एक काळ होता जेव्हा मोबाइलवरचे फोटो, गाणी, रिंगटोन्स, कॉलरटय़ून्स शेअर करण्यासाठी इन्फ्रारेडचा वापर व्हायचा. हॅण्डसेटमध्ये इन्फ्रारेड असणं म्हणजे प्रतिष्ठेचं मानलं जायचं. शेअरिंग करताना हॅण्डसेट एकमेकांना अगदी लावून ठेवायचे आणि मग डेटा शेअर व्हायला लागायचा. ही सगळी प्रक्रिया पूर्ण व्हायला बराच काळ लागायचा. अत्यंत धिम्या गतीने इकडून तिकडे डेटा जायचा. कालांतराने ब्लू-टूथ आलं आणि परिस्थिती बदलली. आधीपेक्षा अधिक वेगाने डेटा शेअरिंग होऊ लागलं. पूर्वीसारखं हॅण्डसेट चिकटवून ठेवण्याची गरज आता उरली नव्हती. एका विशिष्ट परिघात असणाऱ्या कुठल्याही उपकरणाशी पटकन जोडून घेण्याची सोय झाली होती. त्याचबरोबर तुलनेने मोठय़ा साइजच्या फाइल्सही पाठवता येऊ  लागल्या होत्या.

ब्लूटूथची क्रेझ आणि एकूणच उपकरणांच्या शेअरिंगवर असणारी पकड अनेक वर्ष कायम होती. अगदी आत्ताआत्तापर्यंत हे क्षेत्र ब्लूटूथने व्यापलेलं होतं. पण डेटा शेअरिंगचं क्षेत्र पूर्णपणे बदलून गेलं ते गेल्या काही वर्षांमध्ये आलेल्या भन्नाट अ‍ॅप्समुळे. त्यातलं शेअर-इट हे अ‍ॅप तर मोबाइल वापरकर्त्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. त्याशिवायही झेंडर, झापया, शेअर अ‍ॅप्स, सुपरबीमसारखी अनेक अ‍ॅप्स आहेत, पण सांगायचा मुद्दा असा की या डेटा शेअरिंग अ‍ॅप्समुळे काही सेकंदांमध्ये कित्येक एमबी-जीबीचा डेटा शेअर होऊ  लागला. शेअर इट हे अ‍ॅप मुळात लेनोव्हो या चिनी कंपनीचं. २०१२ मध्ये एनीशेअर या नावाने हे अ‍ॅप पहिल्यांदा लाँच झालं. जे तंत्रज्ञान घेऊन शेअरइट बाजारात उतरलं त्याचं कामकाज जाणून घेणं मोठं रंजक काम आहे.

बहुतांश शेअरिंग अ‍ॅप्स हे ब्लूटूथ किंवा वायफायचा वापर करतात. पण शेअर इट मात्र वायफाय डायरेक्ट या फिचरचा वापर करतं. वायरलेस अ‍ॅक्सेस पॉइंटशिवाय दोन डिव्हाइसेसमध्ये कनेक्शन तयार करण्याचं तंत्रज्ञान म्हणजे वायफाय डायरेक्ट. थोडक्यात म्हणजे हे एकप्रकारचं छोटेखानी वायफायच असतं. पण त्याची कार्यपद्धती ही इंटरनेटसाठी वापरल्या जाणाऱ्या वायफायपेक्षा वेगळी असते.

वायफाय डिरेक्टच्या बाबतीतली जमेची बाजू म्हणजे हॅण्डसेटची कंपनी वेगवेगळी असली तरीही उपकरणांशी जोडता येऊ  शकतो. दोनपैकी एक उपकरण हे वायफाय डिरेक्टसाठी हॉटस्पॉट बनत असतं. जो डेटा पाठवत असतो त्याचा मोबाइल हा एक अदृश्य असा हॉटस्पॉट होतो. या हॉटस्पॉटशी मग इतर उपकरणं जोडली जातात. ज्याला हा डेटा रिसीव्ह करायचा आहे तो या अदृश्य हॉटस्पॉटशी जोडला जातो. आणि त्यानंतर डेटाचं आदानप्रदान होऊ  लागतं. या अशा फाइल शेअरिंगला पीटूपी किंवा पीअर टू पीअर फाइल शेअरिंग असं म्हणतात. या प्रकाराची गंमत म्हणजे डेटा शेअरिंग हा १६ एमबीपीएस म्हणजेच एका सेकंदाला १६ एमबी इतक्या वेगाने होत असतो. त्यामुळेच मोठय़ा साइजच्या फाइल्सही काही सेकंदांमध्ये मोबाइलमध्ये येतात. आजकाल मोबाइलवर सिनेमे बघणाऱ्यांसाठी ही अशी अ‍ॅप्स म्हणजे तारणहारच झालेली आहेत.

या अ‍ॅप्सबाबतची चांगली गोष्ट म्हणजे केबल, यूएसबी वायर, ब्लूटूथचा वापर होत नाही. डेटा शेअर होत असताना मोबाइल डेटाचादेखील वापर होत नाही. मोबाइलमध्ये असणाऱ्या अदृश्य वायफाय कनेक्शनचाच वापर होतो. त्याचबरोबर एकाच वेळी मोबाइल, टॅब्लेट्स, लॅपटॉप, कम्प्युटर अशा अनेक उपकरणांशी या अ‍ॅपमार्फत डेटा शेअरिंग होतं. एकावेळी पाच उपकरणांना डेटा पाठवला जाऊ  शकतो किंवा घेतला जाऊ  शकतो. फक्त या अ‍ॅप्सचा एकच दुर्गुण आहे आणि तो म्हणजे त्यांच्याआड लपलेले व्हायरस किंवा मालवेअर्स. त्यामुळे डेटा शेअरिंग जरी जलद होत असलं तरी या अ‍ॅप्समार्फत येणाऱ्या व्हायरसपासून मोबाइलला सुरक्षित ठेवणं ही ज्याची त्याची जबाबदारी आहे.

Story img Loader