक्केवारी किमान ५५ टक्के असावी. गुणांच्या टक्केवारीची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी ५० टक्क्य़ांपर्यंत शिथिलक्षम आहे.
निवड पद्धती- अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर ६ फेब्रुवारी २०१६ रोजी घेण्यात येईल. त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक व पुणे या परीक्षा केंद्रांचा समावेश आहे.
अर्जदारांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व जेएमएम-२०१६ मधील गुणांकाच्या आधारे त्यांना संबंधित संस्थेत उपलब्ध असणाऱ्या एम.एस्सी.- पीएच.डी. या संयुक्त पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात येईल.
परीक्षा शुल्क- अर्जदार विद्यार्थ्यांना एक अथवा दोन विषयांसाठी प्रवेश परीक्षा देता येईल. एका विषयाची प्रवेश परीक्षा देण्यासाठी सर्वसाधारण गटातील अर्जदार विद्यार्थ्यांना १,५०० रुपये तर राखीव गटातील विद्यार्थ्यांना ७५० रुपये आणि दोन विषयांची परीक्षा देण्यासाठी क्रमश: २,१०० रुपये व १,०५० रुपये भरणे आवश्यक आहे. वरील प्रवेश शुल्क संगणकीय पद्धतीने भरणे आवश्यक आहे.
अधिक माहिती- जेएमएम-२०१६ या प्रवेश पात्रता परीक्षेच्या संदर्भात अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली जेएमएम-२०१६ ची जाहिरात पाहावी. आयआयटी- चेन्नईच्या jam.iitm.ac.in/jam2016 या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची मुदत- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १० ऑक्टोबर २०१५ पर्यंत अर्ज करावा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा