मुलाखत या शब्दाला इंग्रजी प्रतिशब्द आहे Interview. या शब्दाची व्युत्पत्ती Entervoir या फ्रेच शब्दापासून झाली आहे. याचा शब्दश: इंग्रजी अर्थ होतो Glimpse. याचा मराठी अर्थ होतो ओझरते अपूर्ण दर्शन- एक झलक! या व्याख्येतूनच मुलाखतीबद्दल बरेच काही कळेल. मुलाखती अनेक प्रकारच्या होतात, पण आपण स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित मुलाखत प्रकाराविषयी विस्ताराने पाहू. उमेदवारांच्या व्यक्तिमत्त्वाचे जे पलू, गुण लेखी परीक्षेच्या माध्यामातून तपासले जाऊ शकत नाहीत ते पलू तपासण्याच्या हेतूने मुलाखत घेतली जाते. स्पर्धात्मक मुलाखत (Competitive Interview) एक प्रकारची Face to face Meeting असते. ज्याद्वारे उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यांकन केले जाते. या क्षमतांचे आकलन वस्तुनिष्ठ किंवा लेखी परीक्षेच्या माध्यमातून शक्य होत नाही. म्हणूनच पूर्व आणि मुख्य परीक्षांनंतर मुलाखतीचे आयोजन आयोगामार्फत केले जाते. मुलाखत म्हणजे उमेदवारांसाठी परीक्षांच्या टप्प्यांपकी शेवटची आणि यशस्वी भविष्याची पहिली पायरी असते. म्हणूनच स्पर्धात्मक परीक्षांच्या प्रक्रियेत मुलाखतीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. उमेदवाराची योग्यता, पात्रता तपासण्याची मुलाखत ही अशी प्रक्रिया आहे, ज्यातून प्रत्येक यशस्वी उमेदवाराला जावेच लागते.
केंद्रिय लोकसेवा आयोग, नागरी सेवा, अभियांत्रिकी सेवा, आर्थिक / सांख्यिकी सेवा / विशेष श्रेणी रेल्वे प्रशिक्षणार्थी (अॅप्रेंटिसशिप), नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि संयुक्त सुरक्षा दल अशा विविध स्पर्धा परीक्षा आयोजित करत असते. याशिवाय आयोगाकडून केंद्र शासन आणि केंद्र शासित प्रदेशांतील काही विशेष पदांसाठी ज्यात फक्त मुलाखतीद्वारे सरळ सेवा भरतीचेसुद्धा आयोजन केले जाते. केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या मुलाखतीसाठीचे गुण पुढीलप्रमाणे आहेत.
परीक्षा मुलाखतीचे गुण
केंद्रिय नागरी सेवा परीक्षा २७५
राज्य सेवा परीक्षा १००
जेएमएफसी ५०
पोलीस उपनिरीक्षक ४०
विक्रीकर निरीक्षक मुलाखत नाही
मंत्रालय साहाय्यक मुलाखत नाही
महाराष्ट्र वनसेवा ५०
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा ७५
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा १००
महाराष्ट्र यांत्रिकी सेवा ५०
महाराष्ट्र कृषी सेवा ७५
साहाय्यक मोटरवाहन निरीक्षक ५०
लिपिक टंकलेखक मुलाखत नाही
कर साहाय्यक मुलाखत नाही
तांत्रिक साहाय्यक मुलाखत नाही
मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारामधील पुढील गोष्टी तपासण्यात येतात.
* ज्ञानाचा स्तर
*बौद्धिक सतर्कता
’ सुसंगत विचार करण्याची क्षमता
* भूमिका व युक्तिवादातील सुस्पष्टता
*तर्कसंगत विचार
* निर्णय निर्धारणातील समतोल
* बौद्धिक व नतिक प्रामाणिकपणा
* रुची, अभिरुची
* राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रचलीत घडामोडींची जाण
* व्यक्तिगत परिचय आणि आवेदित पदासाठीची प्रशासनिक योग्यता
उमेदवाराच्या कारकिर्दीचा सर्व तपशील हाती घेऊन एका मुलाखत मंडळाकडून उमेदवाराची मुलाखत घेती जाते. सक्षम तसेच निष्पक्ष निरीक्षकांचा समावेश असलेल्या या मंडळाकडून उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व प्रशासकीय सेवा क्षेत्रामध्ये कार्य करण्यायोग्य
आहे की नाही, हे मुलाखतीतून पाहिले जाते. उमेदवाराचा बौद्धिक कस व सर्वसाधारण महत्त्वाच्या मुद्दय़ांबाबतची सजगता येथे पाहिली जाते. एकूणच ही उमेदवाराच्या केवळ बौद्धिक गुणवत्तेचीच नव्हे तर त्याच्या
सामाजिक जाणिवा आणि प्रचलित घडामोडींमध्ये
त्याला स्वारस्याचीदेखील चाचणी ठरते. मुलाखतीचे तंत्र उलट तपासणीचे नसते. उमेदवाराचा बौद्धिक
व भावनिक कस तपासण्यासाठी नसíगक आणि थेट अशा सहेतूक संवादाच्या स्वरूपात मुलाखत होते.
मुलाखतीच्या दोन महत्त्वाच्या बाजू आहेत- भाषिक (Verbal) आणि अभाषिक (Non-Verbal). मुलाखतीद्वारे अभिव्यक्त होण्यात या दोन्ही बाबी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. उमेदवाराचे दिसणे, त्याची बाह्य़प्रकृती या बाबी अभाषिक पलूमध्ये येतात. उमेदवाराची वेशभूषा, हावभाव, देहबोली, त्याची उठण्या-बसण्याची पद्धत, वाकचातुर्य (Speech Mannerism), आत्मविश्वास, मानसिक सतर्कता (Mental Alertness), मानसिक दृढता (Mental Firmness) या बाबी तपासल्या जातात. यासाठी मनोवैज्ञानिकांची व्यवस्था करण्यात येते. भाषिक पलूमध्ये प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून उमेदवाराची ‘मुलाखत परीक्षा’ संपन्न होते. याविषयी पुढील लेखात विस्ताराने चर्चा करू.
बहुतांश वेळा लेखी परीक्षेत चांगले गुण असणारे उमेदवारही मुलाखतीबद्दल मात्र तणावात असतात. सर्वप्रथम सर्व उमेदवारांनी हे समजून घेतले पाहिजे की, मुलाखत ही कुठली भीतिदायक प्रक्रिया नाही. मुलाखत घेणारे आणि मुलाखत देणारे सगळेच ‘ह्य़ुमन बीइंग’ या वर्गवारीतले असतात. फरक इतकाच की, मुलाखत घेणारे आपापल्या विषयातले तज्ज्ञ आणि अनुभवसंपन्न असतात. म्हणून मुलाखतीला एक सामान्य परीक्षा प्रक्रियेचा भाग मानून, तणावात न येता उत्साहाने तयारी केली पाहिजे.
मुलाखत पॅनल किंवा बोर्डच्या माध्यमातून उमेदवारांची मुलाखत घेतली जाते. एक अध्यक्ष असतो. तर इतर सदस्यांची संख्या चार ते सहा असते. मुलाखत ही विविध विषय व क्षेत्रांतील तज्ज्ञ सदस्यांसमोर आपली योग्यता, श्रेष्ठता आणि प्रतिमा सिद्ध करण्याची एक सुवर्णसंधी असते. अनेक उमेदवारांसाठी आयुष्याचा ‘टर्निंग पॉइंट’ ठरणारी मुलाखत, अनेक उमेदवारांच्या मर्यादा उघड करणारी ‘परीक्षा’सुद्धा ठरते. मुलाखतीच्या तयारीशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांबाबत पुढील काही लेखांत चर्चा करू.