विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतला एक महत्त्वाचा विषय म्हणजे चित्रकला. गुणांच्या शर्यतीतून हा विषय बाद असल्याने अनेक शाळांमध्ये मात्र त्याला खो दिला जातो. पण अहमदनगर जिल्ह्य़ातील अकोले तालुक्यातील मॉडर्न हायस्कूल, अकोले या शाळेत खास चित्रशाळा आहे. ही वर्गखोली तंत्रप्रेमी नसेलही पण चित्रप्रेमी नक्की आहे. तिची संकल्पना आणि संयोजन केले आहे, शाळेतील कलाशिक्षक मीनानाथ खराटे.
चित्रकला हा विषय सामान्यत: प्राधान्यक्रमातील सगळ्यात शेवटचा. पण विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीसाठी खूप महत्त्वाचा. मुलांना वेगवेगळ्या टप्प्यांवर काय काय वाटते ते वाक्यांपेक्षा चित्रांतून व्यक्त करायला त्यांना आवडते. कारण चित्रांना नियम नसतात, पाठय़पुस्तकाच्या चौकटी नसतात. पण चित्राचे हे महत्त्व समजून घेणारे शिक्षक आणि शाळा विरळाच. अशाच शाळांमधली एक शाळा आहे, अकोले येथील मॉडर्न हायस्कूल ही शाळा. हिंद सेवा मंडळ अहमदनगर या संस्थेकडून चालवली जाणारी ही एक अनुदानित शाळा आहे. या शाळेमध्ये चक्क विद्यार्थ्यांसाठी चित्रकलेचा स्वतंत्र वर्ग आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की, हा वर्ग कधीच बंद, रिकामा नसतो. शाळा भरल्यापासून इथे चिल्यापिल्यांची लगबग असते. रंग आणि विद्यार्थी दोघे सुखाने नांदतात. याचे कारण आहे, त्यांचे कलाशिक्षक मीनानाथ खराटे. इथल्या भिंती बोलक्या आहेत, कारण त्यांवर विविध वयोगटातल्या, वर्गातल्या विद्यार्थ्यांची चित्र लटकत असतात. फळा सदैव नव्या चित्रप्रकारांची आव्हाने विद्यार्थ्यांपुढे मांडत असतो.
मीनानाथ खराटेंनी नाशिकच्या कलानिकेतनमधून जीडी आर्ट केले. या परीक्षेत राज्यात पाचवे आल्याने त्यांना जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेशाची संधी मिळाली. इथे त्यांनी डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन ही पदवी मिळवली. त्या परीक्षेतही ते राज्यात प्रथम आले. मग एक वर्ष अॅनिमेशनमध्ये काम करून ते पुन्हा एकदा गावाकडे परत आले. इथे मग मॉडर्न हायस्कूलमध्ये कलाशिक्षकाची जागा रिकामी आहे हे कळल्यावर त्यांनी तिथे नोकरीला सुरुवात केली. जेजेमधील अभ्यासक्रमात त्यांना शाळांमध्ये तासिका घ्याव्या लागत. त्यावेळी काही मोठय़ा शाळांमध्ये त्यांनी चित्रकलेचे खास वर्ग पाहिले. ते त्यांना विशेष भावले आणि असे काही तरी आपल्याही शाळेत असावे असे त्यांना वाटू लागले. मग २००६मध्ये मॉडर्न हायस्कूलमध्ये कलाशिक्षक म्हणून काम करताना त्यांनी ही संकल्पना मुख्याध्यापक शिरीष देशपांडे यांच्याकडे मांडली. त्यांनीही ती उचलून धरत लगेचच शाळेची एक खोली चित्रकलेसाठी उपलब्ध करून दिली. सध्याचे मुख्याध्यापक कचरे सर हेसुद्धा मीनानाथ यांना कायम प्रोत्साहन देत असतात.
या खोलीमध्ये बाके नाहीत. मस्तपैकी भारतीय बैठक अंथरलेली आहे. चित्रकलेच्या तासाला विद्यार्थी आपापले सामान घेऊन या चित्रशाळेत येतात. मस्त बसून चित्रे काढतात. त्या तासाचा विषय तिथे फळ्यावर लिहिलेला असतो. याच खोलीत चित्रांच्या रचना मांडलेल्या असतात. वस्तूचे चित्र असेल तर तशी मांडणी असते. उत्तम चित्रांचे डेमो लावलेले असतात. एकूणच सगळा रंगारंग माहोल असतो. चित्रकला हा दुर्लक्ष करण्यासारखा विषय नाही. तो अभ्यासाइतकाच महत्त्वाचा आहे. पण विद्यार्थ्यांमध्ये एक तर त्याची आवड नसते किंवा ती दाबून टाकली जाते. पण अभिव्यक्तीसाठी हे एक उत्तम माध्यम आहे. मग विद्यार्थ्यांना त्याची आवड निर्माण करायची तर त्यांना त्या वातावरणात न्यायला हवे. वर्गात बाकांवर बसून चित्रकलेचा परीक्षाभिमुख अभ्यास होऊ शकेल, त्याची आवड निर्माण करता येणार नाही. त्यामुळेच मग या चित्रवर्गाचे प्रयोजन मीनानाथांनी केले. या चित्रवर्गात मुले मनसोक्त चित्र काढतात. त्यांना इतरांची चित्रे पाहायला मिळतात. एखाद्याचे चित्र चांगले झाले की, ते कौतुकाने भिंतीवर झळकवले जाते. त्यासाठीही एक वेगळीच स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये सुरू होते. या चित्रवर्गात सगळ्याच इयत्तांच्या चित्रकलेचा विषय, रचना, मांडण्या असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्यापुढच्या वर्गाना कोणत्या प्रकारची चित्रे आहेत, हेसुद्धा समजून येते.
अकोले तालुका आदिवासी तालुका आहे. मॉडर्न हायस्कूलमधले अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातील असतात. काहींकडे तर रंग घ्यायलाही पैसे नसतात. पण कल्पनाशक्ती जबरदस्त असते. शाळा आणि मीनानाथ दोघेही या विद्यार्थ्यांना जमेल तशी मदत करत असतात. ‘आवडता खेळ’ असा विषय दिल्यावर ही मुले नेहमीच्या मैदानी खेळांची चित्रे काढत नाहीत. त्यांचा खेळ असतो, झाडावर चढण्याचा, गोटय़ांनी खेळण्याचा. तोच ती चित्रात रंगवतात. वारली चित्रकलेतही हे विद्यार्थी बरेच काम करतात. पण त्यांमध्ये पारंपरिक विषयांपेक्षा आपण अनुभवलेले विषय ते वेगळ्या पद्धतीने मांडतात. त्यामुळेच त्यांना शिकवण्याचा अनुभव मीनानाथांसाठी नेहमीच खास असतो.
चित्रकलेतल्या शिक्षणाचा आणि प्रगतीचा अभ्यासात थोडक्यात भाकरीची भाषा शिकण्यात काय फायदा? असा प्रश्न कायमच विचारला जातो. तर त्याचेही उत्तर मीनानाथ सरांकडे आहे. ते म्हणतात, या विषयात प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी इतर विषयांतही अधिक समज दाखवतात. त्यांना विज्ञानाच्या आकृत्या, भूगोलाचे नकाशे पटकन समजून येतात. त्यांची उत्तरपत्रिका इतरांपेक्षा टापटिप, नेटकी आणि स्वच्छ असते. अक्षर वळणदार होते. नेहमीच्या मांडणीतही एका सौंदर्यदृष्टीची ओळख विद्यार्थ्यांना होते. मराठीतील एखाद्या कवितेतून केलेल्या वर्णनाचे चित्ररूप त्यांच्या मनात पटकन आकार घेते. शिवाय या विद्यार्थ्यांकडे कलाक्षेत्रातल्या करिअरचा एक चांगला पर्यायही राहतो.
दर वर्षी शाळकरी विद्यार्थ्यांसाठी एलिमेंट्री, इंटरमीडिएट या ड्रॉइंगच्या ग्रेड परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांतून विद्यार्थ्यांना चित्रकलेची ओळख होते. रंग-कागदाशी त्यांची दोस्ती होते. याच क्षेत्रात पुढे करिअर करायचे असल्यासही या परीक्षांचे खूप फायदा होतो. मीनानाथांच्या चित्रवर्गाचा फायदा म्हणजे शाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये या विषयी जागृती निर्माण झाली. या परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्काही वाढू लागला. या परीक्षांमध्ये मिळणारे गुण आता दहावीच्या परीक्षेतही ग्राह्य़ धरले जातात. त्यामुळे त्यातील काठिण्यपातळीही वाढली आहे. तरीही मीनानाथांचे विद्यार्थी त्यामध्ये अव्वल ठरत आहेत. यातूनच त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी कलाक्षेत्रातही कामगिरी केली आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी आता कलाशिक्षण घेऊन जाहिरात विश्वात काम करतात. एका विद्यार्थ्यांने तर पुण्यात स्वत:ची जाहिरात संस्था सुरू केली आहे.
विद्यार्थ्यांची अशी प्रगती सुरू असताना स्वत: मीनानाथांनी आपले कलाशिक्षण थांबवलेले नाही. ते वेळोवेळी रंग आणि ब्रशच्या साहाय्याने कॅनव्हासवर व्यक्त होतच असतात. आपल्या चित्रांची प्रदर्शने भरवत असतात. रंगरेषांच्या विश्वात विद्यार्थ्यांच्या जोडीने अशी मुशाफिरी करणारा हा कलाशिक्षक म्हणूनच वेगळा ठरतो.
स्वाती केतकर-पंडित : swati.pandit@expressindia.com