व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रमांमधील जागतिक स्तरावरील एक अग्रगण्य संस्था म्हणून स्वित्र्झलडमधील ‘इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट’ (IMD)चे नाव घ्यावे लागेल. संस्थेच्या व्यवस्थापन विभागाकडून दरवर्षी गुणवंत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना एमबीए अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. दरवर्षीप्रमाणे २०१७ या शैक्षणिक वर्षांसाठीही आंतरराष्ट्रीय पदवीधर विद्यार्थ्यांकडून या अभ्यासक्रमासहित शिष्यवृत्तीसाठी ३० सप्टेंबर २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.
शिष्यवृत्तीविषयी – व्यवस्थापन क्षेत्रात जगात पहिल्या क्रमांकावर असलेली संस्था म्हणजे स्वित्र्झलडमधील ‘इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट’ (IMD). २०१२ पासून ते २०१५ पर्यंत दरवर्षी ‘फायनान्शियल टाइम्स’ने संस्थेच्या व्यवस्थापनातील मुक्त अभ्यासक्रमांना जागतिक दर्जाचे असल्याचे संबोधून पहिला क्रमांक बहाल केला आहे. एवढेच नव्हे तर फोर्ब्स, बिझनेस वीक, वॉल स्ट्रीट जर्नल इत्यादी संस्थांनीदेखील गेल्या काही वर्षांत आयएमडीला जगातल्या प्रथम क्रमांकाचे बिझनेस स्कूल म्हणून घोषित केलेले आहे. सर्वसाधारणपणे परदेशी विद्यापीठांमधील व्यवस्थापन विभाग किंवा एमबीए स्कूल्सचा क्रमांक त्या विद्यापीठाच्या राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय क्रमांकावर अवलंबून असतो. थोडक्यात, कोणत्याही विद्यापीठाच्या क्रमांकाचा त्याच्या एमबीए स्कूलच्या क्रमांकावर परिणाम हा होतच असतो. नेमकी हीच बाब हेरून आयएमडीने कोणत्याही विद्यापीठाबरोबर एमबीएचे अभ्यासक्रम न राबवता स्वतंत्रपणे हे अभ्यासक्रम राबवलेले आहेत. या अभ्यासक्रमांची खासियत ही की येथील विद्यार्थ्यांना नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आपले प्रकल्प प्रशिक्षण पूर्ण करता येतात, म्हणूनच आयएमडीमधील विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:ची विशेष ओळख बनवू शकतात. आजघडीला नामांकित असलेल्या नेस्ले, टेलीनॉर, बीएमडब्लू, मॅककिन्से अँड कंपनी, वायर्ड, ग्लीटनीर बँक, रॉयल फिलिप्स इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सीईओ या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांपैकी एक आहेत. विद्यार्थ्यांमध्ये जागतिक पातळीवरील व्यावसायिक स्पर्धेचे आव्हान लीलया पेलण्याची क्षमता विकसित व्हावी व व्यवसायातील मूलभूत तंत्रांबाबतीत एक प्रकारची सजगता तयार होऊन त्या माध्यमातून या क्षेत्रातील जागतिक नेतृत्व आकारास यावे या हेतूने संस्थेकडून हा शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो.
आयएमडी एमबीए शिष्यवृत्ती कार्यक्रम हा एकूण सात ते आठ उपविभागांमध्ये विभागला गेलेला आहे. यामध्ये मग आशियाई अर्जदार, विकसनशील देशातील अर्जदार, महिला अर्जदार, भावी नेतृत्व असे घटक डोळ्यासमोर ठेवून हे शिष्यवृत्ती उपविभाग तयार करण्यात आले आहेत. त्या-त्या शिष्यवृत्ती उपविभागाकडून हा शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो. अर्थातच वेगवेगळ्या स्तरांतील घटकांना याचा लाभ व्हावा, हा हेतू यामध्ये असतो. प्रत्येक छोटय़ा शिष्यवृत्ती कार्यक्रमातील एकूण शिष्यवृत्तींची संख्या ही वेगवेगळी असते. त्याप्रमाणेच शिष्यवृत्तीचे इतर लाभदेखील या उपविभागानुसार वेगवेगळे आहेत. याची सविस्तर माहिती संस्थेच्या वेबसाइटवर दिलेली आहे. अर्जदाराने आपण नेमक्या कोणत्या गटात मोडतो हे बघून त्या शिष्यवृत्तीला अर्ज करावा.
अर्ज प्रक्रिया – या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा एमबीएचा अर्ज ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून आयएमडी एमबीए शिष्यवृत्ती टेम्प्लेटवर जमा करावा. वर उल्लेख केल्याप्रमाणे प्रत्येक शिष्यवृत्ती उपविभागानुसार अर्जदाराला निबंधांचे विषय दिलेले आहेत. त्या विषयावर दर्जेदार निबंध लिहून अर्जदाराला तो अर्जासह एमबीए शिष्यवृत्ती टेम्प्लेटवर जमा करावयाचा आहे. अर्जासह अर्जदाराने त्याचे एसओपी, सीव्ही, त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापकांची अथवा तज्ज्ञांची शिफारसपत्रे, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्सच्या अधिकृत प्रत, कार्यानुभवाचे प्रशस्तीपत्र इत्यादी गोष्टी जोडाव्यात. मात्र शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने वेबसाइटवर दिलेला स्वतंत्र अर्ज mbafinance@imd.org या ई-मेलवर पाठवावा.
आवश्यक अर्हता –
ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. अर्जदार मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान पदवीधर असावा. अर्जदाराचे वय साधारणपणे २५ ते ३५ च्या दरम्यान असावे. त्याच्याकडे किमान तीन वर्षांचा पूर्णवेळ कार्यानुभव (Full-time Work Experience) असावा. अर्जदाराचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. याशिवाय त्याच्याकडे किमान एका विदेशी भाषेचे उत्तम ज्ञान असावे. अर्जदाराची पदवीपर्यंतची शैक्षणिक पाश्र्वभूमी उत्कृष्ट असावी. त्याने एमबीएसाठी आवश्यक असणारी जीमॅट ही परीक्षा अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय भारतीय विद्यार्थ्यांनी इंग्रजीच्या टोफेल किंवा आयईएलटीएस या दोन्ही परीक्षांपैकी एक परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. किमान अर्हता जरी अशी असली तरी आयएमडी एमबीए शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या माध्यमातून आयएमडी संस्थेच्या भावी विद्यार्थ्यांकडे उत्कृष्ट शैक्षणिक पाश्र्वभूमी, नेतृत्वगुण, आतापर्यंतच्या करिअरमध्ये स्वत:च्या कामाबाबत असलेला जबाबदारपणा, जोखीम घेण्याची प्रवृत्ती, आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन, व्यावसायिक मनोवृत्ती इत्यादी गुण असावेत अशी अपेक्षा ठेवत असते.
निवड प्रक्रिया – अर्जदाराची निबंधांच्या विषयासह त्याच्या अर्जातील एकूण गुणवत्ता लक्षात घेऊन व निवड समितीकडून अर्जाची छाननी झाल्यानंतर त्याची मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल. अर्जदाराने ही मुलाखत संस्थेच्या आवारात जाऊन द्यावयाची आहे. मुलाखतीनंतर दोन आठवडय़ांत सर्व अर्जदारांना संस्थेकडून त्यांच्या निकालाबाबत कळवण्यात येईल.
अंतिम मुदत – या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०१६ आहे.
महत्त्वाचा दुवा – http://www.imd.org/mba/
प्रथमेश आडविलकर – itsprathamesh@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा