किंग्स्टन विद्यापीठाच्या उद्योजक विभागाकडून म्हणजेच बिझनेस स्कूलकडून एमबीए या पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेऊ  इच्छिणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो. चार हजार युरो असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर असलेल्या अर्जदारांकडून यासाठी अर्ज मागवले आहेत.

शिष्यवृत्तीविषयी

किंग्स्टन विद्यापीठ यूकेतील महत्त्वाच्या शंभर विद्यापीठांपैकी एक मानले जाते. तसेच जगभरातील उत्तम मानांकन मिळवणाऱ्या पंधरा टक्के विद्यापीठांपैकी ते एक आहे. लंडनमधील हे एक प्रमुख शासकीय शैक्षणिक केंद्र आहे. किंग्स्टन विद्यापीठाची स्थापना १८९९ साली झाली; पण संस्थेला विद्यापीठाचा दर्जा मात्र त्यानंतर जवळपास शंभर वर्षांनी म्हणजे १९९२ साली मिळाला. विद्यापीठाचे एकूण ४ कॅम्पस असून ते किंग्स्टन आणि रोहेम्प्टन या ठिकाणी आहेत. विद्यापीठातील विविध विभागांकडून पदवी, पदव्युत्तर, पीएचडी व पोस्ट डॉक्टरल अभ्यासक्रम राबविण्यात येतात. या विद्यापीठाच्या महत्त्वाच्या विभागांपैकी एक म्हणजे किंग्स्टन बिझनेस स्कूल. या विभागानेही विद्यार्थ्यांना उद्योग व व्यवस्थापनातील विविध विषयांमधील शिक्षण व संशोधन उपलब्ध करून दिलेले आहे. बिझनेस स्कूलने असोसिएशन ऑफ एमबीए, ईएफएमडी यांसारख्या संशोधन संस्था, काही इतर औद्य्ोगिक केंद्रे व व्यावसायिक संस्था यांच्याशी विस्तृत जाळे पद्धतशीर तयार केलेले आहे. त्यामुळे किंग्स्टन बिझनेस स्कूलमधील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देता आलेल्या आहेत. संबंधित शिष्यवृत्ती ही बिझनेस स्कूलच्या वतीनेच शिष्यवृत्तीधारकाला देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता या विभागाकडे आकृष्ट करता यावी यासाठी या शिष्यवृत्तीची योजना आहे. शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला विभागाकडून चार हजार युरोज एवढे विद्यावेतन एकदा देण्यात येईल. याव्यतिरिक्त त्याला इतर कोणत्याही प्रकारच्या सुविधा देण्यात येणार नाहीत. शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्यानंतर अर्जदाराला ही शिष्यवृत्ती इतर कुणालाही देता येणार नाही. तसेच त्याला त्याचा एमबीए अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक राहील.

आवश्यक अर्हता

ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. अर्जदार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीधर असावा. त्याची पदवीपर्यंतची शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी. त्याचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. अर्जदाराने परदेशी विद्यापीठांच्या प्रवेशप्रक्रियेसाठी महत्त्वाची असलेली जीआरई किंवा जीमॅटसारखी परीक्षा उत्तीर्ण असावे अशी कोणतीही अट बिझनेस स्कूलने घातलेली नाही. मात्र, परदेशी विद्यापीठांच्या प्रवेशप्रक्रियेतील स्पर्धात्मकता लक्षात घेतली तर या परीक्षांपैकी शक्यतो जीमॅट या परीक्षेत अर्जदाराने चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे त्याच्यासाठी फायद्याचे ठरेल. भारतीय अर्जदारांसाठी आयईएलटीएस किंवा टोफेल या इंग्रजीच्या दोन्हींपैकी एका परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

शिष्यवृत्तीसाठी विद्यापीठाने याव्यतिरिक्त कोणतीही किमान आवश्यक अर्हता नमूद केलेली नाही, मात्र अर्जदाराचा सीव्ही अतिशय उत्तम असावा. कारण त्याची अभ्यासेतर उपक्रमांमधील गुणवत्ता त्याला शिष्यवृत्ती मिळण्यासाठी निश्चितच उपयोगी पडू शकते. याव्यतिरिक्त अर्जदाराकडे पूर्णवेळ कार्यानुभव (Full-time Work Experience) असणे किंवा किमान एका विदेशी भाषेचे उत्तम ज्ञान असणे इत्यादी बाबी त्याला अंतिम निवड प्रक्रियेमध्ये निश्चितच प्राधान्यक्रम मिळवून देऊ  शकतात. अर्जदाराने त्याला शिष्यवृत्ती मिळावी यासाठी लवकरात लवकर अर्ज करावा.

अर्ज प्रक्रिया

या शिष्यवृत्तीच्या अर्जप्रक्रियेसाठी बिझनेस स्कूलने स्वतंत्र अर्जव्यवस्था आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेली आहे. या माध्यमातून अर्जदाराने संकेतस्थळावर दिलेला शिष्यवृत्ती अर्ज पूर्ण करून तो परत blpgscholarships@kingston.ac.uk या इमेलवर पाठवायाचा आहे.

या अर्जाबरोबर त्याने त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीबद्दल व या शिष्यवृत्तीसाठी त्याची निवड का व्हावी याबद्दल माहिती देणारे त्याचे एसओपी, त्याचा सीव्ही, त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापकांची शिफारसपत्रे, जीमॅट व आयईएलटीएस किंवा टोफेल यांपैकी आवश्यक परीक्षांचे गुण, कार्यानुभवाचे प्रशस्तीपत्र, पदवी अभ्यासक्रमापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सस्क्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती इत्यादींच्या सॉफ्ट प्रतींसह अर्ज इमेल करावा. शिफारसपत्रांसाठी मात्र अर्जदाराने प्राध्यापकांचे इमेल अर्जामध्ये नमूद करावेत. विद्यापीठ स्वतंत्रपणे संबंधित प्राध्यापकांस संपर्क करून शिफारसपत्र देण्यासाठी विनंती करेल.

अंतिम मुदत ; या शिष्यवृत्तीसाठी अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत दि. ३० जून २०१७ ही आहे.

उपयुक्त संकेतस्थळ :- http://business.kingston.ac.uk/

itsprathamesh@gmail.com