मूलभूत संशोधनासाठी जगद्विख्यात असलेल्या जर्मनीमधील मॅक्स प्लँक संस्थेच्या एका सदस्य संशोधन संस्थेतील म्हणजेच मॅक्स प्लँक इन्स्टिटय़ूट फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी या संस्थेतील आकाशगंगा आणि विश्वउत्पत्तीशास्त्र विभागाकडून (The Galaxies and Cosmology Department) खगोलशास्त्र, पदार्थविज्ञान किंवा तत्सम विषयांतील पदव्युत्तर पदवी ग्रहण केलेल्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून खगोलशास्त्र विषयात पीएचडी करण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. दि. १ ऑक्टोबर २०१६ ते जून २०१७ च्या दरम्यान सुरू होणाऱ्या या पीएचडी अभ्यासक्रमासाठी ही शिष्यवृत्ती असून अर्जदारांना यासाठी दि. १२ सप्टेंबर २०१६ पूर्वी अर्ज सादर करायचा आहे.
शिष्यवृत्तीविषयी:-
जर्मनीमधील मॅक्स प्लँक संस्था जगातल्या मोजक्या नामांकित संस्थांपैकी एक असून मूलभूत संशोधनासाठी जगभर संस्थेचे नाव आदराने घेतले जाते. मॅक्स
प्लँक संस्था फक्त जर्मनीतच नव्हे, तर संपूर्ण युरोपमध्ये कार्यरत असून संस्थेचे पहिले बिगरयुरोपीय केंद्र २००७ मध्ये फ्लोरिडा अटलांटिक विद्यापीठाच्या ज्युपिटर कॅम्पसमध्ये सुरू करण्यात आलेले आहे. विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रत्येक आयामाला स्पर्श करणाऱ्या विषयावर मॅक्स प्लँक संस्था आपल्या एकूण ८० पेक्षाही जास्त इतर संशोधन संस्थांच्या माध्यमातून संशोधन करत आहे.
जर्मनीमधील हेडलबर्ग शहरात असलेली मॅक्स प्लँक इन्स्टिटय़ूट फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी (एमपीआयए) ही ‘मॅक्स प्लँक’च्या इतर सदस्य संस्थांसारखीच एक सदस्य संशोधन संस्था आहे. या संस्थेची स्थापना १९६७ साली झाली आहे. एमपीआयए हेडलबर्ग विद्यापीठाच्या सहकार्याने विविध अभ्यासक्रम राबवत असते. संस्थेतील विविध विभागांच्या वतीने खगोलशास्त्रातील अनेक सिद्धांतांवर भरीव संशोधन नेहमी चाललेले असते. संशोधनातील या वैविध्यामुळे ही संस्था खगोलशास्त्रातील जगातल्या अग्रगण्य संस्थांपैकी एक बनलेली आहे. एमपीआयएमध्ये सध्या ४० पूर्णवेळ प्राध्यापक-शास्त्रज्ञ कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ५५ पदव्युत्तर पीएचडीधारक (पोस्टडॉक) व ५० पीएचडीधारक विद्यार्थ्यांचे संशोधन सुरू आहे.

आवश्यक अर्हता:-
मॅक्स प्लँक संस्थेतील पीएचडीसाठीचा असलेला प्रवेश व शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. अर्जदार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवीधर (एम.एस्सी.)असावा. अर्जदाराची पदवीपर्यंतची शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी. पदव्युत्तर पातळीवर त्याचा प्रथम श्रेणी जीपीए असावा. अर्जदाराचा पदव्युत्तर अभ्यासक्रमादरम्यान केलेल्या संशोधनाचा प्रकल्प अहवाल हा एक महत्त्वाचा निकष निवडीकरिता संस्थेने ठरवलेला आहे. त्यामुळे अर्जदाराने गुणात्मक संशोधन व दर्जात्मक अहवाल या बाबींना प्राधान्यक्रम द्यावा. अर्जदाराने परदेशी विद्यापीठांच्या प्रवेशप्रक्रियेसाठी महत्त्वाची असलेली जीआरई किंवा जीमॅटसारखी परीक्षा उत्तीर्ण असावे, अशी कोणतीही अट घातलेली नाही. मात्र, परदेशी विद्यापीठांच्या प्रवेशप्रक्रियेतील स्पर्धात्मकता लक्षात घेतली तर या परीक्षांपैकी शक्यतो जीआरई या परीक्षेत अर्जदाराने चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे त्याच्यासाठी फायद्याचे ठरेल. अर्जदाराचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदारांसाठी आयईएलटीएस किंवा टोफेल या इंग्रजीच्या दोन्हींपैकी एका परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. शिष्यवृत्तीसाठी संस्थेने याव्यतिरिक्त कोणतीही किमान आवश्यक अर्हता नमूद केलेली नाही, मात्र अर्जदाराचा बायोडेटा अतिशय उत्तम असावा. त्याच्याकडे एखाद्या संशोधन संस्थेमधील संशोधन अनुभव असणे किंवा जर्मन भाषेचे उत्तम ज्ञान असणे इत्यादी बाबी त्याला अंतिम निवड प्रक्रियेमध्ये निश्चितच प्राधान्यक्रम मिळवून देऊ शकतात.
खगोलशास्त्रातील पीएचडी अभ्यासक्रमासाठी देण्यात येणारी ही शिष्यवृत्ती एमपीआयएतील आकाशगंगा आणि विश्वउत्पत्तीशास्त्र विभागाकडून ((The Galaxies and Cosmology Department)) देण्यात येणार आहे. पीएचडी अभ्यासक्रमाची सुरुवात दि. १ ऑक्टोबर २०१६ ते जून २०१७ च्या दरम्यान कधीही होईल. शिष्यवृत्तीचा एकूण कालावधी हा तीन वर्षांचा असेल. नंतर करार एका वर्षांसाठी वाढू शकतो. शिष्यवृत्तीधारकाला पीएचडीचा अभ्यासक्रम तेवढय़ा कालावधीत पूर्ण करावा लागेल. पूर्ण केलेली पीएचडी पदवी त्याला हेडलबर्ग विद्यापीठाद्वारे बहाल करण्यात येईल. या शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला जर्मनीतील सनदी अधिकाऱ्याच्या वेतनाच्या समांतर वेतन व सर्व सुविधा देण्यात येतील. यामध्ये एमपीआयएकडून त्याला दरमहा निवासी भत्ता, वेतन भत्ता, सामाजिक सुरक्षा निधी, प्रवास भत्ता, संशोधनासाठीची अनुदानित रक्कम व निवृत्तिवेतन यांसारख्या सर्व सुविधा देण्यात येतील.
अर्ज प्रक्रिया –
मॅक्स प्लँक इन्स्टिटय़ूट फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी या संस्थेतील पीएचडी प्रवेशासहित असलेल्या शिष्यवृत्तीच्या अर्जप्रक्रियेसाठी आवश्यक माहिती व एकूण प्रक्रिया संस्थेने त्यांच्या वेबसाइटवर स्वतंत्रपणे उपलब्ध
करून दिलेली आहे. अर्जदाराने त्याप्रमाणे पीएचडीचा अर्ज पूर्ण करून यादीमध्ये दिलेल्या सर्व कागदपत्रांच्या सॉफ्ट प्रतींसह jobs16-06@mpia.de या ई-मेलवर मेल करावा. कागदपत्रांच्या पूर्ततेशिवाय पाठवलेला अर्ज अपूर्ण मानला जाईल. अर्जासह अर्जदाराने
त्याचे एसओपी, सीव्ही, आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत प्रकाशित केलेले शोधनिबंध, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सस्क्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती, जीआरई व आयईएलटीएस किंवा टोफेल यापैकी आवश्यक परीक्षांचे गुण, संशोधनाचे किंवा कार्यानुभवाचे प्रशस्तिपत्र, पदव्युत्तर अभ्यासक्रमादरम्यान केलेल्या संशोधनाचा प्रकल्प अहवाल तसेच त्याच्या आवडीच्या संशोधन-विषयांची माहिती व त्यातील अनुभव विशद करणारा एकपानी लघु अहवाल इत्यादी गोष्टी जोडाव्यात. अर्जदाराने त्याच्या संशोधन पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन शास्त्रज्ञांची शिफारसपत्रे पाठवावीत. अर्जासोबत कव्हर लेटर असावे. अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
निवड प्रक्रिया-
बायोडेटासह अर्जदाराच्या अर्जातील एकूण गुणवत्ता लक्षात घेऊन आणि निवड समितीकडून अर्जाची छाननी झाल्यानंतर त्याची मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल. मुलाखतीतून अंतिम विद्यार्थ्यांची निवड होईल. मुलाखतीनंतर सर्व अर्जदारांना संस्थांकडून त्यांच्या निकालाबाबत कळवण्यात येईल.
अंतिम मुदत –
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. १२ सप्टेंबर २०१६ आहे.
महत्त्वाचा दुवा – https://www.mpg.de/en
प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com

 

Story img Loader