वस्तुनिष्ठ पेपरबाबतची उर्वरित चर्चा आणि पारंपरिक पेपरबाबतची रणनीती या लेखामध्ये देण्यात येत आहे.

उताऱ्यावरील बहुपर्यायी  प्रश्न –

आकलनाच्या बाबतीतले प्रश्न चार प्रकारे विचारले जातात. भाषांतर, सारांश लेखन, आशय लेखन आणि उताऱ्यावरील प्रश्न. यातील आशय लेखनाचा अभ्यासक्रमामध्ये उल् लेख नाही. उताऱ्यावरील प्रश्नांचा समावेश वस्तुनिष्ठ पेपरमध्ये करण्यात आला आहे. पारंपरिक पेपरमध्ये आकलनाच्या प्रश्नांची उत्तरे देताना स्वत:चे मत स्वत:च्या शब्दांत मांडणे अपेक्षित असते. वस्तुनिष्ठ स्वरूपात दिलेल्या पर्यायांपकी एकाशी सहमत व्हावे लागते. उताऱ्यावरील बहुपर्यायी प्रश्न सोडविण्यासाठी पारंपरिक पेपरच्या पद्धतीपेक्षा वेगळी रणनीती अवलंबावी लागेल.

  • आधी प्रश्न पाहून मग उतारा वाचावा. वाचनावेळी प्रश्नाशी संबंधित वाक्ये अधोरेखित करता येतील. जेणेकरून प्रश्न सोडविताना संबंधित वाक्य पटकन सापडेल.
  • जरी ५ गुणांसाठी बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येणार असले तरी नीट समजून घेतल्याशिवाय त्यांची योग्य उत्तरे सापडणार नाहीत, अशी काठीण्य पातळी असणार आहे, हे लक्षात घ्यायला हवे आणि लक्षात ठेवायला पण हवे.
  • उताऱ्याला शीर्षक देणे, लेखकाचा हेतू, उद्देश अशा प्रकारचे प्रश्न याबाबत विचारले जातात. यासाठी एकमेकांशी साधम्र्य दाखवणारे पर्यायच दिले जाण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे गोंधळ उडू शकतो. नकारात्मक गुणांकनाचा विचार करता हे प्रश्न खूप काळजीपूर्वक सोडवायला लागतील.
  • उमेदवाराची आकलनक्षमता, अभिवृत्ती, विचार-प्रक्रिया, उमेदवाराची अभिव्यक्ती, लेखनाचे कौशल्य इ. गोष्टी जोखण्यासाठी पारंपरिक भाषा पेपरचा समावेश मुख्य परीक्षेत करण्यात आला आहे. हा पेपर १०० गुणांसाठी आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (१२वीच्या) समकक्ष असेल असे आयोगाने अभ्यासक्रमात नमूद केले आहे. या पेपरच्या मराठी व इंग्रजी भागासाठी वेगवेगळ्या उत्तरपत्रिकांमध्ये उत्तरे लिहायची आहेत. निबंध २५-२५ गुण, भाषांतर १५-१५ गुण व सारांश लेखन १०-१० गुण अशी प्रत्येक भाषेसाठीची गुणविभागणी आहे.

निबंध लेखन –

निबंध हा सर्वात जास्त गुण असलेला प्रश्न आहे. दोनपकी एका विषयावर निबंध लिहायचा असल्याचे अभ्यासक्रमामध्ये नमूद करण्यात आले आहे. वैचारिक, समस्याधारित निबंधात विषयाचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आíथक व इतर काही संबंधित पलू विचारात घ्यावेत. साधारणपणे १० ते १२ मुद्दे निवडून त्यांचा क्रम ठरवून घ्यावा. परिणामकारक सुरुवात करण्यासाठी सुविचार, कविता इ. चा वापर करता येईल. सुरुवातीनंतर ठरलेल्या क्रमाने थोडक्यात मुद्दे मांडावेत व एका निष्कर्षांप्रत येऊन शेवट करावा.

  • कल्पनात्मक निबंधामध्ये कल्पनेच्या अतिशयोक्तिकभराऱ्या असू नयेत. ‘कल्पना’सुद्धा तर्कशुद्ध असायला हव्यात.
  • निबंध लेखनास थेट सुरुवात करू नये. कच्च्या पानावर आधी सुचतील ते मुद्दे मांडावीत. त्यानंतर त्यांचा क्रम ठरवून मग प्रत्यक्ष लेखन करावे.

सारांश लेखन –

  • उताऱ्याचा सारांश उताऱ्याच्या १/३ इतक्या शब्दमर्यादेत व स्वत:च्या शब्दात लिहायला हवा.
  • उत्तरपत्रिकेत या प्रश्नासाठी टेबलच्या स्वरूपात वेगळे पान दिलेले असते व प्रत्येक चौकोनात एकच शब्द लिहायचा असतो. त्यामुळे टेबलच्या किती ओळींमध्ये तुमचा सारांश पूर्ण होईल, हे लक्षात येते.
  • संपूर्ण उतारा वाचत बसण्यापेक्षा सरळ पहिला परिच्छेद वाचून त्याचा सारांश लिहायचा, मग पुढच्या परिच्छेदाचा सारांश असे करत गेल्यास वेळेची बचत होते.
  • स्वत:चे मतप्रदर्शन टाळावे.
  • उताऱ्यातील ०४३ं३्रल्ल२, उदाहरणे इ. वगळून टाकवी.
  • संज्ञा, संकल्पनांचे स्पष्टीकरण अजिबात द्यायचे नाही.
  • विचारले असेल तर छोटेसे समर्पक शीर्षक द्यावे.

भाषांतर –

  • इंग्रजी व मराठी यांचा वाक्यरचनेमध्ये मूलभूत फरक आहे. हे व्यवस्थित समजून घ्यायला हवे. विशेषत: इंग्रजीतून मराठी भाषांतर करताना वाक्यरचना एकदम कृत्रिम होण्याची शक्यता असते. तेव्हा आधी वाक्य व्यवस्थित वाचून त्याचा भावार्थ समजून घ्यावा आणि मग त्याचे मराठी वाक्य लिहावे.
  • आधी मनातल्या मनातच वाक्याचा भावार्थ ज्या भाषेत उत्तर लिहायचे आहे त्या भाषेत उच्चारला की हे सोपे होऊन जाते.
  • काही वेळेला एखाद्या शब्दाला प्रतिशब्द आठवला नाही तर त्या प्रतिशब्दासाठी अडून बसण्यापेक्षा वाक्याचा भावार्थ नीट मांडला जाईल, अशी वाक्यरचना करावी. दिलेल्या संपूर्ण उताऱ्याचाच असा ‘स्वैर अनुवाद’ करणे मात्र टाळायला हवे.