जगद्विख्यात ऑक्सफर्ड विद्यापीठातील सर्व विद्याशाखांच्या पदव्युत्तर विभागांकडून पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. विकसनशील देशांमधील हुशार व उत्तम शैक्षणिक पाश्र्वभूमी असलेल्या अर्जदारांना या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासहित शिष्यवृत्ती मिळते. २०१७-१८ साठी दिल्या जाणाऱ्या या प्रवेश व शिष्यवृत्तीसाठी संबंधित विषयातील पदवीधर अर्जदारांकडून ६ जानेवारी २०१७ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिष्यवृत्तीबद्दल

जगभरातील वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्य व इतर खाद्य उत्पादनांची कमतरता भविष्यात सर्वत्र भासणार आहे. त्यामुळेच आजमितीस होणाऱ्या या खाद्य उत्पादनापेक्षा अधिक उत्पादन विकसनशील देशांतून वाढीस लागावे व त्यातून भविष्यातल्या वाढत्या लोकसंख्येच्या खाद्य आवश्यकतांची पूर्तता व्हावी या हेतूने लुईस द्रेफस फाऊंडेशन काम करते. गेली अनेक वर्षे ते सातत्याने विकसनशील देशांमधील कृषी व अन्न सुरक्षा या विषयांवर काम करत आहेत. फाऊंडेशनकडून या व अशा अनेक समस्यांचा वेध घेत असतानाच फक्त कृषी व अन्न सुरक्षाच नव्हे तर आरोग्य, पर्यावरण, जल व्यवस्थापन, अर्थशास्त्र, शासकीय योजना, परराष्ट्र योजना या व इतर अनेक विषयांवर अशा प्रकारचे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार व्हावे अशी गरज निर्माण होताना दिसू लागली. भविष्यात या विषयांवर काम करणारे नेतृत्व तयार व्हावे व ऑक्सफर्डमधील घेतलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची व त्यांच्या निश्चित केलेल्या क्षेत्राची योग्य सांगड घालता यावी अशा प्रयोजनाने लुईस द्रेफस फाऊंडेशनने ही शिष्यवृत्ती ‘लुईस द्रेफस-वेनफेल्ड शिष्यवृत्ती’ या नावाने सुरू केली आहे. या शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे संपूर्ण शिक्षण शुल्क विद्यापीठाकडून दिले जाणार आहे. त्याशिवाय शिष्यवृत्तीधारकाला भोजन, निवास व इतर आवश्यक खर्चासाठी मासिक वेतनाच्या स्वरूपात निधी देण्यात येणार आहे. ही आर्थिक मदत त्याच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या संपूर्ण कालावधीसाठी त्याला बहाल केली जाणार आहे.

आवश्यक अर्हता

ही शिष्यवृत्ती विकसनशील देशांतील सर्व अर्जदारांसाठी खुली आहे. अर्जदाराकडे संबंधित क्षेत्रातील संशोधन किंवा तत्सम कोणताही अनुभव असेल, तर त्याला प्राधान्य दिले जाईल. अर्जदाराने ते त्याच्या संशोधनाचे किंवा अनुभवाचे प्रशस्तिपत्र जोडावे. अर्जदाराची पदवी स्तरावर शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी. भारतातील अर्जदारांनी टोफेल किंवा आयईएलटीएस या इंग्रजीच्या कोणत्याही एका परीक्षेत उत्तीर्ण असावे. अर्जदाराने त्याला शिष्यवृत्ती मिळावी यासाठी लवकरात लवकर अर्ज करावा. अर्जदाराकडे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पूर्ततेनंतर मायदेशात परत येऊन निवडलेल्या क्षेत्रामध्ये दीर्घकाळ काम करण्याची योजना तयार असावी, ही फाऊंडेशनच्या आवश्यक अर्हतांपैकी एक प्रमुख अर्हता आहे.

अर्ज प्रक्रिया

या शिष्यवृत्तीसाठी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एकच अर्ज असल्याने अर्जदाराने त्याचा अर्ज विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून जमा करावा. अर्ज जमा करताना त्याबरोबर अर्जदाराने त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीबद्दल व या शिष्यवृत्तीसाठी त्याची निवड का व्हावी याबद्दल माहिती देणारे त्याचे एस.ओ.पी., त्याचा सी.व्ही., त्याने केलेल्या संशोधनाचा लघु संशोधन अहवाल, त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या तीन प्राध्यापकांची शिफारसपत्रे, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सस्क्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती इत्यादी गोष्टी जोडाव्यात. याबरोबरच अर्जदाराने जीआरई, टोफेल किंवा आयईएलटीएस या परीक्षा दिल्या असतील तर अधिकृत संस्थेमार्फत परीक्षांचे गुण विद्यापीठास कळवावेत. अर्जदार संशोधनाच्या विषयाबद्दल किंवा संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी त्याचा अर्ज जमा करण्यापूर्वी विद्यापीठातील संबंधित विभागातील किंवा विषयातील प्राध्यापकांना ई-मेलद्वारे संपर्क करू शकतो. अर्जासह अर्जदाराने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिलेली एक प्रश्नावली सोडवून त्याच्या उत्तरांसहित जमा करावी.

  • निवड प्रक्रिया :

फक्त अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना मे २०१७ पर्यंत कळवण्यात येईल.

  • अंतिम मुदत:-

या शिष्यवृत्तीसाठी पूर्ण झालेले अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत ६ जानेवारी २०१७ ही आहे.

  • महत्त्वाचा दुवा :- ox.ac.uk

itsprathamesh@gmail.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Learning opportunities in oxford university