या लेखामध्ये रवी राठोड या उमेदवाराच्या मुलाखतीचा अनुभव कसा होता ते पाहू. या मुलाखतीतील मुलाखत मंडळाचे अध्यक्ष पटेल व मुलाखत मंडळ सदस्य आयएस अधिकारी अनुपकुमार व एक भारतीय पोलीस प्रशासन सेवेतील अधिकारी होते. या तज्ज्ञांनी झाडलेल्या प्रश्नांच्या फैरीला रवी कशाप्रकारे सामोरे गेले हे पाहूयात.
पटेल – कोठून आलात तुम्ही? सध्या काय करता?
रवी – सर मी सध्या मंत्रालय सहायक या पदावर कार्यरत आहे.
पटेल – कोणता विभाग?
रवी – शालेय शिक्षण.
आयपीएस सदस्यांनी मध्येच विचारले, सध्या एक नवीन जीआर आला आहे. त्याद्वारे याचे नाव बदललंय. तुम्हाला माहिती आहे का?
रवी – मला विभागाचं नाव बदललं की पदाच नाव बदललं हे समजलं नाही.
तेव्हा सर म्हणाले, तुमच्या माहितीसाठी सांगतो. ए डी ओ..
(उमेदवाराने मध्येच थोडय़ा उतावीळपणे म्हटले- हा… असिस्टंट डेस्क ऑफिसर.)
पटेल – तुमच्या पदवीचे विषय कोणते?
रवी – हिस्टरी, पॉलिटी व इंग्रजी साहित्य
पटेल – (थोडे वैतागून) तुम्ही पॉलिटी का म्हणता बर?
रवी – माफ करा सर. मला पॉलिटिकल सायन्स म्हणायचे आहे. ते स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासामुळे इंडियन पॉलिटी अशी सवय झाली आहे.
(पटेल यांनी यावर स्मितहास्य दिले.)
पटेल -आजचा पेपर वाचला का? काय होतं त्यात?
रवी – काल लोकसभेचे माजी सभापती श्री. पी. ए. संगमा यांचे निधन झाले.
पटेल – अजून काय वाचले?
रवी – सर श्री. मनोज कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.
पटेल – अजून आपल्या संपूर्ण देशाशी संबंधित काही पॉलिटिकल घडलं का?
रवी – हो सर, सन्माननीय इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने नुकतीच पाच राज्यांत असेम्ब्ली इलेक्शन जाहीर केलीत.
पटेल – आपल्या महाराष्ट्रासारखे द्विग्रही सभागृह कोणकोणत्या राज्यात आहे, ते सांगा?
रवी – सर सहा राज्यांत अशी सभागृहे आहेत. जम्मू काश्मीर, महाराष्ट्र, आंध्र, तेलंगणा, पश्चिम बंगाल. मला इतकीच माहिती आहेत. बाकीची नाही. त्याबद्दल सॉरी सर.
पटेल – का हो, अशा द्विग्रही सभागृहांचा काही फायदा होतो का?
रवी – हो सर, काही विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ लोक थेट निवडणूक लढवू शकत नाहीत. त्यांच्या ज्ञानाचा येथे फायदा होतो.
यापुढे या मुलाखतीमध्ये अनुपकुमार आणि
दुसरे भारतीय पोलीस प्रशासन सेवेतील अधिकारी यांनी प्रश्न विचारले. ते नेमके काय होते, आणि रवी
यांनी त्याला कशाप्रकारे उत्तरे दिली, हे पुढील भागात पाहू.