पूर्वीच्या काळी एखाद्या वस्तूचे मार्केटिंग करायचे असेल तर त्यासाठी उपलब्ध असणाऱ्या माध्यमांची संख्या मर्यादित होती. पण आता परिस्थिती बदलली आहे. ब्रँड्स किंवा कंपन्या विविध प्रकारच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमांचा वापर करतात. पण कमी वेळात या माध्यमांचा योग्य वापर करणे अनेकदा अशक्य होत नसते. तसे होऊ नये आणि माध्यमांचा पुरेपूर वापर करता यावा यासाठी मीडिया प्लॅन अर्थात माध्यमांची आखणी केली जाते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकारात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वित्तीय तरतूद करावी लागते. उदाहरणार्थ फेसबुक मोहिमेसाठी किती पैसे, यूटय़ूब जाहिरातींसाठीचे पैसे असा विचार करून हा आराखडा तयार केला जातो. याच प्रक्रियेला मीडिया प्लॅनिंग आणि बायिंग असं म्हणतात.
* फायदा काय?
सोशल मीडिया कॅम्पेनमधला हा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे. कॅम्पेनसाठी करण्यात येणारे मीडिया बायिंग हे सर्वात खर्चीक असते. म्हणूनच खरेदी करताना कोणत्या माध्यमासाठी किती तरतूद करायची याची योग्य मांडणी करणे महत्त्वाचे ठरते. सोशल मीडियाच्या बाबतीत कुठलेही कॅम्पेन ऑरगॅनिकली लोकांपर्यंत पोहोचण्याची टक्केवारी ही ५ ते ७ इतकी असते. म्हणजेच एखादी शेअर केलेली पोस्ट पैसे खर्च न करता जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही. आपण स्वत:च्या अकाऊंटवरून ज्या पोस्ट करतो त्याला मिळणारे लाइक्स, शेअर्स हे ऑरगॅनिक असतात. पण जेव्हा एखादी कंपनी मार्केटिंग म्हणून अशा पोस्ट करते तेव्हा त्याला मिळणारा वाचकवर्ग मोठा असतो. सोप्या भाषेत सांगायचे तर एखाद्या उत्पादनाची मौखिक प्रसिद्धी आणि जाहिरीतींद्वारे होणारी प्रसिद्धी यात जो फरक आहे तोच कॅम्पेनच्या बाबतीत आहे. म्हणूनच थोडा खर्च करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मीडिया प्लॅनिंग आणि बायिंगचा फायदा होतो.
* कामाचे स्वरूप
कुठल्याही सोशल मीडिया कॅम्पेनसाठी एक बजेट असते. त्या बजेटनुसारच त्याचे कामकाज चालते. त्यामुळे मीडिया प्लॅनिंग अँड बायिंग करताना या बजेटनुसार प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी किती पैशांची तरतूद करायची हे ठरते. त्यानंतर संभाव्य ग्राहक निवडण्यासाठी असणाऱ्या साधनांचा वापर करून प्रदेश, भाषा, वय, लिंग, आवड यानुसार तो निश्चित केला जातो. हे सगळे पार पडल्यानंतर त्यानुसार कल्पक डिझाइन बनवून एखादी पोस्ट किंवा
फेसबुक पेज किंवा यूटय़ूब चॅनेल, व्हिडीओ प्रमोट केले जातात. थेट पैशांशीच हा सगळा मामला संबंधित असल्यामुळे हे काम जबाबदारीचे असते.
* पात्रता
सोशल मीडिया कॅम्पेन नेमके कशाविषयीचे आहे हे जाणून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. ब्रँड, सिनेमा, कंपनी, सेलिब्रेटी, राजकारणी यांचे चाहते तसंच पाठीराखे हे कोण आहेत, समाजातल्या कोणत्या वर्गापर्यंत पोहोचणे म्हणजेच टार्गेट ऑडियन्स काय आहे याची माहिती असणे गरजेचे आहे. त्यानंतर माध्यमांची इत्थंभूत माहिती तसेच त्यावर प्रमोशन करण्याच्या हटके कल्पनांचा विचार करणे अपेक्षित असते. तंत्रज्ञान जसे विकसित होत आहे त्यानुसार सोशल मीडिया प्लॅटफॉम्र्सवर उपलब्ध असणारे प्रमोशन टूल्सही कल्पक आणि हटके होत आहेत. त्यामुळे त्यावेळी अपटूडेट असणे या क्षेत्रात काम करण्यासाठी महत्त्वाचे ठरते.
* अभ्यासक्रम
मीडिया प्लॅनिंग आणि बायिंग हे क्षेत्रसुद्धा ऑन द जॉब ट्रेनिंग या विभागात मोडते. यासाठी ऑनलाइन कोर्सेस उपलब्ध आहेतच. पण त्याशिवाय एमबीए ही पदवी घेऊनही या क्षेत्रात उतरता येते. मीडिया मॅनेजमेंट हा विषय घेऊन एमबीएची पदवी घेणे या क्षेत्रासाठी उपयुक्त ठरू शकते.
लेखक एव्हरीमीडिया टेक्नॉलॉजी या कंपनीचे सीईओ आहेत.
गौतम ठक्कर
शब्दांकन- पुष्कर सामंत
वेगळ्या वाटामध्ये पुढच्या आठवडय़ात जाणून घेऊ विमा क्षेत्रातील करिअर संधींबाबत..