मानवी संसाधनांचा आर्थिक प्रगतीमध्ये वापर करता यावा यासाठी या संसाधनाचा विकास गरजेचा ठरतो आणि त्यासाठी मानवी हक्कांची अंमलबजावणी सर्वप्रथम आवश्यक ठरते. त्या दृष्टीने मानवी हक्क व मानव संसाधन विकास या विषयांचा अंतर्भाव मुख्य परीक्षेमध्ये करण्यात आला आहे.
मागच्या लेखांमध्ये अभ्यासक्रमातील मुद्दय़ांचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. या वर्गीकरणाप्रमाणे अभ्यासाचे धोरण थोडय़ा फार फरकाने बदलावे लागते. त्या दृष्टीने या विषयाच्या अभ्यासाच्या रणनीतीची चर्चा या लेखापासून करण्यात येईल.
* मूलभूत व पारंपरिक अभ्यास :
अभ्यासाची सुरुवात सर्वप्रथम काही तटस्थ संकल्पना समजून घेऊन करायला हवी. यामध्ये मानवी हक्कांची संकल्पना, तिचा इतिहास, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कांची आंतरराष्ट्रीय मानके, युनोची घोषणापत्रे व भारतीय संविधानातील मानवी हक्कांचे प्रतिबिंब या बाबी बारकाईने समजून घ्यायला हव्यात. मानवी हक्कांचे महत्त्व, गरज माहीत असायला हवी.
या दृष्टीने मूल्ये व नीतीतत्त्वे यांची जोपासना हा घटक महत्त्वाचा आहे. मूल्ये व नीतीतत्त्वांची मानवी हक्क व संसाधन विकासातील भूमिका महत्त्वाची आहे. त्यांची जोपासना म्हणजेच मानवी सभ्यतेच्या पालनासाठीचे प्रशिक्षण हे लक्षात घेणे आवश्यक आहे. कुटुंब, शिक्षणसंस्था या औपचारिक व अनौपचारिक संस्थांच्या माध्यमातून मूल्ये व नीतीतत्त्वे कशाप्रकारे रुजविण्यात येतात त्याचा आढावा घेणे गरजेचे आहे. धर्म व प्रसारमाध्यमे यांद्वारे होणारे मूल्यशिक्षण हा चिंतन व विश्लेषणाचा विषय आहे.
यानंतर मानव संसाधन विकासाची संकल्पना, त्यात समाविष्ट मुद्दे, साधने, मानव संसाधन विकासाची गरज, महत्त्व या बाबी साकल्याने समजून घ्यायला हव्यात. याबाबत स्वत:चे चिंतनही महत्त्वाचे आहे. मानव संसाधन म्हणजेच भारतातील लोकसंख्येच्या सद्य:स्थितीचा अभ्यास आहे. त्यामुळे सन २०११ च्या जनगणनेच्या अहवालाचा विश्लेषणात्मक अभ्यास हा मानव संसाधन घटकाच्या अभ्यासाचा तांत्रिक पाया (technical base) आहे. या घटकाचा अभ्यास टेबलमध्ये करता येईल.
नागरी, ग्रामीण, वयोगट, लिंग गुणोत्तर, बाल लिंग गुणोत्तर, बालमृत्यू दर, अर्भक मृत्यू दर, साक्षरता या मुद्दय़ांसाठी टेबल बनवावा. प्रत्येक मुद्दय़ांमध्ये भारतविषयक आकडेवारी व टक्केवारी, महाराष्ट्राची टक्केवारी व राज्यांच्या एकत्रित यादीमधील क्रमांक, महाराष्ट्राच्या तुलनेत मागे व पुढे असलेले एक-एक राज्य/ केंद्रशासित प्रदेश, सर्वात जास्त व सर्वात कमी टक्केवारीची तीन-तीन राज्ये/केंद्रशासित प्रदेश व त्यांची टक्केवारी यांचा समावेश करावा. यामध्ये महाराष्ट्राची जनगणना व्यवस्थित पाहणे आवश्यक आहे. वरील मुद्दय़ांबाबत चर्चा केलेल्या पद्धतीनेच प्रत्येक मुद्दय़ांसाठी महाराष्ट्रातील जिल्ह्य़ांचा विचार करून टेबल तयार करावे. शक्य झाल्यास सन २००१ च्या जनगणनेच्या अहवालातील या मुद्दय़ांचा आढावा घ्यावा. यामुळे तुलनात्मक प्रश्नांची उत्तरे देणे शक्य होईल.
याच पायाभूत अभ्यासामध्ये दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या आर्थिक पाहणी अहवालामधून शिक्षणविषयक आकडेवारी – पटनोंदणी, गळतीचे प्रमाण, साक्षरतेमधील लिंगसमानता; आरोग्यविषयक आकडेवारी-प्राथमिक, द्वितीय व तृतीय स्तरावरील आरोग्य सुविधांची उपलब्धता, कुपोषणविषयक आकडेवारी, बेरोजगारीचे प्रमाण, कामगारांचा मागणी दर, वेगवेगळ्या क्षेत्रांतील सेवायोजन इत्यादी गोष्टींच्या नोट्स काढणे आवश्यक आहे. याबाबत भारतातील एकूण आकडेवारी / टक्केवारी, महाराष्ट्रातील आकडेवारी / टक्केवारी व रोजगाराबाबत राज्यांची तुलना पाहायला हवी.
* संस्था, संघटना आणि आयोग :
अभ्यासक्रमामध्ये वेगवेगळ्या मुद्दय़ांच्या अनुषंगाने संस्था व संघटनांचा वेगवेगळ्या ठिकाणी उल्लेख करण्यात आला आहे. या संस्था व संघटना मानवी हक्कांची अंमलबजावणी किंवा मानवी संसाधन विकास या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांचा अभ्यास ज्या त्या मुद्दय़ांबरोबर केला तरी चालेल किंवा पारंपरिक अभ्यासाचा भाग म्हणून सगळ्यांचा एकत्र अभ्यास केला तरी चालेल. एकत्रित अभ्यास केला तर नोट्स ज्या त्या मुद्दय़ांमध्ये समाविष्ट कराव्यात. यामुळे एका मुद्दय़ांची उजळणी करताना संबंधित सगळे मुद्दे एकाच वेळी व एकत्रितपणे मिळतील.
आंतरराष्ट्रीय व संघटनांचा अभ्यास करताना पुढील मुद्दे लक्षात घ्यावेत – * स्थापनेची पाश्र्वभूमी * स्थापनेचा उद्देश व कार्यकक्षा * संस्थापक * भारत सदस्य / संस्थापक सदस्य आहे का? * संस्थांचे बोधवाक्य * शक्य असल्यास बोधचिन्ह * स्थापनेचे वर्ष * रचना * कार्यपद्धती * ठळक काय्रे, निर्णय, घोषणा * वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे * संस्थेला मिळालेले पुरस्कार * संस्थेकडून देण्यात येणारे पुरस्कार * असल्यास भारतीय सदस्य * संस्थेचे अहवाल व त्यातील भारताचे स्थान.
यातील काही मुद्दय़ांच्या आधारे भारतामध्ये मानव संसाधनामध्ये कार्यरत असलेल्या शासकीय व स्वयंसेवी संघटनांचाही अभ्यास करणे शक्य आहे. या संस्था संघटनांसाठी लक्षात घ्यायचे मुद्दे पुढीलप्रमाणे :
* स्थापनेची पाश्र्वभूमी * शिफारस करणारा आयोग / समिती * स्थापनेचा उद्देश * बोधवाक्य / बोधचिन्ह * मुख्यालय * रचना * कार्यपद्धत * जबाबदाऱ्या * अधिकार * नियंत्रण करणारे विभाग * खर्चाची विभागणी * वाटचाल * इतर आनुषंगिक मुद्दे.
मानवी हक्क, मानव संसाधन व त्याचा विकास या संकल्पना व विविध संस्था/संघटनांचा तथ्यात्मक अभ्यास तसेच जनगणना अहवालातील महत्त्वाची आकडेवारी या बाबी मानवी हक्क व मानव संसाधन विकास या पेपरच्या अभ्यासातील पायाभूत घटक आहेत. यापुढील लेखामध्ये मानवी हक्क घटकाचा संकल्पनात्मक व विश्लेषणात्मक अभ्यास कसा करावा याची चर्चा करण्यात येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा